व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ७०

योना व मोठा मासा

योना व मोठा मासा

पाण्यातल्या या माणसाकडे पाहा. तो मोठ्या संकटात आहे, नाही का? तो मासा आता अगदी त्याला गिळायच्या बेतात आहे! हा माणूस कोण, ते तुम्हाला माहीत आहे का? त्याचं नाव आहे योना. तो इतक्या संकटात कसा पडला, ते पाहू या.

योना हा यहोवाचा एक संदेष्टा आहे. अलीशा संदेष्ट्याच्या मरणानंतर लवकरच यहोवा योनाला सांगतो: ‘निनवे महानगराला जा. तिथल्या लोकांचा दुष्टपणा फार झाला आहे. तू त्यांच्याशी त्याबद्दल बोलावं, अशी माझी इच्छा आहे.’

पण योनाला जाण्याची मुळीच इच्छा नाही. तेव्हा, निनवेहून उलट्या दिशेला जाणाऱ्‍या जहाजात तो चढतो. योनाचं पळून जाणं यहोवाला आवडलेलं नाही. त्यामुळे तो एक मोठं वादळ घडवून आणतो. ते इतकं वाईट आहे की, जहाजाला बुडण्याचा धोका असतो. खलाशी खूप घाबरलेले असतात व मदतीसाठी आपल्या देवांचा धावा करतात.

अखेरीस योना त्यांना सांगतो: ‘आकाश आणि पृथ्वी बनवणाऱ्‍या यहोवा देवाची मी उपासना करतो. यहोवानं सांगितलेलं काम करण्यापासून मी पळून चाललो आहे.’ त्यामुळे खलाशी विचारतात: ‘हे वादळ थांबवण्यासाठी आम्ही तुझं काय करावं?’

‘मला समुद्रात टाका, म्हणजे समुद्र शांत होईल,’ योना म्हणतो. खलाशांना तसं करायची इच्छा नाही. पण वादळ आणखी खवळू लागल्यावर, शेवटी ते योनाला समुद्रात टाकतात. तात्काळ वादळ थांबतं आणि समुद्र पुन्हा शांत होतो.

योना पाण्यात बुडत असताना हा मोठा मासा त्याला गिळतो. पण योना मरत नाही. तीन दिवस व तीन रात्री तो त्या माशाच्या पोटात असतो. आपण यहोवाचं ऐकलं नाही व निनवेला गेलो नाही, याचं योनाला फार वाईट वाटतं. त्यामुळे तो काय करतो, ते तुम्हाला माहीत आहे का?

मदतीसाठी योना यहोवाची प्रार्थना करतो. मग माशानं योनाला कोरड्या जमिनीवर ओकून टाकावं, असं यहोवा करतो. त्यानंतर योना निनवेला जातो. यावरून, जे काही यहोवा म्हणतो, ते करणं अतिशय महत्त्वाचं आहे, हे आपल्याला शिकता येतं, नाही का?

बायबलमधलं योनाचं पुस्तक.