व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ६६

ईजबेल​—एक दुष्ट राणी

ईजबेल​—एक दुष्ट राणी

यराबाम राजा मरण पावल्यानंतर, १० वंशांच्या राज्यावर शासन करणारा प्रत्येक राजा वाईट असतो. सर्वात वाईट राजा आहे, अहाब. का, ते तुम्हाला ठाऊक आहे का? एक कारण म्हणजे, त्याची बायको, दुष्ट राणी ईजबेल.

ईजबेल इस्राएली स्त्री नव्हे. ती सिदोनच्या राजाची मुलगी आहे. ती, बआल नावाच्या खोट्या देवाची उपासना करते, व अहाब आणि अनेक इस्राएल लोकांनाही त्याची उपासना करायला लावते. ईजबेल यहोवाचा तिटकारा करते आणि त्याच्या बऱ्‍याच संदेष्ट्यांना मारते. मारले जाऊ नये म्हणून, इतर संदेष्टे गुहांमध्ये लपतात. ईजबेलीला काही हवं असेल तर, ते मिळवण्यासाठी ती एखाद्याला मारीलही.

एका दिवशी अहाब राजा फार उदास आहे. म्हणून ईजबेल त्याला विचारते: ‘आज तुम्ही उदास का आहात?’

अहाब उत्तर देतो: ‘नाबोथ मला जे बोलला, त्यामुळे. मला त्याचा मळा विकत घ्यायचा होता. पण तो मला देणार नाही म्हणाला.’

‘काळजी करू नका. मी तो तुमच्यासाठी मिळवीन,’ ईजबेल म्हणते.

तेव्हा, ईजबेल, नाबोथ राहातो त्या गावातल्या काही महत्त्वाच्या लोकांना पत्रं लिहिते. ती त्यांना सांगते: ‘नाबोथानं देवाचा आणि राजाचा घिक्कार केला, असं म्हणायला काही उडाणटप्पू माणसांना सांगा. मग नाबोथाला गावाबाहेर नेऊन मरेपर्यंत दगडमार करा.’

नाबोथ मरण पावल्याचं कळल्याबरोबर, ईजबेल अहाबाला म्हणते: ‘आता जा आणि त्याचा मळा ताब्यात घ्या.’ अशी भयंकर गोष्ट केल्याबद्दल ईजबेलीला शिक्षा झाली पाहिजे, असं तुम्हालाही वाटत नाही का?

त्यामुळे, वेळ आल्यावर, तिला शिक्षा करण्यासाठी यहोवा, येहू नावाच्या माणसाला पाठवतो. येहू येत आहे असं ऐकल्यावर, सुंदर दिसावं म्हणून ईजबेल डोळ्यात काजळ घालते आणि नट्टा-पट्टा करते. पण येहू येतो आणि खिडकीत ईजबेलीला पाहातो तेव्हा, तो राजवाड्यातल्या लोकांना आवाज देतो: ‘तिला खाली टाका!’ तुम्हाला चित्रात दिसतं त्याप्रमाणे, ते त्याची आज्ञा पाळतात. ते तिला खाली टाकतात आणि ती मरते. असा, दुष्ट राणी ईजबेलचा अंत होतो.