व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ७५

बॅबिलोनमध्ये चार मुलगे

बॅबिलोनमध्ये चार मुलगे

नबुखद्‌नेस्सर राजा सर्व सुशिक्षित इस्राएल लोकांना बॅबिलोनला नेतो. त्यानंतर तो त्यातल्या सर्वात देखण्या व हुशार तरुणांना निवडतो. इथे तुम्हाला त्यांच्यातले चार जण दिसताहेत. एक आहे दानीएल, आणि इतर तिघांना बॅबिलोनचे लोक शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो म्हणतात.

आपल्या राजवाड्यात त्या तरुणांना तैनातीला ठेवण्याचा नबुखद्‌नेस्सराचा इरादा आहे. तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर, समस्या सोडवण्यात आपल्या मदतीसाठी, फक्‍त सर्वात हुशार मुलांची निवड तो करील. त्यांचं प्रशिक्षण चालू असताना, मुलं बलवान आणि निरोगी असावी, अशी राजाची इच्छा आहे. त्यामुळे, त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मिळणारं चमचमीत अन्‍न आणि द्राक्षारस, त्या सर्वांना देण्याची आज्ञा तो आपल्या चाकरांना देतो.

तरुण दानीएलकडे पाहा. नबुखद्‌नेस्सराच्या सेवकांचा नायक अश्‍पनज याला तो काय म्हणतो आहे, ते तुम्हाला माहीत आहे का? राजाच्या अन्‍नातल्या चमचमीत गोष्टी खाण्याची आपली इच्छा नाही, असं दानीएल त्याला सांगतो आहे. पण अश्‍पनज काळजीत पडला आहे. तो म्हणतो: ‘तुम्ही काय खावं आणि काय प्यावं, हे राजानं ठरवलं आहे. तुम्ही जर इतर तरुणांच्या इतके निरोगी दिसला नाहीत तर, तो माझा जीव घेण्याचा संभव आहे.’

त्यामुळे अश्‍पनजानं तो आणि त्याच्या तीन मित्रांवर नेमलेल्या कारभाऱ्‍याकडे दानीएल जातो. तो म्हणतो: ‘कृपा करून १० दिवस आमची परीक्षा करा. आम्हाला खायला काही भाज्या आणि प्यायला पाणी द्या. मग राजाचं अन्‍न खाणाऱ्‍या तरुण मुलांशी आमची तुलना करा, आणि कोण बरं दिसतं ते पाहा.’

तसं करायला कारभारी तयार होतो. १० दिवस झाल्यावर, दानीएल आणि त्याचे तीन मित्र इतर सर्व तरुण मुलांपेक्षा निरोगी दिसतात. त्यामुळे तो कारभारी, त्यांना राजानं पुरवलेल्या अन्‍नाऐवजी भाज्या खाऊ देतो.

तीन वर्षांनी सर्व तरुणांना नबुखद्‌नेस्सरापुढे नेलं जातं. त्या सर्वांशी बोलल्यानंतर, दानीएल आणि त्याचे तीन मित्र सर्वात हुशार असल्याचं राजाला दिसून येतं. त्यामुळे तो, आपल्या मदतीसाठी त्यांना राजवाड्यात ठेवून घेतो. जेव्हा जेव्हा दानीएल, शद्रख मेशख आणि अबेद्‌नगो यांना राजा प्रश्‍न विचारतो किंवा कठीण समस्या सोडवायला सांगतो तेव्हा, त्याच्या कोणत्याही याजकापेक्षा अथवा ज्ञान्यांपेक्षा त्यांना दसपट ज्ञान असतं.