व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ५६

शौल​—इस्राएलचा पहिला राजा

शौल​—इस्राएलचा पहिला राजा

पाहा, शमुवेल त्या माणसाच्या डोक्यावर तेल ओततो आहे. एखाद्याला राजा म्हणून निवडलं असल्याचं दाखवण्यासाठी असं करत असत. शौलाच्या डोक्यावर तेल ओतायला यहोवा शमुवेलाला सांगतो. ते सुगंधी तेल खास आहे.

आपण राजा बनण्याइतके चांगले आहोत, असं शौलाला वाटत नव्हतं. तो शमुवेलाला सांगतो: ‘इस्राएलमधल्या सर्वात लहान, बन्यामीन वंशातला मी, राजा होईन असं तुम्ही का म्हणता?’ आपण मोठे आणि श्रेष्ठ असल्याचा आव शौल आणत नसल्यानं तो यहोवाला आवडतो. आणि त्याच कारणानं, राजा होण्यासाठी तो शौलाची निवड करतो.

पण शौल काही गरीब किंवा हलका माणूस नव्हे. तो एका श्रीमंत घराण्यातला अतिशय देखणा आणि ऊंच माणूस आहे. इस्राएलातल्या इतर कोणत्याही माणसापेक्षा, तो साधारण फूटभर ऊंच आहे! तसंच तो अतिशय वेगानं धावू शकणारा आणि खूप बलवान आहे. यहोवानं शौलाला राजा म्हणून निवडल्याबद्दल लोक खूष आहेत. ते सर्व गजर करायला लागतात: ‘राजा चिरायु होवो!’

इस्राएलांचे शत्रू फार बलवान झाले आहेत. अजूनही ते इस्राएलांना खूप त्रास देताहेत. शौलाला राजा केल्यावर लवकरच अम्मोनी त्यांच्यावर स्वारी करतात. पण शौल मोठं सैन्य गोळा करतो, आणि अम्मोन्यांच्यावर विजय मिळवतो. त्यामुळे शौल राजा असल्याबद्दल लोकांना आनंद होतो.

जसजशी वर्षं जातात तसा, इस्राएलांच्या शत्रूंवर अनेक विजय मिळवून देण्यात शौल त्यांचं नेतृत्व करतो. शौलाला योनाथान नावाचा एक शूर मुलगाही असतो. अनेक लढाया जिंकायला योनाथान देखील इस्राएलांना मदत करतो. अजूनही, फिलिस्टीनी, हे इस्राएलाचे सर्वात वाईट शत्रू आहेत. एका दिवशी हजारो फिलिस्टीनी इस्राएलांशी लढाई करायला येतात.

आपण येऊन यहोवाला होमबली अथवा भेट देईपर्यंत थांबायला, शमुवेल शौलाला सांगतो. पण शमुवेलाला यायला वेळ लागतो. फिलिस्टीनी लढाई सुरु करतील अशी भीती शौलाला वाटते. त्यामुळे पुढे होऊन तो स्वतःच होमबली अर्पण करतो. अखेरीस शमुवेल येतो तेव्हा, तो शौलाला सांगतो की, त्यानं (शौलानं) अवज्ञा केली आहे. शमुवेल म्हणतो: ‘इस्राएलवर राज्य करण्यासाठी यहोवा दुसऱ्‍या माणसाला निवडेल.’

नंतर शौल पुन्हा अवज्ञा करतो. त्यामुळे शमुवेल त्याला सांगतो: ‘यहोवाला उत्तम मेंढराची भेट देण्यापेक्षा त्याची आज्ञा पाळणं अधिक बरं. तू यहोवाची आज्ञा न पाळल्यामुळे, यहोवा तुला इस्राएलवर राजा म्हणून राहू देणार नाही.

यावरून आपण चांगला धडा शिकू शकतो. नेहमी यहोवाची आज्ञा पाळणं किती महत्त्वाचं आहे, ते यावरून आपल्याला दिसतं. तसंच, एका काळी जसा शौल चांगला होता, तसा चांगला असलेला माणूस बदलून वाईट होऊ शकतो, हे देखील दिसून येतं. आपल्याला कधीही वाईट व्हायचं नाही, होय ना?