व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ६४

शलमोन मंदिर बांधतो

शलमोन मंदिर बांधतो

मरण्यापूर्वी दाविदानं शलमोनाला यहोवाचं मंदिर बांधण्यासाठी देवाकडून मिळालेला नमुना दिला. आपल्या कारकीर्दीच्या चौथ्या वर्षी, शलमोन मंदिर बांधू लागतो. आणि ते पूर्ण व्हायला साडे सात वर्षं लागतात. मंदिरावर हजारो लोक काम करतात, व त्याला खूप खूप पैसे लागतात. याचं कारण, त्यात खूप सोनं आणि चांदी वापरली आहे.

निवासमंडपाप्रमाणे, मंदिरात दोन मुख्य खोल्या आहेत. पण निवासमंडपापेक्षा त्या दुप्पट मोठ्या आहेत. मंदिराच्या आतल्या खोलीत शलमोन कराराचा कोश ठेववतो. तसंच, निवासमंडपात ठेवलेल्या इतर गोष्टी दुसऱ्‍या खोलीत ठेवल्या जातात.

मंदिर पूर्ण झाल्यावर, मोठा उत्सव करतात. तुम्हाला चित्रात दिसतो तसा, मंदिरासमोर गुडघे टेकून शलमोन प्रार्थना करतो. शलमोन यहोवाला म्हणतो: ‘स्वर्गही तुला सामावून घेण्याइतका मोठा नाही, तर या मंदिरात तू कसा सामावशील? पण माझ्या देवा, या जागेकडे तोंड करून तुझे लोक प्रार्थना करतील तेव्हा, कृपा करून तू ती ऐक.’

शलमोनाची प्रार्थना संपल्यावर, स्वर्गातून अग्नी येतो, आणि होमार्पण भस्म करतो. यहोवाकडून एक प्रखर प्रकाश मंदिर भरून टाकतो. त्यावरून, यहोवा ऐकत आहे आणि मंदिर व शलमोनाच्या प्रार्थनेबद्दल तो प्रसन्‍न आहे, हे दिसतं. आता निवासमंडपाऐवजी, मंदिरात लोक उपासनेसाठी येतात.

बराच काळ शलमोन सूज्ञतेनं राज्य करतो, आणि लोक सुखी असतात. पण शलमोन, यहोवाची उपासना न करणाऱ्‍या, इतर देशाच्या अनेक स्त्रियांशी लग्नं करतो. त्यांच्यातली एक, मूर्तीसमोर पूजा करत असलेली तुम्हाला दिसते का? शेवटी त्याच्या बायका शलमोनाकडून इतर देवांचीही उपासना करवून घेतात. शलमोनानं असं केल्यावर काय होतं, हे तुम्हाला ठाऊक आहे का? तो लोकांशी प्रेमळपणानं वागेनासा होतो. तो क्रूर होतो, आणि लोकांचा आनंद मावळतो.

यामुळे यहोवा शलमोनावर संतापतो आणि त्याला सांगतो: ‘मी राज्य तुझ्यापासून काढून घेऊन दुसऱ्‍या माणसाला देईन. मी हे तुझ्या हयातीत करणार नाही, तर तुझ्या मुलाच्या कारकीर्दीत करीन. तरी मी तुझ्या मुलापासून राज्यातले सर्व लोक तोडणार नाही.’ हे कसं होतं, पाहू या.