व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ७८

भिंतीवरचं लिखाण

भिंतीवरचं लिखाण

इथे काय होत आहे? लोकांची मोठी मेजवानी चालली आहे. बॅबिलोनच्या राजानं एक हजार प्रतिष्ठित पाहुण्यांना बोलावलं आहे. जेरूसलेममधल्या यहोवाच्या मंदिरातून आणलेले सोन्या-चांदीचे प्याले आणि भांडी ते वापरताहेत. पण अचानक, माणसाच्या हाताची बोटं हवेत प्रकट होतात आणि भिंतीवर लिहू लागतात. सर्वजण घाबरले आहेत.

नबुखद्‌नेस्सराचा नातू बेलशस्सर आता राजा आहे. तो ओरडून ज्ञानी लोकांना आणायला सांगतो. राजा म्हणतो: ‘जो कोणी हा लेख वाचू शकेल, आणि त्याचा अर्थ मला सांगू शकेल, त्याला खूप देणग्या दिल्या जातील आणि राज्यातला तिसरा अधिपती केलं जाईल.’ पण त्या ज्ञान्यांच्यातल्या एकालाही भिंतीवरचा लेख वाचता येत नाही, की त्याचा अर्थ सांगता येत नाही.

तो गलबला ऐकून राजाची आई त्या मोठ्या जेवणघरात येते. ती राजाला सांगते: ‘घाबरू नका. पवित्र देवांना जाणणारा एक माणूस आपल्या राज्यात आहे. आपले आजोबा नबुखद्‌नेस्सर राजे असताना, त्यांनी त्याला सर्व ज्ञान्यांचा प्रमुख केलं होतं. त्याचं नाव दानीएल आहे. त्याला बोलवा म्हणजे, या सर्वाचा अर्थ तो आपल्याला सांगेल.’

तेव्हा तात्काळ दानीएलाला आणलं जातं. देणग्या घेण्याचं नाकारल्यानंतर, बेलशस्सराचे आजोबा नबुखद्‌नेस्सर याला यहोवानं एकदा राजपदावरून का काढून टाकलं होतं, हे दानीएल सांगू लागतो. दानीएल म्हणतो: ‘तो फार गर्विष्ठ होता. आणि त्यामुळे यहोवानं त्याला शिक्षा केली.’

तो बेलशस्सराला सांगतो: ‘त्याचं काय झालं ते सर्व तुला माहीत होतं. तरीही, नबुखद्‌नेस्सराप्रमाणे तू गर्विष्ठ आहेस. यहोवाच्या मंदिरातले प्याले व भांडी आणून तू त्यातून प्यालास. लाकूड आणि दगडांनी बनवलेल्या देवांची तू स्तुती केलीस आणि आपल्या महान निर्मात्याला तू मान दिला नाहीस. त्याच कारणामुळे, हे शब्द लिहिण्यासाठी देवानं हात पाठवला.’

दानीएल म्हणतो: ‘लेख असा आहे: मने, मने तकेल आणि ऊफारसीन.

मने म्हणजे देवानं तुझ्या राज्याचा काळ मोजून त्याचा शेवट केला आहे. तकेल म्हणजे तुला तागडीत तोललं आणि तू चांगला नाहीस असं दिसलं. ऊफारसीन म्हणजे तुझं राज्य मेदी आणि पारसी (पर्शियन) यांना दिलं आहे.’

दानीएल बोलत असतानाच मेदी व पर्शियन लोकांनी बॅबिलोनवर हल्ला सुरु केला आहे. ते शहर काबीज करतात आणि बेलशस्सराला जिवे मारतात. भिंतीवरचं लिखाण त्याच रात्री खरं होतं! आता इस्राएल लोकांचं काय होईल? ते आपल्याला लवकरच कळेल. पण त्याआधी दानीएलाचं काय होतं, पाहू या.