व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ९२

येशू मेलेल्यांना उठवतो

येशू मेलेल्यांना उठवतो

इथे तुम्हाला दिसणारी मुलगी १२ वर्षांची आहे. येशूनं तिचा हात धरला आहे; आणि तिचे आईबाप जवळच उभे आहेत. ते इतके आनंदी का दिसताहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? चला पाहू या.

त्या मुलीचा बाप, याईर, हा एक प्रतिष्ठित गृहस्थ आहे. एका दिवशी त्याची मुलगी आजारी पडते. तेव्हा तिला बिछान्यात झोपवतात. पण तिला आराम पडत नाही. उलट तिचा आजार वाढत जातो. याईर आणि त्याची बायको काळजीत पडले आहेत. कारण, त्यांची मुलगी मरणार, अशी लक्षणं दिसायला लागली आहेत. ती त्यांची एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे, याईर येशूच्या शोधात निघतो. येशू करत असलेल्या चमत्कारांबद्दल त्यानं ऐकलं आहे.

याईराला येशू भेटतो तेव्हा, त्याच्या भोवती मोठा जमाव असतो. पण जमावात शिरून तो येशूच्या पाया पडतो, आणि विनवणी करतो: ‘माझी मुलगी फारच आजारी आहे. कृपा करून चला, आणि तिला बरी करा.’ येशू म्हणतो की, तो येईल.

ते चालत जात असताना, त्याच्या जवळ येण्यासाठी लोक दाटी करतात. अचानक येशू थांबतो. ‘कोण शिवलं मला?’ तो विचारतो. आपल्यातून शक्‍ती गेलेली येशूला जाणवली. त्यामुळे, कोणीतरी आपल्याला शिवलं, हे त्याला ठाऊक आहे. पण शिवलं कोण? ती, १२ वर्षं आजारी असलेली एक स्त्री आहे. तिनं नकळत येऊन येशूच्या कपड्याला शिवलं, आणि ती बरी झाली!

या गोष्टीनं याईराला बरं वाटतं. कारण, कोणालाही बरं करणं येशूला किती सोपं आहे, ते याईराच्या लक्षात येतं. पण तेवढ्यात एक निरोप्या येतो. तो याईराला सांगतो: ‘आता येशूला तसदी देऊ नका. तुमची मुलगी मरण पावली आहे.’ हे बोलणं येशू ऐकतो आणि याईराला म्हणतो: ‘काळजी करू नकोस. ती बरी होईल.’

अखेरीस, ते याईराच्या घरी पोहोचतात तेव्हा, मोठ्या दु:खानं लोक रडत असतात. परंतु येशू म्हणतो: ‘रडू नका. ती मेली नाही, केवळ झोपली आहे.’ पण ते हसून येशूची टर उडवतात. कारण ती मेलेली असल्याचं त्यांना माहीत आहे.

मग येशू, त्या मुलीचे आईबाप आणि आपले तीन शिष्य यांना, ती मुलगी झोपलेली असते त्या खोलीत नेतो. तिचा हात धरून तो म्हणतो: ‘ऊठ!’ तुम्हाला इथे दिसते तशी ती जिवंत होते; आणि उठून हिंडू-फिरू लागते! त्याचमुळे तिचे आईबाप इतके आनंदात आहेत.

येशूनं मेलेल्यातून उठवलेली, ती काही पहिलीच नव्हे. बायबलमध्ये ज्याच्याबद्दल प्रथम सांगितलं आहे तो, नाईन शहरात राहणाऱ्‍या एका विधवेचा मुलगा आहे. त्यानंतर येशू, मरीया आणि मार्था यांचा भाऊ लाजर, यालाही मेलेल्यांतून उठवतो. देवानं नेमलेला राजा म्हणून येशू राज्य करील तेव्हा, तो अनेक मेलेल्या लोकांना परत जिवंत करील. या गोष्टीचा आपल्याला आनंद होत नाही का?