व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ३६

सोन्याचं वासरू

सोन्याचं वासरू

अरेच्या! हे लोक काय करताहेत? ते एका वासराला प्रार्थना करत आहेत! पण ते असं का करताहेत?

मोशे खूप दिवस डोंगरावर राहतो तेव्हा, लोक म्हणतात: ‘मोशेचं काय झालं, कळत नाही. म्हणून या देशातून आपल्याला बाहेर नेण्यासाठी एक देव बनवू या.’

मोशेचा भाऊ अहरोन म्हणतो: ‘ठीक आहे. तुमच्या कानातली सोन्याची कुंडलं काढून माझ्यापाशी आणा.’ लोकांनी तसं केल्यावर, ती वितळवून अहरोन एक सोन्याचं वासरू बनवतो. लोक म्हणतात: ‘इजिप्तमधून आपल्याला बाहेर आणणारा, हा आपला देव आहे.’ मग इस्राएल लोक एक मोठा जलसा करून, त्या सोन्याच्या वासराची उपासना करतात.

हे पाहिल्यावर, यहोवा अतिशय रागावतो. त्यामुळे तो मोशेला म्हणतो: ‘तू तातडीनं खाली जा. लोक अतिशय वाईट वागत आहेत. माझे नियम विसरून, ते सोन्याच्या वासराच्या पाया पडताहेत.’

मोशे घाईनं पर्वतावरून उतरतो. जवळ आल्यावर त्याला काय दिसतं पाहा. लोक सोन्याच्या वासराभोवती नाच-गाणी करताहेत! मोशेला इतका राग येतो की, नियम लिहिलेल्या त्या दोन दगडी पाट्या तो जमिनीवर आपटतो; आणि त्यांचे तुकडे-तुकडे होतात. मग तो ते सोन्याचं वासरू वितळवून त्याचा चुरा करतो.

लोकांनी ही फारच वाईट गोष्ट केली आहे. त्यामुळे मोशे काही लोकांना त्यांच्या तरवारी घ्यायला सांगतो आणि म्हणतो: ‘सोन्याच्या वासराची भक्‍ती करणारे वाईट लोक मेले पाहिजेत.’ तेव्हा, ती माणसं ३,००० लोकांना तरवारीनं मारतात! त्यामुळे, कोणत्याही खोट्या देवांची नव्हे, तर फक्‍त यहोवाची उपासना करायची खबरदारी आपण घेतली पाहिजे, हे दिसून येत नाही का?