व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ९९

माडीवरच्या खोलीत

माडीवरच्या खोलीत

आता दोन दिवसांनंतर गुरुवारची रात्र आहे. येशू आणि त्याचे १२ प्रेषित वल्हांडण सणाचं जेवण करण्यासाठी, माडीवरच्या या मोठ्या खोलीत आले आहेत. बाहेर जाणारा जो माणूस दिसतो, तो यहूदा इस्कर्योत आहे. येशूला कसं पकडता येईल, हे याजकांना सांगण्यासाठी तो जात आहे.

आधल्याच दिवशी, त्यांच्याकडे जाऊन यहूदानं विचारलं: ‘येशूला पकडायला मी तुम्हाला मदत केली तर, तुम्ही मला काय द्याल?’ ते म्हणाले: ‘चांदीची तीस नाणी.’ त्यामुळे, त्या लोकांना येशूकडे आणता यावं म्हणून, त्यांना भेटायला यहूदा आता चालला आहे. हे किती भयंकर आहे, नाही का?

वल्हांडणाचं जेवण संपलं आहे. पण आता येशू एका खास जेवणाची सुरवात करतो. तो आपल्या प्रेषितांना एक भाकरी देतो, आणि म्हणतो: ‘ही खा. कारण, तुमच्यासाठी जे दिलं जाईल, त्या माझ्या शरीराचं हे प्रतीक आहे.’ मग, द्राक्षारसाचा एक प्याला त्यांना देऊन तो म्हणतो: ‘तो प्या. कारण, तुमच्यासाठी जे ओतलं जाईल, त्या माझ्या रक्‍ताचं हे प्रतीक आहे.’ बायबल याला ‘प्रभूचं सांजभोजन’ किंवा ‘प्रभूभोजन’ म्हणतं.

इजिप्तमध्ये देवाच्या दूतानं इस्राएल लोकांची घरं ‘ओलांडली’, पण इजिप्तच्या लोकांच्या घरातले ज्येष्ठपुत्र मारले. त्या गोष्टीची आठवण ठेवण्यासाठी इस्राएल लोक वल्हांडणाचं जेवण करत. पण आता येशूची इच्छा आहे की, त्याच्या अनुयायांनी त्याची नि त्यानं त्यांच्यासाठी आपलं जीवन कसं दिलं, याची आठवण ठेवावी. त्याच कारणासाठी, हे खास भोजन दरवर्षी साजरं करायला तो त्यांना सांगतो.

प्रभूचं सांजभोजन झाल्यावर, येशू त्याच्या प्रेषितांना निडर आणि विश्‍वासात बळकट व्हायला सांगतो. शेवटी, ते देवाला गीतं गातात आणि मग जातात. आता खूप उशीर झाला आहे. बहुतेक मध्यरात्र उलटून गेली असावी. चला, ते कोठे जातात, पाहू या.