व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ८२

मर्दखय आणि एस्तेर

मर्दखय आणि एस्तेर

एज्रा जेरूसलेमला जाण्यापूर्वी काही वर्षं काय झालं पाहू या. पर्शिया राज्यात, मर्दखय आणि एस्तेर हे सर्वात महत्त्वाचे इस्राएली आहेत. एस्तेर ही राणी असून, तिचा चुलत भाऊ मर्दखय, अधिकारानं फक्‍त राजाच्या खालोखाल आहे. हे कसं झालं, ते पाहू या.

एस्तेर फार लहान असताना तिचे आई-वडील मरण पावले. त्यामुळे मर्दखयानं तिला लहानाची मोठी केली आहे. शूशन शहरात पर्शियाचा राजा अहश्‍वेरोश याचा राजवाडा आहे. आणि मर्दखय त्याचा एक दास आहे. एके दिवशी, राजाची बायको वश्‍ती, राजाची आज्ञा पाळत नाही. म्हणून आपली राणी होण्यासाठी, राजा एका नव्या बायकोची निवड करतो. त्यानं निवडलेली स्त्री तुम्हाला माहीत आहे का? होय, ती आहे, सुंदर आणि तरुण एस्तेर.

लोक ज्याला दंडवत घालताहेत, तो हा गर्विष्ठ माणूस तुम्ही पाहिलात का? हा आहे हामान. पर्शियामध्ये हा खूप प्रतिष्ठित माणूस आहे. मर्दखयानं आपल्यालाही दंडवत घालावं अशी हामानाची इच्छा आहे. तिथे बसलेला मर्दखय तुम्हाला दिसतो. पण मर्दखय तसं करत नाही. असल्या दुष्ट माणसाला दंडवत घालणं बरोबर आहे, असं त्याला वाटत नाही. त्यामुळे हामान चिडतो, आणि काय करतो पाहा.

हामान इस्राएलांच्या विरुद्ध राजाला खोटं-नाटं सांगतो. तो म्हणतो: ‘ते, तुमचे कायदे न पाळणारे दुष्ट लोक आहेत. त्यांना मारून टाकलं पाहिजे.’ आपली राणी एस्तेर इस्राएली असल्याच, अहश्‍वेरोशाला माहीत नाही. त्यामुळे तो हामानाचं ऐकतो; आणि असा कायदा बनवतो की, एका विशिष्ट दिवशी सर्व इस्राएल लोकांना मारावं.

त्या कायद्याबद्दल ऐकल्यावर मर्दखय फार अस्वस्थ होतो. तो एस्तेरला निरोप पाठवतो: ‘तू ही गोष्ट राजाला जरूर सांग, आणि आपल्याला वाचवण्याची विनंती त्याला कर.’ आमंत्रण आलेलं नसताना राजाला भेटायला जाणं, पारसाच्या कायद्याविरुद्ध आहे. पण आमंत्रण नसताना एस्तेर भेटायला जाते. तिच्यासाठी राजा आपला सुवर्णदंड पुढे करतो. याचा अर्थ, तिला मरणाची शिक्षा देऊ नये. एस्तेर, राजा आणि हामानाला एका मोठ्या मेजवानीला बोलावते. तिथे, तिचं काय मागणं आहे, असं राजा एस्तेरला विचारतो. एस्तेर म्हणते की, राजा आणि हामान दुसऱ्‍या दिवशी आणखी एका मेजवानीला आले तर, ती, काय हवं ते त्याला सांगेल.

त्या मेजवानीच्या वेळी एस्तेर राजाला सांगते: ‘माझ्या लोकांना आणि मला मारलं जाणार आहे.’ राजाला राग येतो. ‘असं करण्याची कोणाची हिंमत आहे?’ तो विचारतो.

‘हा विरोधी आणि हा शत्रू कोण म्हणाल तर, हा दुष्ट हामानच!’ एस्तेर म्हणते.

आता मात्र राजा भयंकर संतापतो. हामानाला मारून टाकण्याची आज्ञा तो देतो. त्यानंतर, राजा मर्दखयाला आपल्या खालोखालचा अधिकारी नेमतो. ज्या दिवशी इस्राएलांना मारायचं ठरलेलं असतं, त्या दिवशी, त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी लढण्याची परवानगी देणारा नवा कायदा मर्दखय बनवून घेतो. आता मर्दखय इतका मोठा माणूस झाल्यानं अनेक लोक इस्राएलांना मदत करतात; आणि त्यांचा आपल्या शत्रूंपासून बचाव होतो.

बायबलमधलं एस्तेर नावाचं पुस्तक.