व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ११५

पृथ्वीवर एक नवं परादीस

पृथ्वीवर एक नवं परादीस

ती ऊंच झाडं, सुंदर फुलं आणि ते ऊंच डोंगर पाहा. इथलं वातावरण किती छान आहे, नाही का? पाहा, त्या लहान मुलाच्या हातातून हरीण कसं खात आहे. आणि पलीकडे हिरवळीवरचे सिंह नि घोडे पाहा. या जागेसारख्या ठिकाणी असलेल्या घरात राहायला तुम्हाला आवडणार नाही का?

तुम्ही पृथ्वीवर परादीसमध्ये अनंत काळ जगावं अशी देवाची इच्छा आहे. आज लोकांना भोगावी लागणारी कोणतीही दुखणी-खुपणी तुम्हाला होऊ नयेत, असं त्याला वाटतं. नव्या परादीसमध्ये राहणाऱ्‍या लोकांना, बायबलचं अभिवचन आहे की: ‘देव त्यांच्याबरोबर राहील. ह्‍यापुढे मृत्यू, रडणं अन्‌ कष्ट नसतील. जुन्या गोष्टी होऊन गेल्या.’

हा अद्‌भुत बदल घडवून आणण्याकडे येशू ध्यान देईल. कधी, ते तुम्हाला माहीत आहे का? होय, सगळ्या पृथ्वीवरून दुष्टपणा आणि दुष्ट लोकांना काढून टाकल्यानंतर, ही गोष्ट केली जाईल. येशू पृथ्वीवर असताना, त्यानं लोकांना सर्व प्रकारच्या आजारांपासून बरं केलं, आणि मृतातूनही उठवलं, याची आठवण करा. देवाच्या राज्याचा राजा झाल्यावर, तो सगळ्या जगभर काय करील, ते दाखवण्यासाठी, त्यानं हे केलं.

पृथ्वीवरच्या नव्या परादीसमध्ये किती मजा असेल, याचा नुसता विचार करा! येशू, त्यानं निवडलेल्या काही लोकांबरोबर स्वर्गातून राज्य करत असेल. ते शासक जगातल्या सर्वांची काळजी घेतील, आणि त्यांच्या सुखा-समाधानाकडे लक्ष देतील. देवाच्या नव्या परादीसामध्ये, त्यानं आपल्याला अनंत जीवन द्यावं, या गोष्टीच्या हमीसाठी आपण काय केलं पाहिजे, ते पाहू या.