व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ११६

आपल्याला अनंतकाळ कसं जगता येईल

आपल्याला अनंतकाळ कसं जगता येईल

ही चिमुरडी आणि तिचे मित्र काय वाचताहेत, ते तुम्हाला सांगता येतं का? होय, ते, तुम्ही वाचता आहात ते, बायबल कथांचं माझं पुस्तकच  आहे. आणि तुम्ही वाचत असलेली, “आपल्याला अनंतकाळ कसं जगता येईल,” हीच गोष्ट वाचताहेत.

ते काय शिकताहेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का? अनंत काळ जगायचं असेल तर, पहिल्यानं आपल्याला यहोवा आणि त्याचा पुत्र येशू यांची माहिती असायला हवी. बायबल म्हणतं: ‘अनंत काळ जगण्याचा मार्ग असा: एकमेव खरा देव आणि त्यानं पृथ्वीवर पाठवलेला त्याचा पुत्र येशू ख्रिस्त, यांच्याबद्दल शिका.’

यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांच्याबद्दल आपल्याला कसं शिकता येईल? एक मार्ग म्हणजे, बायबल कथांचं माझं पुस्तक  पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचणं. यहोवा आणि येशूबद्दल ते आपल्याला बरंच काही सांगतं, नाही का? त्यांनी आतापर्यंत केलेल्या आणि यापुढे ते करणार असलेल्या गोष्टींबद्दल, ते खूपसं सांगतं. पण नुसतं हे पुस्तक वाचण्यापेक्षा आपण अधिक केलं पाहिजे.

जमिनीवर पडलेलं दुसरं एक पुस्तक तुम्हाला दिसतं का? ते बायबल आहे. या पुस्तकातल्या गोष्टी ज्यांच्यावर आधारल्या आहेत, ते बायबलमधले भाग तुम्हाला वाचून दाखवायला, कोणाला तरी सांगा. आपणा सर्वांना यहोवाची सेवा योग्य रितीनं करता यावी, आणि अनंत जीवन मिळावं, म्हणून आपल्याला हवी असलेली पूर्ण माहिती बायबल देतं. तेव्हा, वारंवार बायबलचा अभ्यास करायची सवय आपण लावून घेतली पाहिजे.

पण यहोवा देव आणि येशू ख्रिस्ताबद्दल फक्‍त शिकणं, पुरेसं नाही. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या शिकवणींबद्दल खूप खूप ज्ञान असूनही आपल्याला अनंत जीवन मिळेलच, असं नाही. आणखी कशाची गरज आहे, ते तुम्हाला माहीत आहे का?

शिकलेल्या गोष्टींनुसार आपण जगलंही पाहिजे. तुम्हाला यहूदा इस्कर्योत आठवतो का? आपले प्रेषित होण्यासाठी येशूनं निवडलेल्या १२ जणात, तो होता. यहूदाला यहोवा आणि येशूबद्दल खूप माहिती होती. पण त्याचं काय झालं? काही वेळानं तो स्वार्थी झाला; आणि चांदीच्या ३० नाण्यांसाठी त्यानं येशूच्या शत्रूंना त्याची ओळख दिली. त्यामुळे यहूदाला अनंत जीवन मिळणार नाही.

६९ व्या कथेत गेहजी नावाच्या माणसाबद्दल आपण शिकलो होतो. तो तुम्हाला आठवतो का? त्याचे नसलेले काही कपडे आणि पैसे त्याला हवे होते. त्या गोष्टी मिळाव्या म्हणून तो खोटं बोलला. पण यहोवानं त्याला शिक्षा केली. तसंच आपण त्याचे नियम पाळले नाहीत तर, तो आपल्यालाही शिक्षा करील.

परंतु ज्यांनी प्रामाणिकपणे यहोवाची सेवा केली, असे बरेच चांगले लोक आहेत. आपल्याला त्यांच्यासारखं व्हावसं वाटतं, नाही का? लहानग्या शमुवेलाचं उदाहरण गिरवण्यासारखं चांगलं आहे. ५५ व्या गोष्टीत आपण पाहिल्याप्रमाणे, दर्शनमंडपात तो यहोवाची सेवा करायला लागला तेव्हा, फक्‍त चार-पाच वर्षांचा होता. त्यामुळे, तुम्ही कितीही लहान असलात तरी, यहोवाची सेवा न करता येण्याइतके लहान नाही.

अर्थात, आपणा सर्वांना ज्याचं अनुकरण करावसं वाटतं, ती व्यक्‍ती आहे, येशू ख्रिस्त. ८७ व्या कथेत दाखवल्याप्रमाणे, लहानसा मुलगा असतानाही, इतरांशी त्याच्या स्वर्गीय पित्याबद्दल बोलत, तो मंदिरात होता. आपण त्याचं उदाहरण अनुसरू या. आपला अद्‌भुत देव यहोवा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त, यांच्याबद्दल, जितक्यांना शक्य असेल तितक्या लोकांना आपण सांगू या. या गोष्टी आपण केल्या, तर मग, पृथ्वीवरच्या देवाच्या नवीन परादीसमध्ये आपण अनंत काळ जगू शकू.