व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ६०

अबीगईल आणि दावीद

अबीगईल आणि दावीद

दाविदाला भेटायला येणाऱ्‍या या सुंदर स्त्रीला तुम्ही ओळखता का? तिचं नाव आहे अबीगईल. ती चतुर आहे, नि दाविदाला एक वाईट गोष्ट करण्यापासून वाचवते. पण त्याबद्दल माहिती करून घेण्यापूर्वी, दाविदाचं काय झालं, ते पाहू या.

शौलापासून पळून गेल्यावर, दावीद एका गुहेत लपतो. त्याचे भाऊ व कुटुंबातले इतर लोक त्याला तिथं येऊन मिळतात. सुमारे ४०० लोक दाविदाकडे येतात; आणि तो त्यांचा नायक होतो. मग मवाबाच्या राजाकडे जाऊन दावीद म्हणतो: ‘माझं काय होईल ते कळेपर्यंत, कृपा करून माझ्या आई-वडिलांना तुमच्यापाशी राहू द्या.’ त्यानंतर दावीद आणि त्याची माणसं डोंगरात लपून राहू लागतात.

हे सर्व झाल्यानंतर दावीद अबीगईलेला भेटतो. तिचा नवरा नाबाल हा एक श्रीमंत जमीनदार आहे. त्याच्यापाशी ३,००० मेंढरं नि १,००० शेरडं आहेत. नाबाल हा नीच माणूस आहे. त्याची बायको अबीगईल सुंदर तर आहेच; पण शिवाय योग्य ते कसं करावं, हे तिला कळतं. एकदा तर ती आपल्या परिवारालाही वाचवते. कसं, ते पाहू या.

दावीद आणि त्याची माणसं नाबालाशी चांगुलपणानं वागली आहेत. त्यांनी त्याच्या मेंढरांचं रक्षण केलं आहे. तेव्हा नाबालाची मदत मागण्यासाठी, एका दिवशी दावीद काही माणसांना पाठवतो. नाबाल आणि त्याचे मदतनीस मेंढ्यांची लोकर कापत असताना, दाविदाची माणसं त्याच्याकडे येतात. तो मेजवानीचा दिवस असून नाबालाकडे खाण्याचे खूपसे चांगले पदार्थ आहेत. तेव्हा दाविदाची माणसं म्हणतात: ‘आम्ही तुमच्याशी सलोख्यानं वागलो आहोत. आम्ही तुमची एकही मेंढी चोरली नाही, उलट त्यांचा सांभाळ करायला मदत केली. आता कृपा करून आम्हाला काही अन्‍न द्या.’

नाबाल म्हणतो: ‘माझं अन्‍न मी तुमच्यासारख्यांना देणार नाही.’ तो फार वाईटपणानं बोलतो व दाविदाबद्दल अपशब्द काढतो. परत आल्यावर ती माणसं घडलेल्या गोष्टीविषयी दाविदाला सांगतात तेव्हा, त्याला अत्यंत संताप येतो. तो आपल्या माणसांना सांगतो: ‘आपल्या तरवारी कमरेला कसा!’ त्यानंतर ते नाबाल व त्याच्या माणसांना मारण्यासाठी निघतात.

नाबालानं काढलेले अपशब्द ज्याने ऐकले होते, असा त्याचा एक माणूस, घडलेली हकीकत अबीगईलेला सांगतो. तात्काळ अबीगईल काही अन्‍न घेते. ते गाढवांच्या पाठीवर लादून वाटेला लागते. तिला दावीद भेटतो तेव्हा, गाढवावरून उतरून, त्याला मुजरा करून, ती म्हणते: ‘महाराज, कृपा करून माझ्या नवऱ्‍याकडे लक्ष देऊ नका. तो मूर्ख असून, मूर्खासारख्या गोष्टी करतो. कृपया, ही भेट घ्या; आणि घडलेल्या गोष्टीबद्दल आम्हाला क्षमा करा.’

दावीद उत्तर देतो: ‘तू एक शहाणी स्त्री आहेस. नाबालाला त्याच्या वाईटपणाबद्दल अद्दल घडवण्यासाठी त्याला मारण्यापासून, तू मला आवरलं आहेस. आता तू सुखानं घरी जा.’ पुढे नाबाल मेल्यावर, अबीगईल दाविदाची बायको होते.