व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ९४

तो लहान मुलांवर प्रेम करतो

तो लहान मुलांवर प्रेम करतो

पाहा, इथे येशूनं त्या लहान मुलाला आपल्या मिठीत घेतलं आहे. येशूला लहान मुलांची काळजी आहे, हे उघड दिसतं. ते पाहणारे लोक त्याचे प्रेषित आहेत. येशू त्यांना काय म्हणत आहे? चला पाहू या.

येशू आणि त्याचे प्रेषित नुकतेच एका लांबच्या प्रवासाहून परत आले आहेत. वाटेत प्रेषितांच्यामध्ये आपसात झाला वाद. त्यामुळे प्रवासानंतर येशू त्यांना विचारतो: ‘वाटेत तुम्ही कशाबद्दल वाद घालत होतात?’ खरं तर, कशाबद्दल वाद चालला होता, ते येशूला माहीत आहे. पण प्रेषित त्याला सांगतील की नाही, हे पाहण्याकरता तो प्रश्‍न विचारतो.

प्रेषित उत्तर देत नाहीत. कारण त्यांच्यातला सर्वश्रेष्ठ कोण, यावर ते वाटेत वाद घालत होते. काही प्रेषितांना इतरांपेक्षा श्रेष्ठ व्हायचं आहे. सर्वश्रेष्ठ व्हावंसं वाटणं बरोबर नव्हे, हे येशू त्यांना कसं सांगेल?

तो या लहान मुलाला बोलावतो; आणि त्याला त्यांच्यासमोर उभा करून आपल्या शिष्यांना म्हणतो: ‘तुम्हाला हे निश्‍चितपणे समजावं, अशी माझी इच्छा आहे. तुम्ही बदलून लहान मुलांसारखे झाला नाहीत, तर देवाच्या राज्यात कधीही शिरू शकणार नाही. जो या मुलासारखा होतो, तोच त्या राज्यात सर्वश्रेष्ठ आहे.’ येशूनं असं का म्हटलं, ते तुम्हाला माहीत आहे का?

कारण, इतरांपेक्षा श्रेष्ठ अथवा मोठं होण्याचे विचार लहान मुलांच्या मनात येत नाहीत. म्हणून अशा रितीनं प्रेषितांनी लहान मुलांसारखं व्हायला शिकलं पाहिजे. श्रेष्ठ वा महत्त्वाचं असल्याबद्दल भांडू नये.

लहान मुलांची त्याला किती काळजी आहे, हे येशू इतर अनेक प्रसंगीही दाखवतो. थोड्या महिन्यांनी काही लोक येशूला पाहण्यासाठी आपल्या मुलांना आणतात. प्रेषित त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण येशू आपल्या प्रेषितांना सांगतो: ‘मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना थांबवू नका. कारण देवाचं राज्य त्यांच्यासारख्यांचंच आहे.’ मग येशू त्या मुलांना आपल्या मिठीत घेतो, व आशीर्वाद देतो. येशूचं लहान मुलांवर प्रेम आहे, हे जाणणं किती चांगलं आहे, नाही का?