व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ९०

स्त्री सोबत विहिरीपाशी

स्त्री सोबत विहिरीपाशी

शोमरोनात एका विहिरीपाशी येशू विसावा घेण्यासाठी थांबला आहे. त्याचे शिष्य अन्‍न विकत घेण्यासाठी गावात गेले आहेत. येशू जिच्याशी बोलतो आहे, ती स्त्री पाणी घेण्यासाठी आलेली आहे. तो तिला म्हणतो: ‘मला पाणी दे.’

या गोष्टीचं त्या स्त्रीला फार आश्‍चर्य वाटतं. का, ते तुम्हाला ठाऊक आहे? त्याचं कारण, येशू एक यहूदी आहे; आणि ती स्त्री आहे शोमरोनी. आणि बहुतेक यहूद्यांना शोमरोनी लोक आवडत नाहीत. ते त्यांच्याशी बोलतही नाहीत! पण येशूला सर्व प्रकारचे लोक आवडतात. म्हणून तो म्हणतो: ‘तुला पाणी मागणारा कोण, हे तुला माहीत असतं तर, तू त्याला मागशील आणि तो तुला जीवनदायक पाणी देईल.’

ती स्त्री म्हणते: ‘महाराज, ही विहीर आहे खोल. आणि पाणी काढायला तुमच्यापाशी बादलीही नाही. तुम्ही हे जीवनदायक पाणी आणाल कोठून?’

‘तू या विहीरीचं पाणी प्यालीस तर तुला परत तहान लागेल. पण मी देईन त्या पाण्यानं माणूस सर्वकाळ जगू शकेल,’ येशू खुलासा करतो.

स्त्री म्हणते: ‘महाराज, मला ते पाणी द्या! म्हणजे मग, मला पुन्हा कधी तहान लागणार नाही. आणि पाणी घेण्यासाठी इथे परत यावं लागणार नाही.’

येशू खरोखरच्या पाण्याबद्दल बोलत आहे, असं त्या स्त्रीला वाटतं. परंतु तो, देव आणि त्याच्या राज्याविषयीच्या सत्याबद्दल बोलत आहे. हे सत्य जीवनदायी पाण्यासारखं आहे. त्यानं माणसाला अनंत जीवन मिळू शकतं.

आता येशू त्या स्त्रीला सांगतो: ‘जा आणि आपल्या नवऱ्‍याला बोलावून आण.’

‘मला नवरा नाही,’ ती उत्तरते.

येशू म्हणतो: ‘तू बरोबर उत्तर दिलंस. पण तुझे पाच नवरे होऊन गेले, आणि सध्या तू ज्याच्यासोबत राहात आहेस, तो तुझा नवरा नाही.

ती स्त्री आश्‍चर्यानं थक्क होते. कारण ते सर्व खरं आहे. या गोष्टी येशूला कशा कळल्या? त्याचं कारण, देवानं पाठवलेला वचनदत्त माणूस येशूच असून, देव त्याला ही माहिती देतो. याच वेळी येशूचे शिष्य परत येतात. आणि तो एका शोमरोनी स्त्रीशी बोलत असलेला पाहून त्यांना आश्‍चर्य वाटतं.

या सर्वातून आपण काय शिकतो? त्यानं असं दिसून येतं की, येशू सर्व वंशांच्या लोकांशी प्रेमळपणानं वागतो. आपणही तसंच वागलं पाहिजे. काही लोक केवळ एखाद्या विशिष्ट वंशाचे आहेत म्हणून ते वाईट आहेत, असा विचार आपण करू नये. अनंत जीवनाकडे नेणारं सत्य सर्वांना माहीत व्हावं, अशी येशूची इच्छा आहे. आणि सत्य शिकण्यास लोकांना मदत करण्याची इच्छा आपल्यालाही असली पाहिजे.