व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ११३

रोममध्ये पौल

रोममध्ये पौल

पौलाच्या हातातले साखळदंड आणि त्याच्यावर पाहारा देणारा रोमन सैनिक पाहा. पौल रोममध्ये कैदेत आहे. त्याचं काय करायचं ते रोमन कैसराने ठरवण्याची, तो वाट पहात आहे. तो कैदेत असताना, लोकांना त्याला भेटण्याची मुभा दिली जाते.

रोमला आल्यावर तीन दिवसांनी, पौल, काही यहूदी नेत्यांना, आपल्याला येऊन भेटण्यासाठी निरोप धाडतो. त्यामुळे, रोममधले बरेच यहूदी येतात. येशू आणि देवाच्या राज्याबद्दल पौल त्यांना उपदेश करतो. काही जण विश्‍वास ठेवतात आणि ख्रिस्ती होतात. तर बाकीचे विश्‍वास ठेवत नाहीत.

त्याच्यावर पहारा देण्याचं काम असलेल्या वेगवेगळ्या सैनिकांनाही पौल उपदेश करतो. कैदी म्हणून इथे असल्याच्या दोन वर्षांच्या काळात, पौल, त्याला जमेल तितक्यांना उपदेश करतो. परिणाम असा होतो की, सुवार्तेची बातमी कैसराच्या घरच्या लोकांच्या कानावरही पडते; आणि त्यातले काही ख्रिस्ती होतात.

पण टेबलापाशी लिहित असलेला, हा पाहुणा कोण? तुम्हाला काही कल्पना आहे का? होय, तो तीमथ्य आहे. देवाच्या राज्याविषयी प्रचार केल्याबद्दल तीमथ्यही कैदेत होता. पण तो परत मोकळा झाला आहे; आणि पौलाला मदत करण्यासाठी इथे आला आहे. तीमथ्य काय लिहीत आहे, ते तुम्हाला ठाऊक आहे का? चला, पाहू या.

११० व्या कथेतली फिलिप्पै आणि इफिस ही गावं तुम्हाला आठवतात का? त्या गावांमध्ये ख्रिस्ती मंडळ्या सुरु करायला पौलानं मदत केली होती. आता, पौल तुरुंगात असताना, तो त्या ख्रिश्‍चनांना पत्रं लिहितो. ती पत्रं बायबलमध्ये आहेत; आणि त्यांना इफिसकरांस व फिलिप्पैकरांस असं म्हणतात. आता, फिलिप्पैमधल्या त्यांच्या मित्रांना काय लिहावं, ते पौल तीमथ्याला सांगतो आहे.

फिलिप्पैकरांनी पौलाला खूप दया दाखवली आहे. इथे कैदेत त्यांनी त्याला भेट पाठवली. आणि म्हणून, पौल त्यांचे आभार मानतो आहे. ती भेट आणणारा माणूस आहे, एपफ्रदीत. तो फार आजारी पडला आणि मरता मरता वाचला. आता तो पुन्हा बरा होऊन, घरी जायला तयार आहे. फिलिप्पैला परत जाताना, पौल आणि तीमथ्याचं हे पत्र तो सोबत नेईल.

कैदेत असताना पौल, आपल्या बायबलमध्ये असलेली, आणखी दोन पत्रं लिहितो. एक आहे, कलस्सै शहरात राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना. त्याला काय म्हणतात, ते तुम्हाला माहीत आहे का? कलस्सैकरांस. दुसरं आहे, कलस्सैमध्येच राहणाऱ्‍या फिलेमोन नावाच्या एका जिवलग मित्राला लिहिलेलं खाजगी पत्र. आणि ते, फिलेमोनाचा गुलाम अनेसिम याच्याबद्दल आहे.

अनेसिम फिलेमोनापासून पळून रोमला आला. कसं कोण जाणे, पौल इथे तुरुंगात असल्याचं त्याला समजलं. म्हणून अनेसिम भेटायला आला, नि पौलानं त्याला उपदेश केला. लवकरच अनेसिमही ख्रिस्ती झाला. आता, पळून गेल्याबद्दल अनेसिमाला वाईट वाटतं आहे. तेव्हा, फिलेमोनाला पाठवलेल्या या पत्रात पौल काय लिहितो, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

अनेसिमाला क्षमा करायची विनंती, पौल फिलेमोनाला करतो. पौल लिहितो: ‘मी त्याला तुझ्याकडे परत पाठवत आहे. पण आता तो केवळ तुझा गुलाम नाही. तर, तो उत्तम ख्रिस्ती बंधूही आहे.’ अनेसिम कलस्सैला परत जातो, तेव्हा तो ही दोन पत्रं सोबत नेतो. एक कलस्सैकरांना आणि दुसरं फिलेमोनाला. आपला दास ख्रिस्ती झाला आहे, हे कळल्यावर फिलेमोनला किती आनंद झाला असेल, याची आपण कल्पना करू शकतो.

पौल फिलिप्पैकरांना व फिलेमोनाला लिहितो तेव्हा, त्यांच्यासाठी त्याच्यापाशी खास चांगली बातमी असते. पौल फिलिप्पैकरांना लिहितो: ‘मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवत आहे. आणि मीही लवकरच तुम्हाला भेट देईन.’ फिलेमोनाला तो लिहितो: ‘माझी राहण्याची व्यवस्था करून ठेव.’

पौल मोकळा झाल्यावर, अनेक ठिकाणच्या आपल्या ख्रिस्ती बंधू-भगिनींना भेट देतो. परंतु पुढे रोममध्ये पौलाला परत कैद करण्यात येतं. या वेळी आपण मारले जाणार आहोत, हे त्याला माहीत असतं; म्हणून पत्र लिहून, तो तीमथ्याला लवकर येण्याची विनंती करतो. तो लिहितो: ‘मी देवाशी प्रामाणिक राहिलो आहे; आणि देव मला प्रतिफळ देईल.’ पौल मारला गेल्यानंतर थोड्याच वर्षांनी, जेरूसलेमचा पुन्हा नाश करण्यात येतो. या वेळी रोमन लोकांकडून.

परंतु बायबलमध्ये आणखी बरंच काही आहे. यहोवा देव योहानाकडून, प्रकटीकरणासकट त्यातली अखेरची पुस्तकं लिहून घेतो. बायबलचं हे पुस्तक भविष्याबद्दल सांगतं. भविष्यात काय आहे, ते आता आपण शिकू या.