व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा १०६

तुरुंगातून सुटका

तुरुंगातून सुटका

इथे तुरुंगाचा दरवाजा उघडून धरणाऱ्‍या देवदूताकडे पाहा. तो ज्या लोकांची सुटका करतो आहे, ते येशूचे प्रेषित आहेत. चला, ते तुरुंगात कशामुळे टाकले गेले, ते पाहू या.

येशूच्या शिष्यांवर पवित्र आत्मा ओतला गेल्याला थोडाच काळ झाला आहे. आणि काय घडतंय पाहा: एका दिवशी दुपारी पेत्र आणि योहान जेरूसलेममधल्या मंदिरात शिरत असतात. तिथे दरवाज्यापाशी, जन्मापासून पांगळा असलेला एक माणूस आहे. देवळात जाणाऱ्‍यांकडे पैशाची भीक मागता यावी म्हणून लोक त्याला दररोज इथे उचलून आणतात. पेत्र आणि योहानाला पाहिल्यावर तो त्यांच्याकडे भीक मागतो. प्रेषित काय करतील?

थांबून ते त्या गरीब माणसाकडे पाहतात. पेत्र म्हणतो: ‘माझ्यापाशी पैसे नाहीत. पण जे आहे, ते तुला देईन. येशूच्या नावानं ऊठ आणि चालू लाग!’ मग पेत्र उजवा हात धरून त्याला उठवतो. आणि तात्काळ उडी मारून तो उठतो व हिंडू फिरू लागतो. ते पाहिल्यावर, या अद्‌भुत चमत्कारानं लोक चकित होतात व त्यांना आनंदही होतो.

पेत्र म्हणतो: ‘येशूला ज्यानं मृतातून उठवलं, त्या देवाच्या सामर्थ्यानं आम्ही हा चमत्कार केला.’ पेत्र आणि योहान बोलत असताना काही धार्मिक नेते तिकडे येतात. येशूला मृतातून उठवल्याबद्दल पेत्र व योहान लोकांना सांगत असल्यानं, ते चिडले आहेत. त्यामुळे ते त्यांना धरून तुरुंगात टाकतात.

दुसऱ्‍या दिवशी धार्मिक नेते मोठी सभा भरवतात. ज्या माणसाला त्यांनी बरं केलं, त्याच्यासकट पेत्र आणि योहानाला तिथे आणलं जातं. ‘तुम्ही हा चमत्कार कोणत्या सामर्थ्यानं केला?’ धार्मिक नेते सवाल करतात.

पेत्र त्यांना सांगतो की, ज्या देवानं येशूला मृतातून उठवलं, त्याच्या सामर्थ्यानं. हा चमत्कार खरोखरच घडला असल्याचं नाकारता येत नसल्यानं, काय करावं ते याजकांना सुचत नाही. त्यामुळे, यापुढे येशूबद्दल न बोलण्याची ताकीद देऊन, ते प्रेषितांना सोडून देतात.

जसा काळ जातो तसे प्रेषित येशूबद्दल प्रचार आणि आजाऱ्‍यांना बरे करत राहतात. या चमत्कारांची बातमी पसरते. त्यामुळे, प्रेषितांनी बरं करण्यासाठी जेरूसलेमच्या आसपासच्या गावांचे लोकही आजाऱ्‍यांना घेऊन येतात. या कारणानं धार्मिक नेत्यांचा जळफळाट होतो. म्हणून ते प्रेषितांना पकडून तुरुंगात टाकतात. परंतु ते तिथे फार वेळ राहात नाहीत.

इथे तुम्हाला दिसतो तसा, रात्री देवाचा दूत तुरुंगाचा दरवाजा उघडतो. देवदूत म्हणतो: ‘जाऊन मंदिरात उभे राहा, आणि लोकांशी बोलत राहा.’ दुसऱ्‍या दिवशी सकाळी, धार्मिक नेते, प्रेषितांना आणण्यासाठी तुरुंगाकडे माणसं पाठवतात तो, ते नाहीसे झालेले असतात. नंतर त्या माणसांना ते मंदिरात शिकवत असलेले आढळतात, तेव्हा ते त्यांना सन्हेद्रिन कचेरीत आणतात.

धार्मिक नेते म्हणतात: ‘येशूबद्दल न शिकवण्याची सक्‍त ताकीद आम्ही तुम्हाला दिली होती. तरीही तुम्ही आपल्या शिकवणीनं सर्व जेरूसलेम भरून टाकलं आहे.’ तेव्हा प्रेषित उत्तर देतात: ‘आम्हाला मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.’ त्यामुळे ते “सुवार्ता” शिकवतच राहातात.

आपण अनुसरावं असं ते उत्तम उदाहरण आहे, नाही का?