व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ४३

यहोशवा नेता होतो

यहोशवा नेता होतो

इस्राएलांबरोबर कनानमध्ये जाण्याची मोशेची इच्छा आहे. म्हणून तो विनंती करतो: ‘यहोवा, मला यार्देनच्या (जॉर्डन) पलिकडे जाऊ दे; आणि तो उत्तम देश पाहू दे.’ पण यहोवा म्हणतो: ‘पुरे! पुन्हा ही गोष्ट बोलू नकोस!’ यहोवा तसं का म्हणाला, ते तुम्हाला माहीत आहे?

मोशेनं खडकाला मारलं तेव्हा जे घडलं त्यामुळे. त्यानं नि अहरोनानं यहोवाचा सन्मान केला नाही, याची आठवण करा. खडकातून पाणी काढणारा यहोवा होता, हे त्यांनी लोकांना सांगितलं नाही. ह्‍या कारणानं, तो त्यांना कनान देशात जाऊ देणार नाही, असं यहोवा म्हणाला.

तेव्हा, अहरोन मरून काही महिने झाल्यावर यहोवा मोशेला सांगतो: ‘यहोशवाला एलाजार याजक आणि लोकांच्यापुढे उभा कर. आणि त्या सर्वांच्या समक्ष, यहोशवा नवा नेता असल्याचं सगळ्यांना सांग.’ तुम्हाला चित्रात दिसतं तसं, अगदी यहोवानं सांगितल्याप्रमाणे मोशे करतो.

मग यहोवा यहोशवाला सांगतो: ‘खंबीर हो, घाबरु नकोस. मी इस्राएलांना शपथपूर्वक देऊ केलेल्या कनान देशात तू त्यांना नेशील. आणि मी तुझ्याबरोबर असेन.’

त्यानंतर, मवाब देशातल्या नबो पर्वताच्या शिखरावर चढून जायला यहोवा मोशेला सांगतो. त्या उंच जागेवरुन जॉर्डनच्या पलीकडे दृष्टी टाकून मोशे कनानचा सुंदर देश पाहू शकतो. यहोवा म्हणतो: ‘जो देश अब्राहाम, इसहाक आणि याकोबाच्या संतानाला देण्याची मी शपथ वाहिली, तो हाच. तो मी तुला पाहू दिला, पण मी तुला त्यात जाऊ देणार नाही.’

तिथे नबो पर्वताच्या माथ्यावर मोशे मरण पावतो. तो १२० वर्षांचा होता. तो अजूनही सुदृढ होता नि त्याची दृष्टी चांगली होती. इस्राएल लोक फार दुःखी आहेत. मोशे मरण पावल्यामुळे ते शोक करतात. पण यहोशवा त्यांचा नवा नेता असल्याचा त्यांना आनंद आहे.