व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा १०८

दमास्कसच्या वाटेवर

दमास्कसच्या वाटेवर

जमिनीवर पडलेला तो माणूस कोण, ते तुम्हाला माहीत आहे का? तो आहे शौल. स्तेफनाला दगडमार करणाऱ्‍या लोकांचे कपडे सांभाळणारा तो हाच होता, याची आठवण करा. तो प्रखर प्रकाश पहा! काय घडतं आहे?

स्तेफन मारला गेल्यानंतर, येशूच्या अनुयायांचा छळ करण्यासाठी त्यांचा शोध घेण्यात शौल पुढाकार घेतो. घरा-घरात जाऊन तो त्यांना बाहेर खेचतो आणि तुरुंगात टाकतो. बरेचसे शिष्य दुसऱ्‍या गावांना पळून जातात आणि तिकडे ‘सुवार्तेचा’ प्रचार करायला लागतात. पण येशूच्या अनुयायांचा शोध घेण्यासाठी शौल इतर गावांना जातो. आता तो दमास्कसच्या वाटेवर आहे. पण रस्त्यात कोणती आश्‍चर्यजनक गोष्ट घडते पाहा:

अचानक, शौलाभोवती आकाशातून प्रकाश पडतो. इथे आपल्याला दिसतो, तसा तो जमिनीवर पडतो. मग एक आवाज म्हणतो: ‘शौला, शौला, तू मला का दुखवतो आहेस?’ शौलाबरोबरच्या माणसांना प्रकाश दिसतो आणि बोलण्याचा आवाज ऐकू येतो. पण त्यांना ते बोलणं समजत नाही.

‘प्रभू, तू कोण आहेस?’ शौल विचारतो.

आवाज म्हणतो: ‘तू ज्याला दुखवतो आहेस, तो मी येशू आहे.’ शौल येशूच्या अनुयायांना दुखवतो तेव्हा, आपल्यालाच दुखवलं जातं आहे, असं येशूला वाटतं. म्हणून तो असं म्हणतो.

आता शौल विचारतो: ‘प्रभू, मी काय करू?’

येशू म्हणतो: ‘ऊठ, आणि दमास्कसला जा. तू काय करावं, हे तिथे तुला सांगितलं जाईल.’ ऊठून शौल डोळे उघडतो, तो त्याला काहीही दिसत नाही. तो अंधळा झाला आहे! त्यामुळे त्याच्याबरोबरचे लोक त्याला हातानं धरून दमास्कसला नेतात.

तेव्हा येशू दमास्कसमधल्या आपल्या शिष्याला सांगतो: ‘हनन्या, ऊठ. नीट नावाच्या रस्त्यावर जा, आणि यहूदाच्या घरी शौल नावाच्या माणसाची चौकशी कर. माझा विशेष सेवक व्हावा म्हणून, मी त्याची निवड केली आहे.’

हनन्या आज्ञा पाळतो. तो शौलाला भेटतो तेव्हा, त्याच्यावर हात ठेवून म्हणतो: ‘तुला परत दृष्टि यावी आणि तू पवित्र आत्म्यानं परिपूर्ण व्हावं, म्हणून प्रभूनं मला पाठवलं आहे.’ तात्काळ खपल्यांसारखं काहीतरी, शौलाच्या डोळ्यावरून पडतं आणि त्याला पुन्हा दिसायला लागतं.

अनेक देशाच्या लोकांना प्रचार करण्यासाठी शौलाचा मोठा उपयोग केला जातो. तो प्रेषित पौल या नावानं ओळखला जातो. आपण त्याच्याबद्दल बरंच शिकू. पण प्रथम देव पेत्राला काय करायला पाठवतो, ते पाहू या.