व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ११२

जहाज फुटून बेटाला लागणं

जहाज फुटून बेटाला लागणं

पाहा! ही नाव संकटात आहे! तिचे तुकडे होताहेत! पाण्यात उड्या टाकलेले लोक तुम्हाला दिसतात का? काही जण तर किनाऱ्‍याजवळ पोहंचले आहेत. तो पौल आहे की काय? त्याचं काय होतंय, पाहू या.

लक्षात ठेवा की, पौलाला कैसरियात दोन वर्षं कैद करून ठेवलेलं आहे. मग त्याला आणि इतर काही कैद्यांना नावेत चढवून, ते रोमच्या दिशेनं निघतात. क्रीट बेटाजवळून ते जात असताना, एक भयंकर तुफान येतं. वारा इतक्या जोरात वाहात असतो की, खलाशांना नाव हाकता येत नाही. त्यांना दिवसा सूर्य वा रात्री तारेही दिसत नाहीत. अखेरीस, बऱ्‍याच दिवसांनंतर, नावेतले सर्व जण, वाचण्याची आशा सोडून देतात.

मग पौल उभा राहून म्हणतो: ‘तुमच्यातल्या कोणाचाही जीव गमावणार नाही, फक्‍त नावच काय ती गमावेल. कारण काल रात्री देवाचा दूत माझ्याकडे येऊन म्हणाला: “पौला, घाबरू नकोस! तुला रोमन शासक कैसर याच्यासमोर उभं राहिलं पाहिजे. तुझ्याबरोबर चाललेल्या सर्वांना देव वाचवील.”’

वादळ सुरु झाल्यापासून १४ व्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमाराला, खलाशांच्या ध्यानात येतं की, पाणी उथळ होत आहे! अंधारात खडकावर आपटण्याच्या भितीनं ते नांगर टाकतात. दुसऱ्‍या दिवशी सकाळी त्यांना एक खाडी दिसते. तेव्हा नाव पार किनाऱ्‍यावर नेण्याचा प्रयत्न करायचा ते ठरवतात.

किनाऱ्‍याच्या जवळ गेल्यावर, समुद्रात वर आलेल्या जमिनीवर नाव रुतून गच्च बसते. मग तिच्यावर लाटा आपटायला लागून नावेचे तुकडे व्हायला लागतात. तेव्हा तिथला जबाबदार सैन्याधिकारी म्हणतो: ‘तुमच्यातल्या ज्यांना पोहता येतं, ते सगळे प्रथम समुद्रात उड्या टाकून किनाऱ्‍यावर जा. त्यांच्यानंतर बाकीचे तुम्ही उड्या टाका; आणि तरंगण्यासाठी नावेचा एखादा तुकडा धरून ठेवा.’ आणि ते तसंच करतात. अशा रितीनं, देवदूतानं वचन दिल्याप्रमाणे, नावेत असलेले सर्व २७६ जण सुखरूप किनाऱ्‍याला लागतात.

त्या बेटाचं नाव असतं माल्टा. तिथले लोक अतिशय दयाळू असतात, आणि नावेतल्या लोकांची काळजी घेतात. हवामान सुधारल्यावर, पौलाला दुसऱ्‍या एका नावेवर चढवून रोमला नेलं जातं.