व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ५९

दावीदला का निसटलं पाहिजे

दावीदला का निसटलं पाहिजे

दाविदानं गल्याथाला मारल्यावर, इस्राएलाचा सेनापती अबनेर त्याला शौलाकडे आणतो. शौल दाविदावर अतिशय खूष आहे. तो त्याला आपल्या सैन्यातला एक सरदार करतो व राजवाड्यात राहायला नेतो.

त्यानंतर, सैन्य फिलिस्टीन लोकांशी लढून परत येतं तेव्हा, स्त्रिया गातात: ‘शौलानं हजारांना मारलं. पण दाविदानं दहा हजारांना मारलं.’ त्यामुळे शौलाला हेवा वाटू लागतो. कारण दाविदाला शौलापेक्षा जास्त मान दिला जातो. पण शौलाचा मुलगा योनाथान मत्सरी नाही. त्याचं दाविदावर प्रेम आहे व दाविदाचीही योनाथानावर प्रीती आहे. त्यामुळे ते एकमेकाला मैत्रीचं वचन देतात.

दावीद वीणा फार चांगली वाजवतो. आणि त्यानं वाजवलेलं संगीत शौलाला आवडतं. पण एका दिवशी हेव्यामुळे शौल एक भयंकर गोष्ट करतो. दावीद वीणा वाजवत असताना, शौल आपला भाला त्याच्याकडे फेकतो व म्हणतो: ‘मी दाविदाला भिंतीशी खिळीन.’ पण दावीद भाल्याचा नेम चुकवतो. पुढे दाविदाला मारलेला शौलाचा नेम पुन्हा हुकतो. त्यामुळे आता दाविदाला कळतं की, आपण फार जपून राहिलं पाहिजे.

शौलानं दिलेलं वचन तुम्हाला आठवतं का? जो माणूस गल्याथाला मारील, त्याला आपली मुलगी देईन, असं तो म्हणाला होता. अखेरीस शौल दाविदाला सांगतो की, त्याला त्याची मुलगी मिळेल. पण त्याच्या आधी त्यानं प्रतिपक्षाचे १०० फिलिस्टीनी मारले पाहिजेत. पाहा तरी! खरं तर, शौलाला आशा आहे की, फिलिस्टीनी दाविदाला मारून टाकतील. पण तसं होत नाही. तेव्हा, शौल आपली मुलगी दाविदाला बायको करून देतो.

एका दिवशी शौल योनाथानाला आणि आपल्या सर्व चाकरांना सांगतो की, दाविदाला मारण्याची त्याची इच्छा आहे. पण योनाथान आपल्या वडिलांना म्हणतो: ‘दाविदाला अपाय करू नका. त्यानं तुमचं काहीही वाईट केलेलं नाही. उलट त्यानं केलेल्या गोष्टींनी तुम्हाला फायदाच झाला आहे. गल्याथाला मारताना त्यानं आपला जीव धोक्यात टाकला. आणि ते पाहून तुम्हाला आनंद झाला होता.’

शौल आपल्या मुलाचं ऐकतो. आणि दाविदाला अपाय न करण्याचं वचन देतो. दाविदाला परत आणलं जातं आणि तो पूर्वीप्रमाणे शौलाच्या घरी त्याची सेवा करायला लागतो. परंतु एका दिवशी, दावीद संगीत वाजवत असताना शौल पुन्हा आपला भाला त्याच्यावर मारतो. दावीद नेम चुकवतो, आणि भाला भिंतीला लागतो. हे झालं तिसऱ्‍यांदा! आता दाविदाला कळतं की, आपण निसटलं पाहिजे.

त्या रात्री दावीद आपल्या घरी जातो. पण त्याला मारण्यासाठी शौल काही माणसं धाडतो. आपल्या वडिलांची योजना मीखलेला माहीत असते. त्यामुळे ती आपल्या नवऱ्‍याला सांगते: ‘तुम्ही आज पळून गेला नाहीत तर, सकाळी जिवे मारले जाल.’ त्या रात्री खिडकीतून पळून जायला मीखल दाविदाला मदत करते. शौलाला सापडू नये म्हणून, सुमारे सात वर्षं दाविदाला एकानंतर दुसऱ्‍या ठिकाणी लपावं लागतं.