व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ४८

शहाणे गिबोनकर

शहाणे गिबोनकर

आता कनानमधली अनेक शहरं इस्राएलांविरुद्ध लढायला तयार होतात. आपण जिंकू शकू असं त्यांना वाटतं. पण जवळच्या गिबोन नगरातल्या लोकांना मात्र तसं वाटत नाही. देव इस्राएलांना मदत करत आहे, अशी त्यांची धारणा आहे. आणि त्यांना देवाविरुद्ध लढण्याची इच्छा नाही. तेव्हा, गिबोनकर काय करतात, हे तुम्हाला माहीत आहे का?

आपण कोठे तरी दूर राहतो, असं भासवायचं ते ठरवतात. म्हणून त्यांच्यातले काही लोक फाटके कपडे आणि जीर्ण जोडे घालतात. ते आपल्या गाढवांवर फाटक्या थैल्या लादतात नि सोबत शिळ्या कोरड्या भाकऱ्‍या घेतात. अन्‌ मग यहोशवाकडे जाऊन म्हणतात: ‘तुमच्या प्रतापी यहोवा देवाबद्दल ऐकून आम्ही दूर देशाहून आलो आहोत. मिसरात (इजिप्त) तुमच्यासाठी त्यानं केलेल्या सर्व गोष्टी आम्ही ऐकल्या. त्यामुळे आमच्या सरदारांनी आम्हाला प्रवासासाठी अन्‍न घ्यायला आणि तुमच्याकडे येऊन सांगायला आज्ञा केली की, “आम्ही तुमचे दास आहोत. तुम्ही आमच्याशी लढणार नाही, असं वचन द्या.” दूरच्या प्रवासानं आमचे कपडे फाटले आहेत आणि आमच्या भाकऱ्‍या शिळ्या झाल्या आहेत, हे तुम्ही पाहताच आहात.’

यहोशवा आणि इतर नेते गिबोनकरांवर विश्‍वास ठेवतात, नि म्हणून त्यांच्याविरुद्ध न लढण्याचं वचन देतात. परंतु तीन दिवसानंतर त्यांना कळतं की, वास्तविक गिबोनकर जवळपासच राहतात.

‘तुम्ही दूर देशाहून आला असल्याचं आम्हाला का सांगितलंत?’ यहोशवा त्यांना विचारतो.

गिबोनकर उत्तर देतात: ‘तुमच्या यहोवा देवानं, कनानचा हा सर्व प्रदेश तुम्हाला देण्याचं वचन दिलं असल्याचं आम्ही ऐकलं, म्हणून आम्ही असं केलं. आम्हाला भीती वाटली की, तुम्ही आम्हाला ठार कराल.’ पण इस्राएल लोक आपलं वचन पाळतात, आणि गिबोनकरांना मारत नाहीत. त्याऐवजी, ते त्यांना आपले दास करतात.

गिबोनकरांनी इस्राएलांशी समेट केल्यानं जेरूसलेमच्या राजाला राग आलेला आहे. त्यामुळे इतर चार राजांना तो म्हणतो: ‘या, गिबोनाशी लढण्यासाठी मला मदत करा.’ आणि ते पाच राजे गिबोनविरुद्ध लढायला जातात. ज्यामुळे हे पाच राजे गिबोनकरांविरुद्ध लढायला आले, असा समेट इस्राएलांशी करण्यात त्यांचा शहाणपणा होता का? ते पुढे दिसेल.