व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ३४

नव्या प्रकारचं अन्‍न

नव्या प्रकारचं अन्‍न

लोक जमिनीवरून काय उचलताहेत, हे तुम्ही सांगू शकता का? ते गोठलेल्या दवासारखं पांढरं, पातळ आणि पापुद्‌य्रासारखं आहे. पण ते काही गोठलेलं दव नाही; खाण्यासाठी आहे.

इस्राएलांना इजिप्त सोडून जेमतेम महिना झाला आहे. ते अरण्यात आहेत. इथे जवळपास काहीच पिकत नाही. त्यामुळे लोक कुरकुरत म्हणतात: ‘यहोवानं आम्हाला इजिप्तमध्येच मारुन टाकलं असतं, तर बरं झालं असतं. निदान तिथे आम्हाला हवं तितकं अन्‍न तरी होतं.’

त्या कारणानं यहोवा म्हणतो: ‘आकाशातून अन्‍नाचा पाऊस पडेल, असं मी करीन.’ आणि तो तेच करतो. दुसऱ्‍या दिवशी सकाळी पडलेली ही वस्तू इस्राएल लोक पाहतात तेव्हा, ते एकमेकांना विचारतातः ‘हे काय?’

मोशे म्हणतो: ‘यहोवानं तुम्हाला खाण्यासाठी जे अन्‍न दिलं आहे, ते हे.’ लोक त्याला मान्‍ना म्हणतात. त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी आहे.

‘प्रत्येकाच्या आहाराप्रमाणे तुम्ही ते गोळा करा,’ मोशे लोकांना सांगतो. तेव्हा, दररोज सकाळी ते असंच करतात. मग उन्हाचा ताप वाढला की, जमिनीवर राहिलेला मान्‍ना वितळतो.

‘कोणीही मान्‍ना दुसऱ्‍या दिवसापर्यंत ठेवू नये,’ असंही मोशे सांगतो. पण काही लोक ऐकत नाहीत. त्यामुळे काय होतं, हे तुम्हाला ठाऊक आहे का? दुसऱ्‍या दिवशी सकाळी, त्यांनी उचलून ठेवलेल्या मान्‍नामध्ये किडे होतात आणि त्याला घाण सुटते!

पण आठवड्यातल्या एका दिवशी मात्र यहोवा लोकांना दुप्पट मान्‍ना गोळा करायला सांगतो. हा सहावा दिवस असतो. सातव्या दिवशी यहोवा मान्‍ना पाडणार नसल्यामुळे, दुसऱ्‍या दिवसासाठी थोडा उचलून ठेवायला तो त्यांना सांगतो. सातव्या दिवसासाठी जेव्हा ते मान्‍ना राखून ठेवतात, तेव्हा त्यात किडे पडत नाहीत, आणि त्याला दुर्गंधीही सुटत नाही! हा आणि एक चमत्कार!

इस्राएल लोक अरण्यात राहिले तेवढी सर्व वर्षं यहोवानं त्यांना मान्‍ना खायला घातला.