व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ४०

मोशे खडकाला मारतो

मोशे खडकाला मारतो

वर्षा मागून वर्ष जातं—१० वर्षं, २० वर्षं, ३० वर्षं, ३९ वर्षं जातात! आणि इस्राएल लोक अजून अरण्यातच आहेत. पण इतकी सगळी वर्षं यहोवा त्याच्या लोकांची काळजी घेतो. तो त्यांना मान्‍ना खाऊ घालतो. दिवसा ढगाच्या एका खांबानं आणि रात्री आगीच्या खांबानं तो त्यांना वाट दाखवतो. या सर्व वर्षांमध्ये त्यांचे कपडे विरत नाहीत, की पाय दुखत नाहीत.

इजिप्त सोडल्यापासून ४० व्या वर्षाचा हा पहिला महिना आहे. इस्राएल लोक पुन्हा कादेशला तळ देतात. सुमारे ४० वर्षांपूर्वी, कनान देश हेरण्यासाठी १२ हेर पाठवले होते, तेव्हा ते इथेच होते. मोशेची बहीण मिर्याम कादेशला मरण पावते. आणि मागल्या प्रमाणेच इथे गडबड होते.

लोकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे ते मोशेकडे तक्रार करतात: ‘आम्ही मेलो असतो तर बरं झालं असतं. तू आम्हाला मिसरातून (इजिप्त), जिथे काही उगवत नाही अशा भिकार ठिकाणी का आणलंस? इथे ना धान्य, ना अंजीरं, ना द्राक्षं, ना डाळिंबं. एवढंच काय, प्यायला पाणी देखील नाही.’

मोशे आणि अहरोन प्रार्थना करण्यासाठी निवासमंडपाकडे जातात, तेव्हा यहोवा मोशेला सांगतो: ‘लोकांना गोळा कर. त्या सर्वांच्या समक्ष, समोरच्या त्या खडकाशी बोल. लोकांना नि त्यांच्या जनावरांना पुरेल इतकं पाणी त्यातून बाहेर येईल.’

तेव्हा, मोशे लोकांना गोळा करतो अन्‌ म्हणतो: ‘देवावर विश्‍वास नसलेल्यांनो, ऐका! अहरोनानं आणि मी या खडकातून तुमच्यासाठी पाणी काढावं काय?’ मग मोशे एका काठीनं खडकाला दोनदा मारतो, तसा त्या खडकातून पाण्याचा लोंढा वाहायला लागतो. जनावरांना प्यायला आणि सर्व लोकांना पुरेल इतकं पाणी असतं.

पण यहोवाला मोशे नि अहरोनाचा राग आलेला आहे. का, ते तुम्हाला माहीत आहे? कारण, खडकातून आपण पाणी काढू, असं मोशे आणि अहरोनानं म्हटल्यामुळे. वास्तविक यहोवानं ते केलं होतं. या बाबतीत मोशे आणि अहरोनानं खरी गोष्ट सांगितली नाही म्हणून, तो त्यांना शिक्षा करणार आहे, असं यहोवा म्हणतो. तो सांगतो: ‘तुम्ही माझ्या लोकांना कनानमध्ये नेणार नाही.’

लवकरच इस्राएल लोक कादेश सोडतात. थोड्या वेळानं ते होर पर्वतापाशी येतात. इथे डोंगराच्या शिखरावर अहरोन मरण पावतो. मृत्यूच्या वेळी त्याचं वय १२३ वर्षांचं आहे. इस्राएल लोकांना फार वाईट वाटतं. त्यामुळे सर्व लोक अहरोनासाठी ३० दिवस शोक करतात. त्याचा मुलगा एलाजार इस्राएल देशाचा पुढचा महायाजक होतो.