व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ७९

सिंहांच्या गुहेत दानीएल

सिंहांच्या गुहेत दानीएल

अरे बापरे! दानीएल मोठ्या संकटात असल्यासारखा दिसतो. पण सिंह त्याला मुळीच त्रास देत नाहीत! का, ते तुम्हाला माहीत आहे का? दानीएलाला या सगळ्या सिंहांमध्ये कोणी टाकलं बरं? चला पाहू या.

दारयावेश नावाचा माणूस आता बॅबिलोनचा राजा आहे. दानीएल अतिशय दयाळू आणि बुद्धिमान असल्यामुळे, दारयावेशाला तो फार आवडतो. आपल्या राज्यातला एक प्रमुख शासक म्हणून दारयावेश दानीएलाची निवड करतो. त्यामुळे राज्यातली इतर माणसं त्याचा हेवा करायला लागतात, आणि काय करतात पाहा.

ते दारयावेशाकडे जाऊन म्हणतात: ‘हे राजा, ३० दिवस कोणीही तुझ्याखेरीज कोणत्याही देवाची अथवा माणसाची प्रार्थना करू नये, याविषयी आम्ही एकमत झालो आहोत. एखाद्यानं अवज्ञा केल्यास त्याला सिंहांच्या गुहेत टाकलं जावं.’ या लोकांना असा कायदा का हवा आहे, ते दारयावेशाला ठाऊक नाही. पण ही कल्पना बरी आहे असा विचार करून, तो असा कायदा नमूद करवतो. आता तो कायदा बदलता येत नाही.

त्या कायद्याबद्दल दानिएलाला समजतं तेव्हा, तो घरी जातो आणि नेहमीप्रमाणे प्रार्थना करतो. दानीएल यहोवाची प्रार्थना करण्याचं थांबवणार नाही, हे त्या दुष्ट माणसांना ठाऊक होतं. दानीएलाचा काटा काढण्याची त्यांची योजना सफल होण्याची लक्षणं दिसत असल्यानं ते खूष आहेत.

या माणसांना हा कायदा का करायचा होता, ते दारयावेश राजाला कळतं तेव्हा तो अतिशय खिन्‍न होतो. परंतु त्याला कायदा बदलता येत नसल्यामुळे, दानीएलाला सिंहांच्या गुहेत टाकण्याची आज्ञा त्याला द्यावी लागते. पण राजा दानीएलाला सांगतो: ‘तू ज्या देवाची सेवा करतोस, तो तुला वाचवील, अशी मी आशा करतो.’

दारयावेश इतका बेचैन होतो की, त्याला त्या रात्री झोप येत नाही. दुसऱ्‍या दिवशी सकाळी तो सिंहांच्या गुहेकडे धावतो. इथे चित्रात तो तुम्हाला दिसतो. तो मोठ्याने आवाज देतो: ‘जिवंत देवाच्या सेवका, दानीएला! तू ज्याची सेवा करतोस तो देव, तुला सिंहांपासून वाचवू शकला का?’

दानीएल उत्तरतो: ‘देवानं त्याचा दूत पाठवला; आणि सिंहांची तोंडं बंद केली. त्यामुळे त्यांनी मला इजा केली नाही.’

राजाला अतिशय आनंद होतो. तो, त्याला गुहेतून बाहेर काढण्याची आज्ञा देतो. त्यानंतर, दानिएलाचा काटा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या दुष्ट माणसांना, तो सिंहांपुढे टाकवतो. ते गुहेच्या तळाला पोहंचण्यापूर्वीच सिंह त्यांना धरतात आणि त्यांची सगळी हाडं मोडतात.

मग दारयावेश राजा आपल्या साम्राज्यातल्या सर्व लोकांना कळवतो: ‘प्रत्येकानं दानीएलाच्या देवाचा आदर करावा, अशी आज्ञा मी देतो. तो मोठे चमत्कार करतो. त्यानंच दानीएलाला सिंहांनी खाण्यापासून वाचवलं.’