व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ११०

तीमथ्य–पौलाचा नवा मदतनीस

तीमथ्य–पौलाचा नवा मदतनीस

इथे प्रेषित पौलाबरोबर तुम्हाला दिसणारा तरुण, तीमथ्य आहे. तो आपल्या कुटुंबाबरोबर लुस्त्राला राहातो. त्याच्या आईचं नाव आहे युनिके आणि आजीचं लोईस.

पौलाची लुस्त्राला ही तिसरी भेट आहे. सुमारे एक वर्षापूर्वी, पौल आणि बर्णबा प्रचार यात्रेच्या निमित्तानं प्रथम इथे आले. आता पौल, त्याचा मित्र सीला याच्याबरोबर परत आला आहे.

पौल तीमथ्याला काय सांगतो आहे, ते तुम्हाला माहीत आहे का? तो विचारतो आहे: ‘सीला आणि माझ्याबरोबर यायला तुला आवडेल का? दूरवरच्या देशाच्या लोकांना प्रचार करण्यात, आम्हाला तुझी मदत होऊ शकेल.’

‘हो, मला जायला आवडेल,’ तीमथ्य उत्तर देतो. त्यामुळे त्यानंतर लवकरच, आपलं कुटुंब सोडून, तीमथ्य सीला व पौलाबरोबर जातो. परंतु त्यांच्या प्रवासाबद्दल जास्त माहिती करून घेण्यापूर्वी, पौलाच्या बाबतीत काय घडतं आहे, ते पाहू या. दमास्कसच्या वाटेवर येशूनं त्याला दर्शन दिल्याला अंदाजे १७ वर्षं झाली आहेत.

लक्षात ठेवा की, येशूच्या शिष्यांना छळण्यासाठी पौल दमास्कसला आला; पण आता तो स्वत:च त्याचा शिष्य आहे! पुढे, येशूबद्दल त्याची शिकवण त्यांना आवडत नसल्यामुळे, पौलाचे वैरी त्याला मारण्याचा घाट घालतात. पण पळून जायला शिष्य पौलाची मदत करतात. ते त्याला एका टोपलीत घालून, गावकुसाबाहेर सोडतात.

मग पौल प्रचार करण्यासाठी अंत्युखियाला जातो. इथे येशूच्या अनुयायांना प्रथमच ख्रिस्ती म्हटलं जातं. त्यानंतर अंत्युखियाहून, पौल आणि बर्णबाला दूरवरच्या देशांना प्रचारासाठी पाठवलं जातं. ते ज्या शहरांना भेटी देतात, त्यातलं एक आहे तीमथ्याचं गाव लुस्त्र.

आता, साधारण एका वर्षानं, दुसऱ्‍या फेरीत पौल लुस्त्राला परत आला आहे. तीमथ्य पौल आणि सीलाबरोबर निघतो, तेव्हा ते कोठे जातात, हे तुम्हाला माहीत आहे का? या नकाशाकडे पहा. त्यातल्या काही जागा आपण पाहू या.

पहिल्यानं ते जवळच्या इकुन्याला जातात, व मग अंत्युखिया नावाच्या दुसऱ्‍या गावाला. त्यानंतर ते त्रोवसाकडे व मग फिलिप्पै, थेस्सलनीका आणि बिरुयापर्यंत प्रवास करतात. नकाशात तुम्हाला अथेन्स दिसतं का? पौल तिथे प्रचार करतो. त्यानंतर करिंथमध्ये प्रचार करत ते दीड वर्ष घालवतात. आणि शेवटी, इफिसमध्ये थोडा वेळ मुक्काम करतात. मग ते बोटीनं कैसरियाला परत येतात; आणि पौल राहातो त्या अंत्युखियाला जातात.

तेव्हा, ‘सुवार्तेचा’ प्रचार आणि बऱ्‍याच ख्रिस्ती मंडळ्यांची सुरवात करायला पौलाची मदत करण्यात, तीमथ्य शेकडो मैल प्रवास करतो. तुम्ही लहानाचे मोठे व्हाल तेव्हा, तीमथ्यासारखे देवाचे विश्‍वासू सेवक व्हाल का?