व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ९३

येशू अनेक लोकांना जेवू घालतो

येशू अनेक लोकांना जेवू घालतो

एक भयंकर गोष्ट घडली आहे. बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाला नुकतंच ठार करण्यात आलं आहे. राजाची बायको हेरोदिया, हिला तो आवडत नव्हता. तिनं राजाकडून योहानाचा शिरच्छेद करवला.

हे ऐकल्यावर येशू फार उदास होतो. तो एका एकांत जागेला निघून जातो. पण लोक त्याच्या पाठोपाठ जातात. त्या जमावाला पाहून येशूला कीव येते. त्यामुळे तो, देवाच्या राज्याबद्दल त्यांच्याशी बोलतो, आणि त्यांच्यातल्या आजाऱ्‍यांना बरे करतो.

त्या दिवशी संध्याकाळी, शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणतात: ‘आधीच उशीर झाला आहे, आणि ही एकाकी जागा आहे. लोकांनी आसपासच्या गावात जाऊन स्वत:साठी अन्‍न विकत घ्यावं म्हणून त्यांना निरोप द्या.’

येशू उत्तर देतो: ‘त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना काहीतरी खायला द्या.’ तेव्हा फिलिप्पाकडे वळून येशू विचारतो: ‘या सगळ्या लोकांना जेवू घालण्यासाठी पुरेसं अन्‍न आपण कोठून विकत आणू शकू?’

‘प्रत्येकाला थोडंथोडं होईल इतकं विकत घेण्यासाठी देखील खूपसे पैसे लागतील,’ फिलिप्प उत्तरतो. तेव्हा अंद्रिया बोलतो: ‘आपलं अन्‍न वागवणाऱ्‍या या मुलापाशी पाच भाकऱ्‍या आणि दोन मासळ्या आहेत. पण त्या काही या सर्व लोकांना पुरणार नाहीत.’

येशू म्हणतो: ‘लोकांना गवतावर बसायला सांगा.’ मग अन्‍नासाठी देवाचे आभार मानून, तो त्याचे तुकडे करायला लागतो. त्यानंतर शिष्य सगळ्या लोकांना भाकऱ्‍या व मासे देतात. तिथे सुमारे ५,००० पुरुष आणि हजारो स्त्रिया व मुलंही आहेत. ते सर्व पोटभर जेवतात. शिष्य जेव्हा उरलेलं अन्‍न गोळा करतात तेव्हा, १२ टोपल्या भरतात.

आता समुद्राच्या पैलतीराला जाण्यासाठी येशू आपल्या शिष्यांना नावेतून पाठवून देतो. रात्री एक मोठं वादळ होतं. लाटा नावेला जोरदार हेलकावे देतात. शिष्य खूप घाबरले आहेत. मग, मध्यरात्री पाण्यावरून कोणीतरी त्यांच्याकडे येत असलेलं त्यांना दिसतं. ते भीतीनं ओरडतात. कारण ते काय असावं, हे त्यांना कळत नाही.

येशू म्हणतो: ‘भिऊ नका. मीच आहे!’ तरीही त्यांचा विश्‍वास बसत नाही. म्हणून पेत्र म्हणतो: ‘प्रभुजी, खरोखर तुम्हीच असाल तर, पाण्यावरून तुमच्याकडे चालत यायला मला सांगा.’ येशू उत्तर देतो: ‘ये!’ तेव्हा, बाहेर उतरून पेत्र पाण्यावरून चालतो! त्यानंतर तो घाबरतो आणि बुडायला लागतो. पण येशू त्याला वाचवतो.

पुढे येशू परत हजारोंना जेवू घालतो. या वेळी सात भाकऱ्‍या व थोडे लहान मासे यांनी तो सर्वांना खाऊ घालतो. आणि सर्वांना भरपूर अन्‍न मिळतं. येशू लोकांची जशी काळजी घेतो, ती आश्‍चर्यजनक नाही का? देवानं नेमलेला राजा म्हणून तो राज्य करील तेव्हा, आपल्याला कधीही कशाची काळजी करावी लागणार नाही!