व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ५४

सर्वात बलवान माणूस

सर्वात बलवान माणूस

आता पर्यंतच्या सर्वात बलवान माणसाचं नाव तुम्हाला माहीत आहे का? तो आहे शमशोन नावाचा शास्ता. यहोवा त्याला शक्‍ती देतो. शमशोनाचा जन्म होण्यापूर्वीच यहोवा त्याच्या आईला सांगतो: ‘लवकरच तुला एक मुलगा होईल. इस्राएलांना फिलिस्टीन लोकांच्या हातून सोडवायला तो एकदा पुढाकार घेईल.’

फिलिस्टीनी हे कनानमध्ये राहणारे दुष्ट लोक आहेत. त्यांच्याकडे अनेक लढाऊ माणसं आहेत. ते इस्राएलांचा खरोखर फार छळ करतात. एकदा, शमशोन फिलिस्टीन लोकांच्या वस्तीकडे जात असताना, एक मोठा सिंह गर्जना करून त्याच्यावर चालून येतो. पण शमशोन केवळ हातांनी त्या सिंहाला ठार करतो. तो शेकडो दुष्ट फिलिस्टीन लोकांनाही मारतो.

पुढे शमशोन दलीला नावाच्या एका स्त्रीच्या प्रेमात पडतो. फिलिस्टीनी सरदार दलीलाला वचन देतात की, शमशोन कशानं इतका बलवान आहे, हे तिनं त्यांना सांगितलं तर, त्यांच्यातला प्रत्येक जण तिला चांदीची १,१०० नाणी देईल. दलीलाला ते सगळे पैसे हवे असतात. ती शमशोनाची अथवा देवाच्या लोकांची खरी मैत्रीण नसते. त्यामुळे, तो कशामुळे इतका बलवान आहे, हे ती शमशोनाला सतत विचारत राहते.

अखेरीस दलीला शमशोनाला त्याच्या शक्‍तीचं गुपित तिला सांगायला लावते. तो म्हणतो: ‘माझे केस कधीही कापलेले नाहीत. माझ्या जन्मापासून देवानं मला त्याचा खास सेवक, नाजीर, म्हणून निवडलं आहे. माझे केस कापले गेले तर माझी शक्‍ती जाईल.’

हे कळल्यावर, दलीला शमशोनाला आपल्या मांडीवर झोपवते. मग आत येऊन त्याचे केस कापायला ती एका माणसाला बोलावते. शमशोन जागा होतो तेव्हा, त्याची शक्‍ती गेलेली असते. मग फिलिस्टीनी येऊन त्याला धरतात. ते त्याचे दोन्ही डोळे काढतात आणि त्याला त्यांचा गुलाम बनवतात.

एका दिवशी, दागोन या त्यांच्या देवासाठी फिलिस्टीनी मोठा जलसा करतात. आणि शमशोनाची थट्टा करण्यासाठी ते त्याला तुरुंगातून बाहेर आणतात. दरम्यान शमशोनाचे केस परत वाढलेले आहेत. त्याचा हात धरून नेणाऱ्‍या मुलाला शमशोन म्हणतो: ‘या इमारतीला आधार देणाऱ्‍या खांबांना मला हात लावू दे.’ मग शक्‍ती मिळण्यासाठी शमशोन यहोवाची प्रार्थना करतो आणि खांबांना धरतो. तो मोठ्यानं ओरडतो: ‘फिलिस्टीन्यांबरोबर मलाही मरण येवो.’ त्या जलशाला ३,००० फिलिस्टीनी हजर आहेत. शमशोनानं ते खांब रेटल्यावर इमारत कोसळते आणि ते सर्व दुष्ट लोक मरतात.