व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ७४

एक निडर माणूस

एक निडर माणूस

पाहा, लोक या तरुणाची टर उडवताहेत. तो कोण, हे तुम्हाला माहीत आहे का? हा यिर्मया आहे. तो देवाचा एक फार महत्त्वाचा संदेष्टा आहे.

योशीया राजानं देशातल्या मूर्ती नष्ट करायला सुरवात केल्यावर लवकरच, यहोवा यिर्मयाला आपला संदेष्टा व्हायला सांगतो. संदेष्टा व्हायला आपण फार लहान आहोत, असं यिर्मयाला वाटतं. पण यहोवा त्याला सांगतो की, तो त्याला मदत करील.

इस्राएल लोकांनी दुष्टपणा करायचं थांबवावं, असं यिर्मया त्यांना सांगतो. तो म्हणतो: ‘इतर देशांचे लोक ज्यांची उपासना करतात, ते देव खोटे आहेत.’ पण अनेक इस्राएल लोक खरा देव यहोवा याच्या ऐवजी, मूर्तींची उपासना करणं पसंत करतात. त्यांच्या दुष्टपणासाठी देव त्यांना शिक्षा देईल, असं यिर्मया लोकांना सांगतो तेव्हा, ते नुसते त्याला हसतात.

अनेक वर्षं उलटतात, योशीया मरण पावतो आणि तीन महिन्यांनी त्याचा मुलगा यहोयाकीम राजा होतो. यिर्मया लोकांना सांगत राहतो: ‘तुम्ही आपलं वाईट वागणं सुधारलं नाही तर, जेरूसलेमचा नाश होईल.’ तेव्हा याजक यिर्मयाला धरतात आणि दटावतात: ‘अशा गोष्टी बोलल्याबद्दल तुला मारून टाकलं पाहिजे.’ मग ते जेरूसलेमच्या सरदारांना सांगतात: ‘यिर्मया आपल्या गावाविरुद्ध बोलला आहे म्हणून त्याला मारलंच पाहिजे.’

आता यिर्मया काय करील? तो घाबरलेला नाही! तो त्या सर्वांना सांगतो: ‘या गोष्टी सांगण्यासाठी यहोवानं मला तुमच्याकडे पाठवलं. तुम्ही आपलं वागणं सुधारलं नाही तर, यहोवा जेरूसलेमचा नाश करील. एक गोष्ट मात्र पक्की ध्यानात ठेवा: तुम्ही मला मारलंत तर, एका निर्दोष माणसाचा जीव घ्याल.’

सरदार यिर्मयाला जगू देतात. पण इस्राएल लोक आपली वागणूक बदलत नाहीत. पुढे बॅबिलोनचा राजा नबुखद्‌नेस्सर येतो आणि जेरूसलेमवर हल्ला करतो. अखेर, नबुखद्‌नेस्सर इस्राएलांना आपले दास करतो. हजारो लोकांना तो बॅबिलोनला नेतो. विचार करा, अनोळखी लोक येऊन तुम्हाला अनोळखी देशात घेऊन गेले तर, कसं वाटेल!