व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा २९

मोशे का पळून गेला

मोशे का पळून गेला

इजिप्तहून पळणारा मोशे पाहा. त्याचा पाठलाग करणारी माणसं तुम्हाला दिसतात का? ती मोशेला मारायला का पाहात आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? आपल्याला शोधून काढता येतं का, पाहू या.

इजिप्तचा राजा फारो, याच्या घरी मोशे वाढला. तो एक ज्ञानी व मोठा माणूस झाला. आपण ईजिप्शियन नसून, आपले खरे आई-वडील इस्राएली गुलाम असल्याचं मोशेला माहीत होतं.

तो ४० वर्षाचा असताना, एका दिवशी, आपले लोक कसे काय आहेत, ते पाहायला जायचं मोशेनं ठरवलं. त्यांना अतिशय वाईट वागणूक मिळत होती. एक ईजिप्शियन एका इस्राएली गुलामाला मारत असलेला त्याला दिसला. मोशेनं आजूबाजूला पाहिलं. कोणी पाहात नाही असं दिसल्यावर, त्यानं त्या ईजिप्शियन माणसाला तडाखा दिला, व तो मेला. मग मोशेनं त्याचं शरीर वाळूत लपवलं.

दुसऱ्‍या दिवशी मोशे परत आपल्या लोकांना पाहायला गेला. त्याला वाटलं, आपण त्यांना मदत करू शकू, म्हणजे त्यांना गुलामगिरीत राहावं लागणार नाही. पण त्याला दोन इस्राएली भांडताना दिसले. म्हणून, ज्याची चूक होती त्याला मोशे म्हणाला: ‘तू आपल्या भावाला का मारतोस?’

तो माणूस म्हणाला: ‘तुला कोणी आमच्यावर अधिकारी आणि न्यायाधीश नेमलं? त्या ईजिप्शियन माणसाला मारलंस, तसा आता मला मारणार आहेस काय?’

आता मात्र मोशे घाबरला. त्या ईजिप्शियन माणसाचं त्यानं काय केलं, याचा लोकांना पत्ता लागल्याचं त्याच्या ध्यानात आलं. फारोलाही ते कळलं. त्यानं मोशेला मारण्यासाठी माणसं रवाना केली. त्या कारणानं मोशेला इजिप्तमधून पळून जावं लागलं.

इजिप्त सोडल्यावर, मोशे दूरच्या मिद्यान देशाला गेला. तिथे त्याची इथ्रोच्या कुटुंबाशी गाठ पडली. त्यानं सिप्पोरा नावाच्या, इथ्रोच्या एका मुलीशी लग्न केलं. मोशे मेंढपाळ झाला आणि त्यानं इथ्रोची मेंढरं राखली. तो ४० वर्षं मिद्यान देशात राहिला. मग एका दिवशी, मोशे इथ्रोच्या मेंढरांची राखण करत असताना एक अशी आश्‍चर्यजनक गोष्ट झाली की, तिच्यामुळे मोशेचं पूर्ण जीवनच बदलून गेलं. पान उलटा, म्हणजे ती आश्‍चर्यजनक गोष्ट कोणती, हे आपण पाहू.