व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा १०२

येशू जिवंत आहे

येशू जिवंत आहे

ही स्त्री आणि ही दोन माणसं कोण आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? ही स्त्री आहे, येशूची एक स्नेही, मरीया मग्दालिया. आणि पांढऱ्‍या कपड्यातली माणसं आहेत, देवदूत. मरीया ज्या लहान खोलीत डोकावते आहे ती, येशू मेल्यानंतर त्याचं शरीर ठेवलेली जागा आहे. तिला कबर म्हणतात. पण आता ते शरीर गायब झालं आहे! ते कोणी नेलं? चला, पाहू या.

येशू मेल्यावर, याजक पिलाताला म्हणतात: ‘येशू जिवंत असताना म्हणाला होता की, तीन दिवसांनी त्याला उठवलं जाईल. म्हणून कबरेवर पहारा देण्याची आज्ञा द्या. म्हणजे त्याचे शिष्य, त्याचं शरीर चोरून, तो मृतातून उठवला गेला आहे, असं म्हणू शकणार नाहीत!’ कबरेवर पहारा देण्यासाठी सैनिक पाठवायला पिलात याजकांनाच सांगतो.

पण येशू मेल्याच्या तिसऱ्‍या दिवशी भल्या पहाटे, अचानक यहोवाचा एक देवदूत येतो. तो कबरेसमोरचा दगड बाजूला सारतो. सैनिक इतके घाबरले आहेत की, त्यांना हलता येत नाही. अखेरीस ते कबरेच्या आत बघतात तो, शरीर गायब झालं आहे! त्यातले काही सैनिक शहरात जाऊन याजकांना खबर देतात. ते दुष्ट याजक काय करतात, ठाऊक आहे? खोटं बोलण्यासाठी, ते त्या सैनिकांना पैसे देतात. याजक सैनिकांना सांगतात: ‘आम्ही झोपलेले असताना, रात्री शिष्य आले, आणि त्यांनी शरीर चोरलं, असं म्हणा.’

दरम्यान, येशूच्या काही स्नेही स्त्रिया कबरेला भेट देतात. ती रिकामी असलेली पाहून, त्यांना फार आश्‍चर्य वाटतं! अचानक, तेजस्वी कपडे घातलेले दोन देवदूत प्रकट होतात. ते विचारतात: ‘तुम्ही येशूला इथे का शोधता आहात? त्याला उठवलं गेलं आहे. पटकन जा, आणि त्याच्या शिष्यांना सांगा.’ त्या धावत सुटतात! पण वाटेत एक माणूस त्यांना थांबवतो. तो कोण आहे, ते तुम्हाला माहीत आहे का? तो आहे, येशू! तो म्हणतो: ‘जाऊन माझ्या शिष्यांना सांगा.’

येशू जिवंत आहे, आणि आपण त्याला पाहिलं आहे, असं त्या स्त्रिया शिष्यांना सांगतात तेव्हा, त्यांना त्यावर विश्‍वास ठेवणं जड जातं. स्वत:ची खात्री करण्यासाठी पेत्र आणि योहान कबरेकडे धावतात. पण कबर रिकामी असते! पेत्र आणि योहान निघून जातात तेव्हा, मरीया मग्दालिया मागे राहाते. तेव्हाच ती आत डोकावते, आणि त्या दोन देवदूतांना पाहाते.

येशूच्या शरीराचं काय झालं, ते तुम्हाला ठाऊक आहे का? ते देवानं नाहीसं केलं. येशू ज्या हाडा-मांसाच्या शरीरानं मरण पावला, त्यातच देवानं त्याला उठवलं नाही. स्वर्गातल्या देवदूतांप्रमाणे, त्यानं येशूला एक नवं आत्मिक शरीर दिलं. परंतु, आपण जिवंत असल्याचं आपल्या शिष्यांना दाखवण्यासाठी, लोकांना दिसेल असं शरीर येशू धारण करू शकतो, हे आपण पुढे शिकू.