व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा १११

झोपी गेलेला मुलगा

झोपी गेलेला मुलगा

अरे बापरे! हे काय होतयं? जमिनीवर पडलेल्या मुलाला मोठा मार लागला आहे, की काय? आणि पाहा! घरातून बाहेर पडणाऱ्‍या माणसातला एक आहे, पौल! तिथे तुम्हाला तीमथ्यही दिसतो का? हा मुलगा खिडकीतून पडला की काय?

होय, तेच झालं. इथे त्रोवसात, पौल शिष्यांपुढे भाषण देत होता. दुसऱ्‍याच दिवशी पौलाला नावेतून जायचं असल्यानं, तो बरेच दिवस त्यांना भेटणार नाही, हे त्याला ठाऊक होतं. त्यामुळे तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहिला.

युतुख नावाचा हा मुलगा खिडकीत बसला होता. तो झोपी गेला; आणि तोल जाऊन खिडकीतून तीन मजले खाली जमिनीवर पडला! तेव्हा, हे लोक काळजीत असलेले का दिसतात, हे तुम्हाला समजू शकतं. ती माणसं त्याला उचलतात तेव्हा, त्यांची शंका खरी ठरते. तो मेला आहे!

मुलगा मरण पावला आहे, असं पौलाला दिसतं तेव्हा, तो त्याच्यावर पाखर घालून त्याला कवटाळतो आणि म्हणतो: ‘चिंता करू नका. तो खुशाल आहे!’ आणि तो तसा असतोही! चमत्कार झाला आहे! पौलानं त्याला पुन्हा जिवंत केलं आहे! तिथे जमलेले लोक आनंदात बुडून जातात.

ते सर्व परत माडीवर जातात, आणि जेवण करतात. पौल पहाटेपर्यंत बोलत राहातो. पण युतुखाचा मात्र परत डोळा लागत नाही! मग पौल, तीमथ्य आणि त्यांच्याबरोबर प्रवास करणारे नावेत चढतात. ते कोठे निघाले आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

आपली तिसरी प्रचार यात्रा संपवून, पौल घरी जाण्याच्या मार्गावर आहे. या प्रवासात तो इफिसमध्येच तीन वर्षं राहिला. त्यामुळे त्याच्या दुसऱ्‍या यात्रेपेक्षा देखील ही मोठी होती.

त्रोवस सोडल्यावर, ती नाव थोडा वेळ मिलेताला थांबते. इफिस तेथून थोड्याच मैलावर असल्यानं, तिथल्या मंडळीच्या वडील वर्गाशी अखेरचं बोलणं करण्यासाठी, पौल त्यांना मिलेताला बोलावून घेतो. त्यानंतर, नावेची जाण्याची वेळ होते तेव्हा, पौलाला निरोप देताना त्यांना अत्यंत दु:ख होतं.

अखेरीस नाव कैसरियाला परत येते. पौल फिलिप्प नावाच्या शिष्याच्या घरी राहात असताना, अगब संदेष्टा त्याला इशारा देतो. तो म्हणतो की, जेरूसलेमला पोहोचल्यावर पौलाला कैद केलं जाईल. आणि होतंही तसंच. मग कैसरियात कैदेमध्ये दोन वर्षं राहिल्यावर, रोमन शासक कैसर याच्यापुढे चौकशीसाठी पौलाला रोमला पाठवलं जातं. चला, रोमच्या प्रवासात काय होतं ते पाहू या.