व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ४९

सूर्य स्थिर होतो

सूर्य स्थिर होतो

यहोशवाकडे पाहा. तो म्हणत आहे: ‘सूर्या स्थिर हो!’ आणि खरोखरच सूर्य स्थिर होतो. एक संपूर्ण दिवस तो आकाशाच्या मध्यभागी राहतो. यहोवा तसं घडवतो! पण सूर्य तळपत राहावा, अशी यहोशवाची इच्छा का आहे, ते पाहू या.

कनान देशातले पाच दुष्ट राजे गिबोनकरांशी लढायला लागतात तेव्हा, यहोशवाची मदत मागण्यासाठी गिबोनकर एका माणसाला पाठवतात. तो म्हणतो: ‘तातडीनं आमच्याकडे या! आम्हाला वाचवा! डोंगराळ प्रदेशातले सर्व राजे तुमच्या दासांशी लढण्यासाठी आले आहेत.’

तात्काळ यहोशवा आणि त्याची सर्व लढाऊ माणसं जातात. ते रात्रभर कूच करून गिबोनाला येतात तेव्हा, त्या पाच राजांचे सैनिक घाबरून पळायला लागतात. त्या वेळी यहोवा आकाशातून मोठमोठ्या गारा पाडतो. नि यहोशवाच्या लढाऊ माणसांनी मारलेल्यांपेक्षा गारांच्या मारामुळे जास्त सैनिक मरतात.

लवकरच सूर्य मावळेल, हे यहोशवाच्या ध्यानात येतं. अंधार होईल आणि त्या पाच दुष्ट राजांचे अनेक सैनिक निसटतील. त्याच कारणानं यहोशवा यहोवाला प्रार्थना करतो नि मग म्हणतो: ‘सूर्या स्थिर हो!’ आणि सूर्य तळपत राहिल्यामुळे इस्राएल लोक लढाई पूर्णपणे जिंकू शकतात.

देवाच्या लोकांचा तिरस्कार करणारे आणखी अनेक राजे कनानमध्ये आहेत. त्या प्रदेशातल्या ३१ राजांचा पाडाव करायला यहोशवा आणि त्याच्या सैन्याला जवळपास सहा वर्षं लागतात. ते झाल्यावर, प्रदेशाची गरज असलेल्या वंशांमध्ये कनान देशाची वाटणी करण्याकडे यहोशवा लक्ष देतो.

अनेक वर्षं जातात व अखेरीस वयाच्या ११० व्या वर्षी यहोशवा मरण पावतो. तो आणि त्याचे मित्र हयात असेपर्यंत लोक यहोवाची आज्ञा मानतात. पण ही चांगली माणसं मरण पावल्यावर लोक वाईट गोष्टी करायला लागतात आणि संकटात सापडतात. त्यावेळी मात्र त्यांना देवाच्या मदतीची खरोखर गरज असते.