व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ८४

देवदूत मरीयेला भेट देतो

देवदूत मरीयेला भेट देतो

ही सुंदर स्त्री आहे मरीया. नासरेथ गावात राहणारी, ती एक इस्राएली स्त्री आहे. ती फार सुशील असल्याचं देवाला ठाऊक आहे. त्यामुळेच त्यानं गब्रीएल देवदूताला तिच्याशी बोलायला पाठवलं आहे. गब्रीएल मरीयेला काय सांगायला आला आहे, ते तुम्हाला माहीत आहे का? चला, पाहू या.

गब्रीएल तिला म्हणतो: ‘हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो. यहोवा तुझ्याबरोबर आहे.’ मरीयेनं या माणसाला पूर्वी कधीच पाहिलेलं नाही. त्याच्या बोलण्याचा अर्थ तिला न कळल्यामुळे तिच्या मनात खळबळ उडाली आहे. पण तात्काळ गब्रीएल तिची भीती दूर करतो.

तो म्हणतो: ‘मरीये भिऊ नकोस. तुझ्यावर यहोवाची कृपा झाली आहे. त्यामुळे तो तुझ्यासाठी एक अद्‌भुत गोष्ट करणार आहे. लवकरच तुला एक बाळ होईल. त्याचं नाव येशू ठेव.’

गब्रीएल पुढे सांगतो: ‘हे मूल थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. जसा दावीद होता, तसा यहोवा त्याला राजा करील. पण येशू युगानुयुगासाठी राजा होईल, आणि त्याचं राज्य कधीही संपणार नाही!’

मरीया विचारते: ‘हे कसं होईल? माझं तर लग्नही झालेलं नाही. मी कोणा पुरुषाबरोबर राहिले नाही. तर मग मला बाळ कसं होईल?’

गब्रीएल उत्तर देतो: ‘देवाची शक्‍ती तुझ्यावर येईल. त्यामुळे त्या मुलाला देवाचा पुत्र म्हणतील.’ मग तो तिला सांगतो: ‘तुझ्या नात्यातली अलीशिबा आठव. ती इतकी म्हातारी आहे की, तिला मूल होणार नाही, असं लोक म्हणायचे. पण आता लवकरच तिला एक मुलगा होईल. तेव्हा, देवाला काहीच अशक्य नाही, हे तुझ्या लक्षात आलं ना?’

झटकन्‌ मरीया म्हणते: ‘मी यहोवाची दासी आहे! आपण सांगितल्याप्रमाणे मला होऊ दे.’ मग देवदूत निघून जातो.

घाई घाईनं मरीया अलीशिबेला भेटायला जाते. मरीयेचा आवाज अलीशिबेच्या कानावर पडल्याबरोबर, तिच्या पोटातलं बाळ आनंदानं उडी मारतं. अलीशिबा देवाच्या आत्म्यानं परिपूर्ण होते आणि मरीयेला म्हणते: ‘स्त्रियांमध्ये तुझ्यावर विशेष कृपा आहे.’ मरीया अलीशिबेबरोबर जवळपास तीन महिने राहाते, आणि मग नासरेथला आपल्या घरी परत जाते.

मरीयेचं योसेफ नावाच्या माणसाशी लवकरच लग्न होणार आहे. पण मरीयेला बाळ होणार असल्याचं योसेफाला कळतं तेव्हा, तिच्याशी लग्न करावं असं त्याला वाटत नाही. त्या वेळी देवाचा दूत त्याला म्हणतो: ‘मरीयेला बायको करून घ्यायला घाबरू नकोस. कारण तिला मुलगा दिला आहे, तो देवानं.’ त्यामुळे मरीया आणि योसेफ यांचं लग्न होतं, आणि ते येशूचा जन्म होण्याची वाट पाहतात.