व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ७३

इस्राएलचा शेवटला गुणी राजा

इस्राएलचा शेवटला गुणी राजा

योशीया दक्षिणेच्या दोन वंशांच्या राज्याचा राजा होतो तेव्हा, फक्‍त आठ वर्षांचा असतो. राजा व्हायला हे फारच लहान वय आहे. त्यामुळे सुरवातीला काही वयस्कर लोक, राज्यावर शासन करायला त्याला मदत करतात.

योशीयाला राजा होऊन सात वर्षं लोटल्यावर तो यहोवाचा शोध घेऊ लागतो. तो, दावीद, यहोशाफाट आणि हिज्कीया यांच्या उदाहरणाप्रमाणे चालतो. मग, विशीच्या आत असतानाच योशीया एक धाडसी काम करतो.

बऱ्‍याच काळापर्यंत इस्राएली लोक फार वाईट वागले आहेत. ते खोट्या देवांची उपासना करतात. ते मूर्तींना दंडवत घालतात. या कारणांमुळे, योशीया आपल्या माणसांसकट जातो आणि देशातून खोटी उपासना निपटून काढायला लागतो. अनेक लोक खोट्या देवांची उपासना करत असल्यामुळे, हे काम फारच मोठं आहे. योशीया आणि त्याची माणसं मूर्ती तोडताना इथे तुम्हाला दिसतात.

त्यानंतर, यहोवाच्या मंदिराची डागडूजी करण्यासाठी योशीया तीन माणसांना नेमतो. लोकांकडून पैसे गोळा केले जातात आणि जरूर त्या कामाची मजुरी देण्यासाठी, या माणसांच्या हातात देतात. मंदिराचं काम करत असताना, महायाजक हिल्कीया याला तिथे एक फार महत्त्वाची गोष्ट सापडते. ते तर, खूप खूप वर्षांपूर्वी यहोवानं मोशेला लिहायला सांगितलेलं नियमशास्त्राचं पुस्तक आहे. अनेक वर्षं ते हरवलं होतं.

ते पुस्तक योशीयाकडे नेलं जातं व तो ते वाचून दाखवायला सांगतो. ते ऐकत असताना योशीयाला दिसून येतं की, लोक यहोवाचे नियम पाळत नाहीत. या गोष्टीचं त्याला फार वाईट वाटतं. आणि त्यामुळे इथे तुम्हाला दिसतं त्याप्रमाणे, तो आपले कपडे फाडतो. तो म्हणतो: ‘या पुस्तकात लिहीलेले नियम आपल्या वाडवडिलांनी न पाळल्यामुळे यहोवा आपल्यावर रागावला आहे.’

यहोवा त्यांना काय करणार आहे, ते शोधून काढायला योशीया हिल्कीया महायाजकाला आज्ञा देतो. हिल्कीया हुल्दा नावाच्या संदेष्ट्रीकडे जाऊन तिला विचारतो. योशीयाला देण्यासाठी ती त्याला यहोवाकडून असा निरोप देते: ‘त्यांनी खोट्या देवांची उपासना केल्यामुळे आणि देश दुष्टाईनं भरल्यामुळे, जेरूसलेम आणि सर्व लोकांना शिक्षा होईल. पण योशीया, तू चांगलं ते केल्यामुळे, ही शिक्षा तुझ्या मरणाच्या आधी येणार नाही.’