व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ४२

गाढवी बोलते

गाढवी बोलते

गाढव बोलल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? तुम्ही म्हणाल, ‘नाही, प्राणी बोलू शकत नाहीत.’ पण बोलणाऱ्‍या एका गाढवीबद्दल बायबल आपल्याला सांगतं. हे कसं घडलं, ते पाहू या.

कनान देशात जाण्याची इस्राएलांची तयारी जवळपास झालेली आहे. मवाबाचा राजा बालाक याला इस्राएलांची भीती वाटते. त्यामुळे, इस्राएलांना शाप देण्यासाठी तो बलाम नावाच्या एका चतुर माणसाला बोलावतो. बालाक बलामाला खूप पैसे देण्याचं कबूल करतो. त्यामुळे बलाम आपल्या गाढवीवर स्वार होऊन बालाकाकडे जायला लागतो.

बलामानं आपल्या लोकांना शाप देऊ नये, अशी यहोवाची इच्छा आहे. त्यामुळे, बलामाला थांबवण्यासाठी एक मोठी तरवार घेऊन रस्त्यात उभा राहण्याकरता, तो एका देवदूताला पाठवतो. बलाम देवदूताला पाहू शकत नाही, पण गाढवीला तो दिसतो. त्यामुळे ती देवदूतापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते आणि अखेरीस रस्त्यावर लोळण घेते. बलामाला खूप राग येतो व तो काठीनं गाढवीला चोप देतो.

मग, यहोवा बलामाला त्याच्या गाढवीचं बोलणं ऐकवतो. गाढवी विचारते: ‘तू मला मारावं, असं मी केलं तरी काय?’

बलाम म्हणतो: ‘तू माझी चेष्टा केली आहेस. माझ्यापाशी तरवार असती तर मी तुला ठारच केलं असतं.’

‘या पूर्वी कधी मी तुझ्याशी अशी वागले आहे का?’ गाढवी विचारते.

‘नाही,’ बलाम उत्तरतो.

मग यहोवा, तरवार घेऊन रस्त्यात उभा असलेला देवदूत बलामाच्या नजरेस पडू देतो. देवदूत म्हणतो: ‘तू आपल्या गाढवीला का मारलंस? इस्राएलांना शाप देण्यासाठी तू जाऊ नये म्हणून, तुझा रस्ता रोखायला मी आलो आहे. तुझी गाढवी माझ्यापासून दूर गेली नसती, तर मी तुला ठार केलं असतं; पण तुझ्या गाढवीला इजा केली नसती.’

बलाम म्हणतो: ‘मी पाप केलं आहे. तू रस्त्यात उभा असल्याचं मला माहीत नव्हतं.’ देवदूत बलामाला जाऊ देतो नि बलाम बालाकाला भेटण्यासाठी जातो. इतकं सर्व होऊनही तो इस्राएलांना शाप देण्याचा प्रयत्न करतो. पण त्याऐवजी, यहोवा त्याला इस्राएलांना तीनदा आशीर्वाद द्यायला भाग पाडतो.