व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ६८

पुन्हा जिवंत झालेले दोन मुलगे

पुन्हा जिवंत झालेले दोन मुलगे

तुम्ही मरण पावलात आणि तुम्हाला परत जिवंत केलं गेलं तर, तुमच्या आईला कसं वाटेल? तिला अत्यंत आनंद होईल! पण मेलेला माणूस परत जिवंत होऊ शकतो का? पूर्वी कधी असं झालं आहे का?

हा माणूस, ती स्त्री आणि त्या लहानशा मुलाकडे पहा. तो माणूस आहे एलीया संदेष्टा. ती स्त्री सारफथ गावची एक विधवा आणि तो लहानगा, तिचा मुलगा आहे. एका दिवशी तो मुलगा आजारी पडतो. त्याचं दुखणं वाढत जातं आणि शेवटी तो मरतो. मग एलीया त्या स्त्रीला सांगतो: ‘तो मुलगा मला दे.’

मेलेल्या मुलाला घेऊन एलीया माडीवर जातो आणि त्याला खाटेवर ठेवतो. मग तो प्रार्थना करतो: ‘हे यहोवा, या मुलाला जिवंत कर.’ आणि मुलगा श्‍वासोच्छ्‌वास करायला लागतो! तेव्हा, एलीया त्याला खाली नेतो व त्या स्त्रीला म्हणतो: ‘पाहा, तुझा मुलगा जिवंत आहे!’ याच कारणानं ती आई इतकी आनंदात आहे.

यहोवाच्या आणखी एका महत्त्वाच्या संदेष्ट्याचं नाव आहे, अलीशा. एलीयाचा मदतनीस म्हणून तो काम करतो. पण पुढे, चमत्कार करण्यासाठी यहोवा अलीशाचाही उपयोग करतो. एका दिवशी अलीशा शूनेम नावाच्या गावी जातो. तिथे एक स्त्री त्याच्याशी प्रेमळपणानं वागते. पुढे या स्त्रीला एक मुलगा होतो.

मुलगा जरा मोठा झाल्यावर, एका दिवशी सकाळी, शेतात काम करणाऱ्‍या त्याच्या वडिलांकडे जातो. अचानक मुलगा कण्हत म्हणू लागतो: ‘माझं डोकं दुखतं!’ त्याला घरी नेल्यावर, तो मरतो. त्याची आई किती खिन्‍न होते! तात्काळ जाऊन ती अलीशाला घेऊन येते.

अलीशा येतो आणि मेलेलं मूल असलेल्या खोलीत जातो. तो यहोवाला प्रार्थना करतो आणि मेलेल्या मुलावर आडवा होतो. लवकरच त्या मुलाच्या शरीरात ऊब येते आणि तो सात वेळा शिंकतो. आत आल्यावर, आपला मुलगा जिवंत आहे, असं पाहून त्याच्या आईला किती आनंद होतो!

अनेक लोक मेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातले लोक व मित्र दु:खी झाले आहेत. मेलेल्यांना उठवण्याची शक्‍ती आपल्यापाशी नाही. पण यहोवापाशी आहे. तो लाखो लोकांना कसा परत जिवंत करील, हे आपण पुढे पाहू.