व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ८३

जेरूसलेमच्या वेशी

जेरूसलेमच्या वेशी

इथे चाललेल्या कामाच्या गडबडीकडे पाहा. इस्राएल लोक जेरूसलेमच्या वेशी बांधण्यात गुंतले आहेत. १५२ वर्षांपूर्वी नबुखद्‌नेस्सर राजानं जेरूसलेमचा नाश केला तेव्हा, त्यानं वेशी पाडल्या आणि शहराचे दरवाजे जाळून टाकले. बॅबिलोनहून सुरवातीला घरी परतल्यावर इस्राएलांनी वेशी परत बांधल्या नाहीत.

शहराभोवती वेस नसताना, इतकी वर्षं इथे राहायला, लोकांना कसं वाटलं असेल, असं तुम्हाला वाटतं? त्यांना सुरक्षित वाटलेलं नाही. त्यांचे शत्रू सहज येऊन त्यांच्यावर हल्ला करू शकत होते. पण अखेरीस, नहेम्या नावाचा हा माणूस, पुन्हा वेशी बांधायला, आता लोकांना मदत करत आहे. नहेम्या कोण, ते तुम्हाला ठाऊक आहे का?

मर्दखय आणि एस्तेर राहतात त्याच शूशन शहराचा, नहेम्या हा एक इस्राएली आहे. तो राजवाड्यात काम करत असे. त्यामुळे कदाचित, मर्दखय आणि एस्तेर राणीचा तो चांगला मित्र असेल. पण एस्तेरच्या नवऱ्‍याकडे, अहश्‍वेरोश राजाच्या पदरी नहेम्यानं काम केलं, असं बायबल म्हणत नाही. त्याच्या नंतरचा राजा अर्तहशश्‍त याच्या पदरी तो होता.

यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती करण्याकरता, जेरूसलेमला नेण्यासाठी ते सर्व धन एज्राला देणारा चांगला राजा, अर्तहशश्‍त होय, याची आठवण करा. पण एज्रानं शहराच्या मोडलेल्या वेशी बांधल्या नाहीत. ते काम नहेम्यानं करण्याची वेळ कशी आली, ते आपण पाहू या.

अर्तहशश्‍तानं मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी एज्राला पैसे दिल्याला १३ वर्षं झाली आहेत. आता नहेम्या अर्तहशश्‍त राजाचा प्रमुख प्यालेबरदार आहे. याचा अर्थ, तो राजाला द्राक्षारस देतो. व कोणीही राजाला विष देणार नाही, याची खबरदारी घेतो. ते काम फार महत्त्वाचं आहे.

एका दिवशी, नहेम्याचा भाऊ हनानी आणि यहूदाहून आलेले इतर काही लोक, नहेम्याला भेटायला येतात. इस्राएलांना होणारा त्रास आणि जेरूसलेमच्या वेशी कशा अजूनही मोडलेल्या आहेत, याबद्दल ते त्याला सांगतात. त्यामुळे नहेम्याला फार दुःख होतं; आणि तो त्याबद्दल यहोवाची प्रार्थना करतो.

नहेम्या उदास असल्याचं, एका दिवशी राजाच्या लक्षात येतं, व तो विचारतो: ‘तू इतका उदास का आहेस?’ नहेम्या सांगतो की, जेरूसलेमला अवकळा आल्यामुळे, आणि तिथल्या वेशी पडलेल्या असल्यामुळे. ‘तुझी काय विनंती आहे?’ राजा विचारतो.

नहेम्या म्हणतो: ‘मला जेरूसलेमला जाऊ द्या. म्हणजे मी वेशी परत बांधीन.’ अर्तहशश्‍त राजा खूप दयाळू आहे. तो नहेम्याला जाऊ देतो. आणि त्यातलं काही बांधकाम करायला लाकूड मिळवण्यासाठी, त्याला मदत करतो. जेरूसलेमला पोहंचल्यावर लवकरच नहेम्या लोकांना आपल्या योजनेबद्दल सांगतो. त्यांना ती कल्पना आवडते, व ते म्हणतात: ‘चला, आपण बांधकामाची सुरवात करू या.’

वेशीचं बांधकाम चाललेलं इस्राएलांच्या शत्रूंना दिसतं, तेव्हा ते म्हणतात: ‘आपण जाऊन त्यांना मारून टाकू, आणि बांधकाम थांबवू.’ पण हे नहेम्याच्या कानावर जातं, आणि तो कामकऱ्‍यांना तरवारी व भाले देतो. तो म्हणतो: ‘आपल्या शत्रूंची भीती धरू नका. तुमच्या भाऊबंदांसाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी, तुमच्या बायकांसाठी, आणि तुमच्या घरांसाठी लढा.’

लोकही धीराचे आहेत. रात्रंदिवस आपली शस्त्रं तयार ठेवून, ते वेशी बांधत राहतात. त्यामुळे फक्‍त ५२ दिवसात त्या बांधून पूर्ण होतात. आता लोकांना शहरात सुरक्षित वाटू शकतं. नहेम्या आणि एज्रा लोकांना देवाचे नियम शिकवतात; आणि लोक आनंदात असतात.

परंतु अजूनही, इस्राएलांना बंदी करून बॅबिलोनला नेलं जाण्यापूर्वी होती त्यासारखी परिस्थिती झालेली नाही. लोकांवर पर्शियन राजाचं राज्य आहे; आणि त्यांना त्याची सेवा केली पाहिजे. पण एक नवा राजा पाठवण्याचं, आणि तो राजा लोकांना शांती देईल, असं वचन यहोवानं दिलं आहे. हा राजा कोण? तो जगाला शांती कशी देईल? पुढे जवळपास ४५० वर्षांनी याबद्दल जास्त माहिती मिळते. तेव्हा एका बाळाच्या जन्माची महत्त्वाची घटना घडते. पण ती गोष्ट नंतर कधी तरी सांगू.