व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा १०५

जेरूसलेममध्ये वाट पाहणं

जेरूसलेममध्ये वाट पाहणं

हे लोक येशूचे अनुयायी आहेत. त्याची आज्ञा पाळून ते जेरूसलेममध्ये राहिले आहेत. ते सर्व एकत्र मिळून वाट पाहात असताना, एक मोठा आवाज त्या संपूर्ण घरात भरतो. तो सोसाट्याच्या वाऱ्‍यासारखा वाटतो. आणि मग, शिष्यांपैकी प्रत्येकाच्या डोक्यावर आगीची जीभ दिसू लागते. त्या प्रत्येकावरची आग तुम्हाला दिसते का? या सगळ्याचा अर्थ काय?

तो एक चमत्कार आहे! येशू स्वर्गात त्याच्या पित्याकडे परतला आहे, आणि तो आपल्या अनुयायांवर देवाचा पवित्र आत्मा ओततो आहे. हा आत्मा त्यांना काय करायला लावतो, ते तुम्हाला माहीत आहे का? ते सगळे वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलायला लागतात.

सोसाट्याच्या वाऱ्‍यासारखा वाटणारा तो आवाज जेरूसलेममधले अनेक लोक ऐकतात, आणि काय होत आहे, हे पाहाण्यासाठी येतात. त्यातले काही लोक, पेन्टेकॉस्टच्या इस्राएली मेजवानीसाठी आलेले परदेशी आहेत. हे पाहुणे आश्‍चर्यचकित होतात! ते शिष्य, देवानं केलेल्या अद्‌भुत गोष्टींबद्दल त्यांच्या भाषेत बोलत असलेले त्यांना दिसतात.

पाहुणे मंडळी म्हणतात: ‘हे सर्व लोक तर गालीलचे आहेत. असं असताना, आपण जिथून आलो तिकडच्या देशांच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये हे कसे बोलू शकतात?’

आता त्यांना खुलासा करण्यासाठी पेत्र उभा राहातो. येशू कसा मारला गेला आणि यहोवानं त्याला मृतातून कसं उठवलं, याबद्दल आवाज उंचावून तो त्यांना सांगतो. पेत्र म्हणतो: ‘आता येशू स्वर्गात देवाच्या उजव्या हाताला आहे, आणि त्यानं हा वचनदत्त पवित्र आत्मा ओतला आहे. आणि त्याच कारणानं तुम्हाला हे चमत्कार दिसले आणि ऐकू आले आहेत.’

पेत्र अशा गोष्टी बोलतो तेव्हा, येशूला जे केलं गेलं, त्याबद्दल बऱ्‍याच लोकांना भारी दु:ख होतं. ते विचारतात: ‘आम्ही काय करावं?’ पेत्र त्यांना सांगतो: ‘तुम्हाला, आपलं जीवन बदलून बाप्तिस्मा घ्यायची गरज आहे.’ त्यामुळे, त्याच दिवशी सुमारे ३,००० लोक बाप्तिस्मा घेऊन, येशूचे अनुयायी होतात.