व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ३०

जळणारं झुडूप

जळणारं झुडूप

आपल्या मेंढरांकरता गवत शोधण्यासाठी मोशे दूरच्या होरेब पर्वतापाशी आला होता. तिथे त्याला पेटलेलं एक झुडूप दिसलं. पण ते जळत नव्हतं!

मोशेनं विचार केला: ‘हे अजबच आहे. मी जवळ जाईन आणि निरखून पाहीन.’ तो जवळ गेल्यावर, झुडूपातून आवाज आला: ‘आणखी जवळ येऊ नकोस. तुझ्या पायातले जोडे काढ, कारण तू पवित्र भूमीवर उभा आहेस.’ एका स्वर्गदूतामार्फत देव बोलत होता. त्यामुळे मोशेनं आपला चेहरा झाकला.

मग देव म्हणाला: ‘इजिप्तमधल्या माझ्या लोकांचं दुःख मी पाहिलं आहे. म्हणून मी त्यांना सोडवणार आहे. आणि इजिप्तमधून माझ्या लोकांना बाहेर आणण्यासाठी मी तुला पाठवतो आहे.’ यहोवा त्याच्या लोकांना सुंदर कनान देशात आणणार होता.

पण मोशे म्हणाला: ‘मी तो काय. मी ते कसं करू शकेन? पण समज मी गेलो, तर इस्राएली मला म्हणतील, “तुला कोणी पाठवलं?” मग मी काय सांगू?’

देवानं उत्तर दिलं: ‘तू असं सांग की, “अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव यहोवा, यानं मला तुमच्याकडे पाठवलं आहे.”’ शिवाय यहोवा म्हणाला: ‘हे माझं कायमचं नाव आहे.’

त्यावर मोशे म्हणाला: ‘पण समजा, तू मला पाठवलं आहेस, असं मी सांगितल्यावर त्यांनी माझ्यावर विश्‍वास ठेवला नाही, तर?’

‘तुझ्या हातात काय आहे?’ देवानं विचारलं.

मोशे उत्तरला: ‘काठी.’

देव म्हणाला: ‘ती जमिनीवर टाक.’ मोशेनं तसं केल्यावर, काठीचा साप झाला. मग यहोवानं मोशेला आणखी एक चमत्कार दाखवला. तो म्हणाला: ‘तुझा हात अंगरख्याच्या आत घाल.’ मोशेनं घातला. आणि त्यानं तो बाहेर काढला तेव्हा, तो बर्फासारखा पांढरा होता! तो हात, जणू कोड नावाचा किळसवाणा रोग झाल्यासारखा दिसत होता. त्यानंतर यहोवानं मोशेला तिसरा चमत्कार करण्याची शक्‍ती दिली. अखेरीस तो म्हणाला: ‘तू हे चमत्कार केलेस की, मी तुला पाठवलेलं आहे यावर इस्राएलांचा विश्‍वास बसेल.’

त्या नंतर मोशे घरी गेला व इथ्रोला म्हणाला: ‘इजिप्तमध्ये माझे नातेवाईक कसे काय आहेत ते पाहण्यासाठी, कृपा करून मला परत जाऊ द्या.’ त्यामुळे इथ्रोनं मोशेला निरोप दिला. व मोशे इजिप्तला परतण्याच्या लांबच्या प्रवासाला लागला.