व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ३५

यहोवा आपले नियम देतो

यहोवा आपले नियम देतो

इजिप्त सोडल्यावर जवळपास दोन महिन्यांनी, इस्राएल लोक सिनाय पर्वतापाशी येतात. त्याला होरेब पर्वत असंही म्हणतात. यहोवा पेटलेल्या झुडूपातून मोशेशी जिथे बोलला, तीच ही जागा. लोक इथे तळ देतात आणि थोडे दिवस राहतात.

मोशे डोंगरावर चढून जातो, पण लोक खाली थांबतात. डोंगराच्या माथ्यावर, यहोवा मोशेला सांगतो की, इस्राएलांनी त्याच्या आज्ञा पाळाव्यात आणि त्याचे खास लोक व्हावेत, अशी त्याची इच्छा आहे. मोशे खाली आल्यावर, यहोवानं सांगितलेल्या गोष्टी तो इस्राएलांना सांगतो. आणि त्याचे लोक व्हायची लोकांची इच्छा असल्यानं, आपण यहोवाशी आज्ञाधारक राहू, असं ते म्हणतात.

आता यहोवा एक अजब गोष्ट करतो. तो, पर्वताच्या माथ्यावर धूर आणि ढगांचा गडगडाट होईल, असं करतो. तसंच तो लोकांशी बोलतो आणि म्हणतो: ‘ज्यानं तुम्हाला मिसरातून (इजिप्त) बाहेर आणलं, तो मी तुमचा देव यहोवा आहे.’ मग तो आज्ञा देतो: ‘तुम्ही माझ्याशिवाय इतर कोणत्याही देवांची उपासना करू नये.’

देव इस्राएलांना आणखी नऊ आज्ञा किंवा नियम देतो. लोक तर फारच घाबरलेले असतात. ते मोशेला सांगतातः ‘तूच आमच्याशी बोल. कारण देव आमच्याशी बोलला तर आम्ही मरू, अशी भीती आम्हाला वाटते.’

पुढे यहोवा मोशेला सांगतो: ‘पर्वतावर माझ्याकडे ये. ज्यांच्यावर मी आज्ञा लिहिल्या आहेत, अशा दगडी पाट्या तुला देईन. त्या आज्ञा लोकांनी पाळाव्या अशी माझी इच्छा आहे.’ त्यामुळे मोशे पुन्हा डोंगरावर जातो. तो ४० दिवस आणि रात्री तिथे राहतो.

त्याच्या लोकांसाठी देवापाशी खूपसे नियम असतात. मोशे ते लिहून घेतो. देव मोशेला दोन दगडी पाट्याही देतो. त्यांच्यावर, लोकांना सांगितलेले १० नियम, देवानं स्वतः लिहिले आहेत. त्यांना दहा आज्ञा म्हणतात.

या दहा आज्ञा, हे महत्त्वाचे नियम आहेत. तसंच देवानं इस्राएलांना दिलेले इतर नियमही महत्त्वाचे आहेत. त्यातला एक नियम असा आहे: ‘तू आपला देव यहोवा ह्‍याच्यावर पूर्ण मनानं, पूर्ण जिवानं आणि पूर्ण शक्‍तीनं प्रेम कर.’ आणि दुसरा आहे: ‘तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखं प्रेम कर.’ देवाचा मुलगा येशू ख्रिस्त म्हणाला की, यहोवानं त्याच्या इस्राएल लोकांना दिलेले हे सर्वात मोठे नियम आहेत. पुढे आपण देवाचा मुलगा आणि त्याच्या शिकवणींबद्दल बरंच शिकू.