व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा २८

तान्हा मोशे कसा वाचला

तान्हा मोशे कसा वाचला

रडणारा आणि त्या स्त्रीचं बोट धरणारा तो तान्हा मुलगा पाहा. हा मोशे आहे. ती सुंदर स्त्री कोण आहे, ते तुम्हाला माहीत आहे का? ती आहे एक ईजिप्शियन राजकन्या, खुद्द फारोची मुलगी.

मोशे तीन महिन्यांचा होईपर्यंत त्याच्या आईनं त्याला लपवून ठेवलं. कारण ईजिप्शियनांनी त्याला मारू नये असं तिला वाटत होतं. पण तो उघडकीला येण्याची शक्यता तिला माहीत असल्यानं, त्याला वाचवण्यासाठी तिनं काय केलं पाहा.

तिनं एक पेटारा घेतला आणि त्यात पाणी झिरपणार नाही, अशी व्यवस्था केली. मग तिनं मोशेला त्यात घातलं, आणि तो पेटारा नील नदीच्या काठालगतच्या उंच लव्हाळ्यात ठेवला. मोशेची बहीण मिर्याम, हिला जवळपास उभी राहून काय होतं, ते पाहायला सांगण्यात आलं.

थोड्याच वेळात फारोची मुलगी आंघोळ करण्यासाठी नील नदीवर आली. उंच लव्हाळ्यात तिला अचानक तो पेटारा दिसला. तिनं आपल्या एका दासीला सांगितलं: ‘माझ्यासाठी तो पेटारा आण.’ राजकन्येनं पेटारा उघडल्यावर, तिला एक गोजिरवाणं बाळ दिसलं! छोटा मोशे रडत होता. राजकन्येला त्याची दया आली. त्याला मारायला सांगावं असं तिला वाटेना.

मग मिर्याम पुढे झाली. चित्रात ती तुम्हाला दिसते. मिर्यामनं फारोच्या मुलीला विचारलं: ‘तुमच्याकरिता बाळाला दूध पाजण्यासाठी एखादी इस्राएली स्त्री बोलावू का?

राजकन्या म्हणाली: ‘बोलाव.’

म्हणून मिर्याम पटकन आपल्या आईला सांगण्यासाठी पळाली. मोशेची आई राजकन्येपाशी आल्यावर राजकन्या म्हणाली: ‘या बाळाला ने. आणि त्याला माझ्याकरिता दूध पाज, म्हणजे मी तुला पैसे देईन.’

त्यामुळे मोशेच्या आईनं आपल्याच बाळाची देखभाल केली. पुढे मोशे पुरेसा मोठा झाल्यावर, तिनं त्याला फारोच्या मुलीकडे नेलं. फारोच्या मुलीनं त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवलं. अशा रितीनं मोशे फारोच्या घरी लहानाचा मोठा झाला.