व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ३१

मोशे व अहरोन फारोला भेटतात

मोशे व अहरोन फारोला भेटतात

इजिप्तला परतल्यावर मोशेनं त्याचा भाऊ अहरोन याला त्या चमत्कारांबद्दल सर्व काही सांगितलं. मोशे नि अहरोनानं इस्राएली लोकांना ते चमत्कार दाखवल्यावर, त्या सर्वांची खात्री झाली की, यहोवा त्यांच्यासोबत आहे.

मग मोशे आणि अहरोन फारोला भेटायला गेले. त्यांनी त्याला सांगितलं: ‘इस्राएलांचा देव यहोवा म्हणतो, “रानात माझी भक्‍ती करण्यासाठी, माझ्या लोकांना तीन दिवस जाऊ दे.”’ पण फारोनं उत्तर दिलं: ‘माझा यहोवावर विश्‍वास नाही. आणि मी इस्राएलांना जाऊ देणार नाही.’

यहोवाची भक्‍ती करण्यासाठी लोक कामातून रजा मागत असल्यामुळे फारोला राग आला होता. त्यामुळे त्यानं त्यांच्याकडून आणखीन जास्त काम करवून घेतलं. त्यांना मिळणाऱ्‍या वाईट वागणुकीसाठी इस्राएल लोकांनी मोशेला दोष दिला. मोशेला अतिशय दुःख झालं. पण देवानं त्याला चिंता न करण्याबद्दल सांगितलं. यहोवा म्हणाला: ‘माझ्या लोकांना जाऊ द्यायला मी फारोला भाग पाडीन.’

मोशे आणि अहरोन पुन्हा फारोला भेटायला गेले. यावेळी त्यांनी एक चमत्कार केला. अहरोनानं त्याची काठी खाली टाकली, आणि तिचा मोठा साप झाला. पण फारोच्या जादूगारांनीही काठ्या खाली टाकल्यावर साप उत्पन्‍न झाले. पण पाहा! अहरोनाचा साप जादूगारांच्या सापांना खाऊन टाकतो आहे. तरीही फारो इस्राएलांना जाऊ देईना.

त्यामुळे फारोला धडा शिकवण्याची यहोवाची वेळ आली. हे त्यानं कसं केलं, तुम्हाला माहीत आहे का? इजिप्तवर १० पीडा किंवा मोठे त्रास आणून.

अनेक पीडांच्या नंतर फारोनं मोशेला बोलावलं, आणि म्हणाला: ‘ही पीडा थांबव म्हणजे मी इस्राएलांना जाऊ देईन.’ पण पीडा थांबली की, फारो आपलं मन बदलत असे. तो लोकांना जाऊ देत नसे. अखेरीस, १० व्या पीडेनंतर, फारोनं इस्राएलांना पाठवून दिलं.

त्या १० पीडा कोणत्या, हे तुम्हाला ठाऊक आहे का? पान उलटा म्हणजे आपण त्यांच्याबद्दल शिकू.