व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ५०

दोन शूर स्त्रिया

दोन शूर स्त्रिया

संकटात पडल्यावर इस्राएल लोक यहोवाचा धावा करतात. त्यांच्या मदतीसाठी शूर नेते देऊन, यहोवा त्यांना उत्तर देतो. बायबल या नेत्यांना शास्ते म्हणतं. यहोशवा सर्वात पहिला शास्ता होता. त्याच्या नंतरच्या काही शास्त्यांची नावं होती अथनिएल, एहूद आणि शमगार. पण इस्राएलांना मदत करणाऱ्‍यांच्यात आहेत, दबोरा अन्‌ याएल नावाच्या दोन स्त्रिया.

दबोरा संदेशहारिका आहे. यहोवा तिला भविष्याबद्दल माहिती देतो. आणि यहोवा जे म्हणेल ते ती लोकांना सांगते. दबोरा शास्ती देखील आहे. डोंगराळ प्रदेशातल्या एका खास खजुरीखाली ती बसते व आपल्या अडचणी सोडवण्यात मदत मागण्यासाठी लोक तिच्याकडे येतात.

या काळात याबीन हा कनानचा राजा आहे. त्याच्यापाशी ९०० रथ आहेत. त्याचं सैन्य इतकं प्रबळ आहे की, अनेक इस्राएल लोकांना याबीनचं दास व्हावं लागलं आहे. याबीन राजाच्या सेनापतीचं नाव सीसरा आहे.

एका दिवशी दबोरा बाराक नावाच्या शास्त्याला बोलावते; आणि सांगते: ‘यहोवानं म्हटलं आहे: “१०,००० माणसं घेऊन ताबोर डोंगराकडे जा. तिथे मी सीसराला तुझ्याकडे आणीन; नि सीसरा व त्याच्या सैन्यावर विजय देईन.”’

बाराक दबोरेला म्हणतो: ‘तू माझ्याबरोबर आलीस तरच मी जाईन.’ दबोरा त्याच्यासोबत जाते, पण त्याला म्हणते: ‘विजयाचं श्रेय तुला मिळणार नाही. कारण यहोवा सीसराला एका स्त्रीच्या हाती देईल.’ आणि तेच घडतं.

सीसराच्या सैनिकांना तोंड देण्यासाठी बाराक ताबोर पर्वतावरुन उतरतो. अचानक एक पूर येईल असं यहोवा करतो व शत्रूचे अनेक सैनिक बुडतात. पण सीसरा त्याच्या रथातून उतरून पळून जातो.

काही वेळानं सीसरा याएलच्या डेऱ्‍यापाशी येतो. ती त्याला आत बोलावून दूध प्यायला देते. त्यामुळे गुंगी येऊन थोड्याच वेळात तो गाढ झोपतो. मग याएल, डेऱ्‍याची एक मेख घेऊन त्या दुष्ट माणसाच्या डोक्यात ठोकते. मागाहून बाराक येतो तेव्हा, मरण पावलेला सीसरा ती त्याला दाखवते! तेव्हा, दबोरेनं सांगितलेली गोष्ट खरी झाली, हे तुम्हाला दिसून येतं.

अखेरीस याबीन राजाही मारला जातो व काही काळासाठी इस्राएलांना शांती मिळते.