व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा २६

ईयोब देवाशी प्रामाणिक राहतो

ईयोब देवाशी प्रामाणिक राहतो

या आजारी माणसाची तुम्हाला कीव येते का? त्याचं नाव ईयोब, आणि ती स्त्री त्याची बायको आहे. ती ईयोबाला काय म्हणत आहे, ते तुम्हाला माहीत आहे का? ‘देवाला शाप द्या आणि मरून जा.’ अशी गोष्ट तिनं का म्हणावी आणि ईयोबाला इतकं दुःख का सोसावं लागावं, ते पाहू या.

ईयोब, हा यहोवाची आज्ञा मानणारा एक विश्‍वासू माणूस होता. कनानपासून जवळच असलेल्या ऊस देशात तो राहात होता. यहोवाचं ईयोबावर अतिशय प्रेम होतं. पण त्याचा द्वेष करणारा कोणी एक होता. कोण, ते तुम्हाला ठाऊक आहे का?

तो होता दियाबल सैतान. यहोवाचा द्वेष करणारा दुष्ट देवदूत, सैतान असल्याची आठवण करा. आदाम आणि हव्वेकडून तो यहोवाची अवज्ञा करवून घेऊ शकला. त्याला वाटलं की, तो इतर सर्वांनाही यहोवाची अवज्ञा करायला लावू शकेल. पण त्याला ते जमलं का? नाही. आपण ज्यांच्याबद्दल शिकलो, त्या अनेक विश्‍वासू पुरुष आणि स्त्रियांचा विचार करा. किती जणांची नावं तुम्हाला आठवतात?

इजिप्तमध्ये याकोब नि योसेफ मरण पावल्यानंतर, संपूर्ण पृथ्वीवर यहोवाशी सर्वात प्रामाणिक असलेला माणूस, ईयोब होता. सर्वांना वाईट व्हायला लावणं सैतानाला शक्य नसल्याचं त्याला कळावं, अशी यहोवाची इच्छा होती. म्हणून तो म्हणाला: ‘ईयोबाकडे बघ. पाहा, तो माझ्याशी किती प्रामाणिक आहे.’

सैतानाने वाद घातला: ‘तू त्याला आशीर्वाद देतोस आणि त्याच्यापाशी खूप चांगल्या गोष्टी आहेत, म्हणून तो विश्‍वासू आहे. पण तू त्या काढून घेतल्यास, तर तो तुला शाप देईल.’

त्या कारणानं यहोवा म्हणाला: ‘हो पुढे. तू त्या हिरावून घे. तुला वाटतील त्या सर्व वाईट गोष्टी ईयोबाला कर. मग, तो मला शाप देतो की काय, ते आपण पाहू. फक्‍त त्याला जिवानिशी न मारण्याची खबरदारी घे.’

प्रथम, सैतानानं लोकांकडून ईयोबाच्या गुरांची नि उंटांची चोरी करवली. त्याची मेंढरं मारली गेली. मग एका वादळात त्यानं त्याच्या १० मुलांना अन्‌ मुलींना मारलं. त्यानंतर सैतानानं ईयोबावर हा दुर्धर रोग आणला. ईयोबाला अतोनात दुःख सोसावं लागलं. त्याच कारणानं त्याच्या बायकोनं त्याला म्हटलं: ‘देवाला शाप द्या आणि मरून जा.’ परंतु ईयोब तसं करीना. तसंच, तीन खोट्या मित्रांनी येऊन, त्यानं वाईट रितीनं जीवन घालवलं, असं त्याला सांगितलं. पण ईयोब प्रामाणिक राहिला.

त्यामुळे यहोवाला अतिशय आनंद झाला. आणि तुम्हाला चित्रात दिसतं त्याप्रमाणे, त्यानं ईयोबाला आशीर्वाद दिले. त्यानं त्याचा आजार बरा केला. ईयोबाला १० रूपवान मुलं झाली व त्याच्या जवळ, पूर्वीपेक्षा दुप्पट गुरं, मेंढरं आणि शेरडं झाली.

ईयोबाप्रमाणे तुम्ही यहोवाशी नेहमी प्रामाणिक राहाल का? राहिलात तर देव तुम्हालाही आशीर्वाद देईल. आणि सर्व पृथ्वी एदेन बागेसारखी सुंदर केली जाईल तेव्हा, तुम्ही अनंत काळ जगू शकाल.