व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ८६

ताऱ्‍यानं वाट दाखवलेली माणसं

ताऱ्‍यानं वाट दाखवलेली माणसं

या माणसांच्यातला एक जण ज्याच्याकडे बोट दाखवत आहे, तो तारा तुम्हाला दिसतो का? त्यांनी जेरूसलेम सोडल्यावर हा तारा दिसायला लागला. ही पूर्वेकडली माणसं आहेत. ती ताऱ्‍यांचा अभ्यास करतात. त्यांचं असं मत आहे की, हा नवा तारा त्यांना कोणा महत्त्वाच्या व्यक्‍तीकडे नेत आहे.

ती माणसं जेरूसलेमला आली तेव्हा त्यांनी विचारलं: ‘जे मूल यहूद्यांचा राजा होणार आहे, ते कोठे आहे?’ “यहूदी” हे इस्राएलांचं दुसरं नाव आहे. ती माणसं म्हणाली: ‘पूर्वेत असताना आम्ही त्या बाळाचा तारा पहिल्यांदा पाहिला. आणि त्याला नमन करायला आलो आहोत.’

जेरूसलेमचा राजा असलेल्या हेरोदानं त्याबद्दल ऐकल्यावर, तो बेचैन झाला. दुसऱ्‍या एखाद्या राजानं आपली जागा घ्यावी, असं त्याला वाटत नव्हतं. त्यामुळे हेरोदानं मुख्य याजकांना बोलावून विचारलं: ‘वचनदत्त राजाचा जन्म कोठे होईल?’ त्यांनी उत्तर दिलं: ‘बायबल म्हणतं, बेथलेहेमात.’

तेव्हा, हेरोदानं पूर्वेकडच्या माणसांना बोलावलं, आणि म्हणाला: ‘जाऊन त्या लहान मुलाचा शोध घ्या. तुम्हाला तो सापडला की, मला कळवा. मलाही जाऊन त्याला नमन करायची इच्छा आहे.’ पण खरं तर, त्या मुलाला मारण्यासाठी हेरोदाला त्याला शोधायची इच्छा होती!

मग तो तारा त्या लोकांच्या पुढे बेथलेहेमाला जातो, आणि ते मूल असतं त्या जागेच्या वर थांबतो. ती माणसं घरात जातात तेव्हा, त्यांना मरीया आणि धाकटा येशू सापडतात. आपल्या सामानातून भेटी काढून, ते त्या येशूला देतात. पण त्यानंतर, एका स्वप्नात, हेरोदाकडे परत न जाण्याबद्दल यहोवा त्या माणसांना ताकीद देतो. त्यामुळे दुसऱ्‍या वाटेनं ते आपल्या देशाला परत जातात.

पूर्वेकडची माणसं घराकडे निघून गेल्याचं हेरोदाला समजतं तेव्हा, तो अतिशय संतापतो. आणि दोन वर्षं आणि त्याहून लहान वयाच्या, बेथलेहेमातल्या सर्व मुलांना मारून टाकण्याचा हुकूम देतो. पण त्यापूर्वीच यहोवा, एका स्वप्नात योसेफाला इशारा देतो. त्यामुळे योसेफ त्याच्या कुटुंबासकट इजिप्तला निघून जातो. पुढे, हेरोद मेला असल्याचं योसेफाला कळतं तेव्हा, तो मरीया आणि येशूला घेऊन नासरेथला घरी परत नेतो. तिथेच येशू लहानाचा मोठा होतो.

तो नवीन तारा कोणी चमकायला लावला, असं तुम्हाला वाटतं? तो तारा पाहिल्यावर, ती माणसं प्रथम जेरूसलेमला गेली, याची आठवण करा. दियाबल सैतानाला देवाच्या पुत्राला मारायचं होतं; आणि जेरूसलेमचा हेरोद राजा त्याला मारायचा प्रयत्न करील, हे त्याला ठाऊक होतं. तेव्हा, त्या ताऱ्‍याला सैतानानंच चमकवलं असेल.