व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ५५

लहान मुलगा यहोवाची सेवा करतो

लहान मुलगा यहोवाची सेवा करतो

हा लहान मुलगा फार गोड दिसतो, नाही का? त्याचं नाव शमुवेल आहे. आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवलेला माणूस आहे, इस्राएलचा महायाजक एली. शमुवेलाला एलीकडे आणणारे आहेत, त्याचे वडील एलकाना आणि आई हन्‍ना.

शमुवेल केवळ चार किंवा पाच वर्षांचा आहे. पण तो, एली नि इतर याजकांबरोबर इथे यहोवाच्या निवासमंडपात राहील. एलकाना आणि हन्‍ना, शमुवेलसारख्या लहान मुलाला यहोवाच्या निवासमंडपात सेवेला का देतील बरं? चला, पाहू या.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हन्‍ना अतिशय दुःखी-कष्टी होती. कारण, तिला मुलाची फार फार इच्छा होती पण मूल होत नव्हतं. त्यामुळे, हन्‍ना यहोवाच्या निवासमंडपाला आलेली असताना एका दिवशी तिनं प्रार्थना केली: ‘हे यहोवा, मला विसरू नकोस! तू मला एक मुलगा दिलास तर, आयुष्यभर तुझी सेवा करण्यासाठी तो तुला वाहीन, असं मी वचन देते.’

यहोवानं हन्‍नाच्या प्रार्थनेला उत्तर दिलं. काही महिन्यांनी तिनं शमुवेलाला जन्म दिला. हन्‍नाचं आपल्या छोट्या मुलावर प्रेम होतं. तो अजून लहानसा असतानाच ती त्याला यहोवाबद्दल शिकवू लागली. तिनं आपल्या नवऱ्‍याला सांगितलं: ‘शमुवेलाचं दूध तोडण्याइतका तो मोठा झाला की, यहोवाची सेवा करण्यासाठी मी त्याला निवासमंडपाला नेईन.’

तेच करत असताना हन्‍ना आणि एलकाना आपल्याला चित्रात दिसतात. आणि शमुवेलाला त्याच्या आई-वडिलांनी चांगली शिकवण दिली असल्यामुळे, यहोवाच्या मंडपात त्याची सेवा करता येण्याबद्दल तो खूश आहे. दर वर्षी हन्‍ना आणि एलकाना या विशेष तंबूत उपासनेसाठी आणि त्यांच्या लहान मुलाला भेटण्यासाठी येतात. नि दर वर्षी हन्‍ना शमुवेलासाठी स्वतः विणलेला एक नवा बिनबाह्‍यांचा झगा आणते.

जसजशी वर्षं जातात तसा शमुवेल यहोवाच्या निवासमंडपात सेवा करत राहातो; आणि यहोवा नि लोक त्याच्यावर प्रसन्‍न होतात. पण महायाजक एलीचे मुलगे, हफनी आणि फिनहास दुराचारी आहेत. ते अनेक वाईट गोष्टी करतात अन्‌ इतरांनाही यहोवाची अवज्ञा करायला लावतात. एलीनं त्यांना याजकपदावरून काढून टाकायला हवं. पण तो तसं करत नाही.

निवासमंडपात चाललेल्या वाईट गोष्टींना शमुवेल, यहोवाच्या आपल्या सेवेत आड येऊ देत नाही. पण फारच थोडे लोक यहोवावर मनापासून प्रेम करत असल्यामुळे, यहोवा कोणा माणसाशी बोलल्याला बराच काळ लोटला आहे. शमुवेल थोडा मोठा झाल्यावर काय होतं पहा:

शमुवेल निवासमंडपात झोपला असताना, एक आवाज त्याला जागा करतो. तो उत्तरतो: ‘काय आज्ञा?’ आणि उठून, पळत एलीकडे जाऊन विचारतो: ‘तुम्ही मला हाक मारलीत, काय आज्ञा?’

एली म्हणतो: ‘मी तुला हाक मारली नाही. परत जाऊन नीज.’ तेव्हा शमुवेल परत जाऊन निजतो.

मग दुसऱ्‍यांदा हाक येते: ‘शमुवेल!’ त्यामुळे शमुवेल उठतो आणि पुन्हा पळत एलीकडे जातो. ‘तुम्ही मला हाक मारली, काय आज्ञा?’ तो म्हणतो. पण एली उत्तर देतो: ‘बाळा, मी हाक मारली नाही. परत आडवा हो.’ म्हणून शमुवेल झोपायला जातो.

‘शमुवेल!’ तो आवाज तिसऱ्‍यांदा हाक मारतो. त्यामुळे शमुवेल पळत एलीकडे येतो; नि विचारतो: ‘काय आज्ञा? कारण यावेळी तुम्ही नक्कीच मला हाक मारली.’ आता एलीला समजतं की, हाक मारणारा यहोवा असला पाहिजे. त्यामुळे तो शमुवेलाला सांगतो: ‘जाऊन परत नीज. आणि त्यानं पुन्हा हाक मारली तर म्हण, “यहोवा बोल. तुझा दास ऐकतो आहे.”’

यहोवानं पुन्हा हाक मारल्यावर शमुवेल तसंच म्हणतो. मग यहोवा शमुवेलाला सांगतो की, तो एली नि त्याच्या मुलांना शिक्षा करणार आहे. पुढे हफनी आणि फिनहास फिलिस्टीन लोकांशी लढताना मरण पावतात. ते ऐकून, एली कोसळतो व मान मोडून मरण पावतो. अशा रितीनं यहोवाचं वचन खरं होतं.

शमुवेल मोठा होतो आणि इस्राएलचा शेवटचा शास्ता होतो. तो म्हातारा होतो तेव्हा, लोक त्याला विनंती करतात: ‘आमच्यावर राज्य करण्यासाठी एका राजाची निवड कर.’ वास्तविक यहोवा त्यांचा राजा असल्यामुळे, शमुवेलाला तसं करायची इच्छा नाही. पण यहोवा त्याला लोकांचं ऐकायला सांगतो.