व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय ७

घरात एखादा बंडखोर आहे का?

घरात एखादा बंडखोर आहे का?

१, २. (अ) येशूने यहुदी धार्मिक नेत्यांचा अविश्‍वासूपणा ठळकपणे दाखवण्यासाठी कोणता दाखला दिला? (ब) येशूच्या दाखल्यापासून युवकांबद्दल कोणता मुद्दा आपण शिकू शकतो?

 येशूने त्याच्या मृत्यूच्या काही दिवसांआधी, यहुदी धार्मिक नेत्यांच्या एका गटाला विचारप्रवर्तक प्रश्‍न विचारला. त्याने म्हटले: “तुम्हास काय वाटते ते सांगा बरे! एका मनुष्याला दोन मुलगे होते; तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला, मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर. त्याने उत्तर दिले, जातो महाराज; पण तो गेला नाही. मग दुसऱ्‍याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले. पण तो म्हणाला, मी नाही जात. तरी नंतर त्याला पस्तावा होऊन तो गेला. ह्‍या दोघांतून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले?” ते यहुदी नेते म्हणाले, “दुसऱ्‍या मुलाने.”—मत्तय २१:२८-३१.

येशू, येथे यहुदी नेत्यांच्या अविश्‍वासूपणाला स्पष्ट करीत होता. ते देवाची इच्छा पूर्ण करण्याचे वचन देणारे पण त्याच्या वचनाचे पालन न करणाऱ्‍या पहिल्या मुलासारखे होते. परंतु, येशूचा दाखला कौटुंबिक जीवनाची चांगली समज यावर आधारित होता असे अनेक पालक ओळखतील. त्याने उत्तम रितीने दाखवल्यानुसार, तरुण लोक काय विचार करतात अथवा काय करतील हे आगाऊ सांगणे अनेकदा कठीण असते. एखादी तरुण व्यक्‍ती पौगंडावस्थेत अनेक समस्यांसाठी कदाचित कारणीभूत ठरेल आणि मग ती मोठी होऊन एक जबाबदार, आदरणीय प्रौढ व्यक्‍ती बनते. आपण किशोरवयीनाच्या बंडाळीच्या समस्येची चर्चा करतो तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.

बंडखोर म्हणजे काय?

३. पालकांनी त्यांच्या मुलाला बंडखोर असे लेबल लगेच का लावू नये?

किशोरवयीन त्यांच्या पालकांविरुद्ध उघडपणे बंडाळी करत असल्याचे तुम्ही अधूनमधून ऐकत असाल. किशोरवयीनावर नियंत्रण ठेवणे अशक्य वाटत असलेल्या एखाद्या कुटुंबाविषयी कदाचित तुम्हाला माहीत असेल. तथापि, एखादे मूल खरोखरच बंडखोर आहे का, हे जाणणे नेहमीच सोपे नसते. याशिवाय, काही मुले बंडाळी करतात आणि त्याच घरातील इतर करीत नाहीत हे समजणे कठीण असू शकेल. एखादे मूल पक्के बंडखोर होत असल्याचा संशय पालकांना येत असल्यास, त्यांनी काय करावे? याचे उत्तर देण्यासाठी, बंडखोर म्हणजे काय याबद्दल प्रथम आपण बोलले पाहिजे.

४-६. (अ) बंडखोर काय आहे? (ब) आपला किशोरवयीन वेळोवेळी अवज्ञा करतो तेव्हा पालकांनी काय लक्षात ठेवले पाहिजे?

सरळ सांगावयाचे म्हणजे, बंडखोर, स्वेच्छेने आणि वारंवार वरिष्ठ अधिकाराची अवज्ञा करणारी किंवा विरोध आणि अवमान करणारी एखादी व्यक्‍ती होय. अर्थातच, “बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते.” (नीतिसूत्रे २२:१५) यास्तव, सर्वच मुले पालकांच्या आणि इतर अधिकाराच्या एखाद-दुसऱ्‍या प्रसंगी विरोध करतात. हे विशेषपणे शारीरिक आणि भावनात्मक विकासाच्या काळात म्हणजे पौगंडावस्थेत खरे असते. कोणत्याही व्यक्‍तीच्या जीवनातील बदल तणाव निर्माण करील आणि पौगंडावस्था हा अनेक बदलाचा काळ असतो. तुमचा किशोरवयीन मुलगा अथवा मुलगी बाल्यावस्थेपासून तारुण्यात प्रवेश करीत आहे. या कारणास्तव, तारुण्याच्या वर्षांमध्ये, काही पालक आणि मुलांना एकमेकांबरोबर जुळवून घेणे कठीण जाते. अनेकदा, किशोरवयीनांची गती वाढवण्याची इच्छा असते पण पालक या बदलाची गती कमी करण्यासाठी सहजप्रवृत्तीने प्रयत्न करतात.

बंडखोर किशोरवयीन पालकीय मूल्यांकडे पाठ फिरवतो. तथापि, हे लक्षात ठेवा, अवज्ञांच्या काही कृत्यांमुळे एखादा बंडखोर बनतो असे नाही. आध्यात्मिक गोष्टींची बाब येते तेव्हा सुरवातीला काही मुले कदाचित बायबल सत्याबद्दल कमी अथवा काहीच आवड दाखवणार नाहीत तरी ते बंडखोर नसतील. पालक या नात्याने, तुमच्या मुलावर लगेच एखादे लेबल लावू नका.

पालकीय अधिकाराविरुद्ध बंड हे सर्व तरुण लोकांच्या पौगंडावस्थेच्या वर्षांमधील विशेष लक्षण असते का? कदापिही नाही. केवळ अल्पसंख्यांक किशोरवयीन युवक गंभीर बंडाळी करत असल्याचा पुरावा दिसेल. तरीही, हट्टीपणाने आणि वारंवारपणे एखादे मूल बंड करत असल्यास काय? अशा बंडाळीला काय चिथावणी देते?

बंडाळीची कारणे

७. सैतानी वातावरण, एखाद्या मुलास बंड करण्यास कसे प्रभाव पाडू शकते?

बंडाळीचे प्रमुख कारण, जगाचे सैतानी वातावरण आहे. “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) सैतानाला वश झालेल्या जगाने, घातक संस्कृती विकसित केली आहे ज्याबरोबर ख्रिश्‍चनांना लढत द्यावी लागते. (योहान १७:१५) ती संस्कृती उद्धट, अधिक धोकादायक आणि पूर्वीपेक्षा आज अधिक वाईट प्रभावांनी भरलेली आहे. (२ तीमथ्य ३:१-५, १३) जर पालकांनी त्यांच्या मुलांना शिकवले नाही, इशारा दिला नाही आणि मुलांचे रक्षण केले नाही तर तरुण जण ‘आज्ञा मोडणाऱ्‍या लोकात आता कार्य करणाऱ्‍या आत्म्याने’ सहजपणे भारावून जाऊ शकतील. (इफिसकर २:२) समवयस्कांकडील दवाब देखील याजशी संबंधित आहे. बायबल म्हणते: “मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीतिसूत्रे १३:२०) अशाच रीतीने, जे या जगाच्या आत्म्याने भरलेले आहेत अशांची संगती धरणाऱ्‍यावर शक्यतो या आत्म्याचा प्रभाव होऊ शकतो. ईश्‍वरी तत्त्वांचे आज्ञापालन, सर्वोत्तम जीवनमार्गाचा पाया असल्याचे समजण्यासाठी तरुणांना सतत मदतीची गरज असते.—यशया ४८:१७, १८.

८. कोणते घटक बंडाळी करण्यास मुलाला प्रवृत्त करू शकतात?

बंडाळीचे दुसरे कारण, कदाचित घरातील वातावरण असू शकते. उदाहरणार्थ, एखादा पालक मद्यपी, अंमली पदार्थांचा दुरुपयोग करणारा, किंवा सोबत्याच्याप्रती हिंसक असला तर किशोरवयीनाचा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन विकृत होऊ शकतो. तुलनात्मकरीत्या शांती असणाऱ्‍या घरांत देखील, पालकांना मुलांबद्दल काही आस्था नसल्याचे मुलांना वाटते तेव्हा बंडाळीचा उद्रेक होऊ शकतो. परंतु, किशोरवयीनांची बंडाळी सर्वदाच बाहेरील प्रभावांमुळे घडत नाही. ईश्‍वरी तत्त्वांचा अवलंब करणारे आणि अधिक प्रमाणात सभोवतालच्या जगापासून निवारा देणारे पालक असतानाही काही मुले पालकीय मूल्यांकडे आपली पाठ फिरवतात. का बरे? कदाचित आपल्या समस्येचे आणखी एक मूळ—मानवी अपरिपूर्णता यामुळे. पौलाने म्हटले: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसामध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” (रोमकर ५:१२) आदाम स्वार्थी बंडखोर होता आणि त्याने आपल्या सर्व संततीकरता वाईट वारसा ठेवला. काही तरुण त्यांच्या पूर्वजाप्रमाणे बंडाळी करण्याचीच निवड करतात.

मोकळीक देणारा एली आणि निर्बंध घालणारा रहबाम

९. मुलाचे संगोपन करण्यात कोणती परमावधी एखाद्या मुलाला बंड करण्यास चिथावणी देऊ शकते?

किशोरवयीन बंडाळीला आणखी एका गोष्टीने प्रवृत्त केले आहे व ती म्हणजे मुलांचे संगोपन करण्याबद्दल पालकांचा असंतुलित दृष्टिकोन होय. (कलस्सैकर ३:२१) जाणीव राखणारे काही पालक त्यांच्या मुलांवर अतिशय कडक बंधने घालतात व शिस्त लावतात. इतर पालक, मोकळीक देणारे असतात आणि ते त्यांच्या अनुभव नसणाऱ्‍या युवकांचे रक्षण करील असे मार्गदर्शन पुरवत नाहीत. या दोन टोकांमध्ये समतोल राखणे नेहमीच सोपे नसते. शिवाय वेगवेगळ्या मुलांच्या विविध गरजा असतात. एकाला दुसऱ्‍यापेक्षा अधिक देखरेखीची गरज असेल. तरीही, बायबलमधील दोन उदाहरणे, निर्बंधात्मकपणा किंवा मोकळीक देण्यातील पराकाष्ठेचे धोके दाखवण्यास मदत करतील.

१०. एली बहुधा विश्‍वासू प्रमुख याजक असतानाही एक कमकुवत पालक का होता?

१० प्राचीन इस्राएलचा प्रमुख याजक एली हा एक पिता होता. त्याने ४० वर्षें सेवा केली, तो देवाच्या नियमशास्राबद्दल सुपरिचित असावा यात काही संशय नव्हता. संभवतः, एलीने त्याची रोजची याजकीय कर्तव्ये पूर्ण विश्‍वासाने पार पाडली आणि त्याने देवाचे नियमशास्र हफनी आणि फिनहास या त्याच्या मुलांना पूर्णपणे शिकवले असेल. परंतु, एली त्याच्या पुत्रांचे अधिक लाड पुरवत होता. हफनी आणि फिनहास अधिकृत याजक म्हणून सेवा करीत होते पण ते “अधम” होते, केवळ आपलीच भूक आणि अनैतिक इच्छा भागविण्याची आवड त्यांना होती. तरीही, त्यांनी पवित्र जागेवर लांच्छनास्पद कार्य केले तेव्हा त्यांना अधिकृत याजकपदावरून दूर करण्याचे धैर्य एलीला झाले नाही. त्याने फक्‍त दुर्बलपणे त्यांना दटावले. एलीने मोकळीक दिल्यामुळे देवापेक्षा आपल्या मुलांचा अधिक सन्मान केला. या परिणामस्वरूप, त्याच्या मुलांनी यहोवाच्या शुद्ध उपासनेच्याविरुद्ध बंडाळी केली आणि एलीच्या संपूर्ण घराण्याला विपत्ती सहन करावी लागली.—१ शमुवेल २:१२-१७, २२-२५, २९; ३:१३, १४; ४:११-२२.

११. एलीच्या चुकीच्या उदाहरणापासून पालक काय शिकू शकतात?

११ या घटना घडल्या तेव्हा एलीचे मुलगे प्रौढ होते, पण हा इतिहास शिस्त न लावण्याच्या धोक्यास विशिष्ट करतो. (पडताळा नीतिसूत्रे २९:२१.) काही पालकांचा, प्रेमाचा मोकळीकीसोबत गोंधळ होत असेल, यामुळे आणि स्पष्ट, न बदलणारे तसेच योग्य नियम देण्यात व लागू करण्यात ते अपयशी होत असतील. ईश्‍वरी तत्त्वांचे उल्लंघन केले जाते, तेव्हाही प्रेमळ शिस्तीचा अवलंब करण्याकडे ते दुर्लक्ष करतात. अशा मोकळीकीमुळे त्यांची मुले पालकीय किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अधिकाराला जुमानत नाहीत.—पडताळा उपदेशक ८:११.

१२. अधिकाराचा वापर करताना रहबामने कोणती चूक केली?

१२ अधिकार चालवण्यात रहबाम दुसऱ्‍या परमावधीला उदाहरणाने दाखवतो. तो संयुक्‍त इस्राएल राज्याचा शेवटला राजा होता, पण तो काही चांगला राजा नव्हता. रहबामला वारशाने मिळालेल्या ठिकाणातील लोक, त्याचा पिता शलमोन याने त्यांच्यावर भारी जू लादल्यामुळे असंतुष्ट होते. रहबामने समजदारी दाखवली का? नाही. एका लोकप्रतिनिधी मंडळाने लोकांवरील काही जाच दूर करण्याचे त्याला सांगितले तेव्हा त्याने मसलत देणाऱ्‍या वृद्ध पुरुषांचा सुज्ञ सल्ला ऐकला नाही व लोकांचे जू अधिक भारी करण्याची आज्ञा दिली. त्याच्या अरेरावीपणामुळे दहा उत्तरी गोत्रांना बंडाळी करण्यास चिथावणी मिळाली आणि त्या राज्याचे दोन तुकडे झाले.—१ राजे १२:१-२१; २ इतिहास १०:१८.

१३. पालक, रहबामची चूक कशी टाळू शकतात?

१३ पालक, बायबलमधील रहबामच्या अहवालावरून महत्त्वपूर्ण धडे शिकू शकतात. त्यांनी प्रार्थनेत ‘यहोवाचा शोध’ घेण्याची गरज आहे आणि बायबल तत्त्वांच्या प्रकाशात मुलांचे संगोपन करण्याच्या पद्धतींचे परीक्षण करण्यास हवे. (स्तोत्र १०५:४) उपदेशक ७:७ म्हणते की, “जुलूम केल्याने शहाणा वेडा बनतो.” पूर्ण विचारपूर्वक घातलेल्या मर्यादा, युवकांचे हानीपासून संरक्षण करताना त्यांच्या वाढीस वाव देतात. पण, मुलांनी योग्य प्रमाणाचे स्वावलंबन आणि आत्मविश्‍वास विकसित करण्यापासून परावृत्त केले जाईल इतक्या कडक व संकुचित वातावरणात राहू नये. पालक, योग्य स्वातंत्र्य आणि स्पष्ट केलेल्या दृढ मर्यादा यामध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अनेक किशोरवयीनांचा बंडखोर बनण्याकडे कमी कल असेल.

मूलभूत गरजा पूर्ण केल्याने बंडाळीला प्रतिबंध होऊ शकतो

पालकांनी त्यांच्या मुलांच्या किशोरावस्थेतील समस्यांना तोंड देण्यास त्यांची मदत केल्यास मुले बहुधा मोठी होऊन अधिक स्थिर होतील

१४, १५. पालकांनी त्यांच्या मुलाच्या वाढीकडे कोणत्या दृष्टीने पाहण्यास हवे?

१४ बालक बालपणातून तारुण्यात पदार्पण करत असल्याचे पाहताना पालकांना आनंद होत असला तरी, त्यांचे पौगंड मूल त्यांच्यावर अवलंबून राहण्याऐवजी उचितपणे स्वावलंबी होत असल्याचे दिसते तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटेल. या स्थित्यंतराच्या काळादरम्यान, तुमचे किशोरवयीन मूल अधूनमधून हट्टी असते अथवा सहकार्य देत नसते तेव्हा आश्‍चर्य वाटू देऊ नका. ख्रिस्ती पालकांचे ध्येय, एक प्रौढ, स्थिर आणि जबाबदार ख्रिस्ती व्यक्‍तीची वाढ करावयाची आहे हे लक्षात असू द्या.—पडताळा १ करिंथकर १३:११; इफिसकर ४:१३, १४.

१५ हे कितीही कठीण वाटत असले तरी, अधिक स्वातंत्र्याकरता युवक एखादी विनंती करतात तेव्हा पालकांनी नकारात्मक प्रतिसाद देण्याच्या सवयीला सोडले पाहिजे. हितकर मार्गाने, मुलाने एक व्यक्‍ती या नात्याने वाढण्याची गरज असते. खरोखर, तुलनात्मकपणे लहान वयातच काही किशोरवयीन प्रौढ दृष्टिकोन विकसित करू लागतात. उदाहरणार्थ, तरुण योशीया राजाबद्दल बायबल म्हणते: “अद्याप लहानच [सुमारे १५ वर्षांचा] असता आपला बाप दावीद याच्या देवाला शोधू लागला.” स्पष्टपणे, हा उल्लेखनीय किशोर एक जबाबदार व्यक्‍ती होता.—२ इतिहास ३४:१-३, पंडिता रमाबाई भाषांतर.

१६. मुलांना अधिक जबाबदारी दिली जाते तसे त्यांनी काय जाणून घेतले पाहिजे?

१६ तथापि, स्वातंत्र्याबरोबर एक जबाबदारी येते. या कारणास्तव, तुमच्या उदय पावत असलेल्या तरुणाला त्याचे काही निर्णय आणि कार्ये यांचे परिणाम अनुभवू द्या. “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल,” हे तत्त्व किशोरवयीनांना तसेच प्रौढांना देखील लागू होते. (गलतीकर ६:७) मुलांना सर्वकाळ आसरा दिला जाऊ शकत नाही. तथापि, तुमच्या मुलाला, पूर्णपणे अस्वीकृत असलेली एखादी गोष्ट करण्याची इच्छा झाल्यास काय? एक जबाबदार पालक या नात्याने, त्याला “नाही” असे म्हटले पाहिजे. याची कारणे देत असताना, तुमचे नाही असे म्हणणे कोणत्याही गोष्टीमुळे होय यामध्ये बदलू नये. (पडताळा मत्तय ५:३७.) तरीसुद्धा, शांत आणि समंजसपणे “नाही” असे म्हणण्याचा प्रयत्न करा, कारण “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते.”—नीतिसूत्रे १५:१.

१७. पालकांनी पूर्ण केल्या पाहिजेत अशा किशोरवयीनाच्या काही गरजा कोणत्या आहेत?

१७ निर्बंध आणि नियमांबद्दल तरुणांची नेहमीच सहमती नसली तरी त्यांना सतत शिस्तीद्वारे मिळणाऱ्‍या सुरक्षिततेची गरज असते. पालकांनी एखाद्या वेळी वाटते त्यानुसार नियम वारंवार बदलत राहिल्यास ते निराश करणारे ठरते. याशिवाय, लाजाळूपणा किंवा आत्मविश्‍वासाची उणीव यांना तोंड देताना किशोरवयीनाला आवश्‍यकतेनुसार उत्तेजन आणि मदत मिळाल्यास, संभवतः त्यांची वाढ होऊन तो अधिक दृढ होईल. पालकांचा भरवसा मिळवतात तेव्हा किशोरवयीन याचीही गुणग्राहकता बाळगतात.—पडताळा यशया ३५:३, ४; लूक १६:१०; १९:१७.

१८. किशोरवयीनांबद्दल काही उत्तेजनदायक सत्य कोणती आहेत?

१८ घरात शांती, स्थैर्य आणि प्रेम असते तेव्हा सामान्यपणे मुले बहरतात हे पालकांनी जाणल्याने त्यांना सांत्वन मिळू शकते. (इफिसकर ४:३१, ३२; याकोब ३:१७, १८) अनेक तरुणांची वाढ वाईट वातावरणातही, मद्यपी, हिंसा किंवा इतर हानीकारक प्रभाव असलेल्या कुटुंबात झालेली असली तरी मोठे होऊन ते चांगले प्रौढ बनले आहेत. यास्तव, तुमच्या किशोरवयीनांना प्रेम, आपुलकी व लक्ष दिले जाईल हे जाणून तुम्ही त्यांना सुरक्षित वाटेल असे घर पुरवल्यास—मग त्या पाठिंब्यासह, शास्रवचनीय तत्त्वांनुरुप योग्य निर्बंध आणि शिस्त देखील दिली जात असली, तरी—मोठे होऊन ते तुम्हाला अभिमान वाटेल असे प्रौढ बनतील याची अधिक शक्यता आहे.—पडताळा नीतिसूत्रे २७:११.

मुले अडचणीत सापडतात तेव्हा

१९. पालकांनी मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला देताना मुलावर कोणती जबाबदारी येते?

१९ चांगल्या पालकत्वात निश्‍चितपणे वेगळेपणा दिसतो. नीतिसूत्रे २२:६ म्हणते: “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” परंतु, चांगले पालक असतानाही गंभीर समस्या असणाऱ्‍या मुलांबद्दल काय? हे शक्य आहे का? होय. नीतिसूत्रामधील शब्द, पालकांचे “ऐक” व त्यांचे आज्ञापालन कर असे मुलाच्या जबाबदारीवर जोर देणाऱ्‍या इतर वचनांच्या प्रकाशात समजण्यास हवे. (नीतिसूत्रे १:८) कौटुंबिक एकवाक्यता असण्यासाठी पालक आणि मुलांनी शास्रवचनीय तत्त्वे लागू करण्यात सहकार्य दिले पाहिजे. पालक आणि मुलांनी एकत्र मिळून कार्य केले नाही तर अडचणी उद्‌भवतील.

२०. अविचारीपणामुळे मूल चूक करते तेव्हा पालकांचा सुज्ञ पवित्रा कोणता असू शकेल?

२० किशोरवयीन अपराध करतो आणि अडचणीत सापडतो तेव्हा पालकांनी कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे? विशेषकरून, तेव्हा तरुणाला मदतीची गरज असते. पालकांनी, अनुभव नसणाऱ्‍या तरुणाबरोबर व्यवहार करत असल्याचे लक्षात ठेवल्यास, ते अधिक सहजपणे प्रतिकाराच्या प्रवृत्तीचा विरोध करतील. पौलाने मंडळीतील प्रौढांना सल्ला दिला: “कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहा ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा.” (गलतीकर ६:१) एखादी तरुण व्यक्‍ती अविचारामुळे अपराध करते तेव्हा हीच पद्धत पालक देखील अनुसरू शकतात. तरुणाचे वर्तन चुकीचे का होते आणि पुनःपुन्हा चुका करण्याचे तो कसे टाळू शकतो हे स्पष्टपणे सांगताना, तरुण नव्हे तर चुकीचे वर्तन वाईट असल्याचे पालकांनी स्पष्ट केले पाहिजे.—पडताळा यहूदा २२, २३.

२१. ख्रिस्ती मंडळीच्या उदाहरणाचे अनुकरण करून मुलाने गंभीर पातक केल्यास पालकांनी कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे?

२१ तरुणाशी केला जाणारा दुर्व्यवहार अधिक गंभीर असल्यास काय? त्या प्रकरणात मुलाला विशेष मदतीची आणि कुशल निर्देशनाची आवश्‍यकता असते. मंडळीतील एखादा सदस्य गंभीर पाप करतो तेव्हा त्याला पश्‍चात्ताप करण्याचे आणि मदतीकरता वडिलांकडे जाण्याचे प्रोत्साहन दिले जाते. (याकोब ५:१४-१६) त्याने पश्‍चात्ताप केल्यावर, आध्यात्मिकरीत्या तो पूर्ववत होण्यासाठी वडील त्याच्यासोबत कार्य करतात. पालकांना या गोष्टीची चर्चा वडिलांसोबत करण्याची गरज असली तरी कुटुंबात अपराधी किशोरवयीनाला मदत करण्याची जबाबदारी प्रामुख्याने पालकांवर येते. त्यांच्या एखाद्या मुलाने घोर पातक केल्यास त्यांनी वडील वर्गापासून ते लपवण्याचा प्रयत्न निश्‍चितच करू नये.

२२. मुलाने गंभीर पाप केल्यास, यहोवाचे अनुकरण करून पालक कोणती मनोवृत्ती राखण्याचा प्रयत्न करतील?

२२ एखाद्याची स्वतःची मुले गंभीर समस्येत असतात तेव्हा ते कसोटीस उतरवणारे असते. भावनात्मकरित्या बेचैन असल्यामुळे हेकेखोर मुलाला रागाने धमकी द्यावी असे पालकांना वाटेल पण यामुळे त्याला दुखवले जाईल. या कठीण काळात त्या तरुणाला कशी वागणूक दिली जाते यावर त्याचे भविष्य आधारित असेल हे लक्षात ठेवा. जे बरोबर होते त्यापासून यहोवाचे लोक दूर गेले तेव्हा त्यांनी पश्‍चात्ताप केला तर—तो त्यांना क्षमा करण्यास तयार होता हे देखील लक्षात ठेवा. त्याचे प्रेमळ शब्द ऐका: “परमेश्‍वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील.” (यशया १:१८) पालकांसाठी किती उत्तम उदाहरण!

२३. पालकांनी त्यांच्या एखाद्या मुलाने गंभीर पाप केल्यावर कसे कार्य केले पाहिजे आणि काय टाळले पाहिजे?

२३ या कारणास्तव, आपल्या हेकेखोराला त्याचा मार्ग बदलण्याचे प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा. अनुभवी पालक आणि मंडळीच्या वडिलांकडील चांगला सल्ला घ्या. (नीतिसूत्रे ११:१४) भावनावश होऊन कार्य करण्याचा अथवा मुलाने परत तुमच्याकडे येण्यास त्याला कठीण बनवील असे बोलण्याचा किंवा काही करण्याचा प्रयत्न करू नका. अनियंत्रित क्रोध आणि कटुता टाळा. (कलस्सैकर ३:८) लगेच नाउमेद होऊ नका. (१ करिंथकर १३:४, ७) वाईटपणाचा द्वेष करताना तुमच्या मुलाप्रती निष्ठुर आणि कटू होण्याचे टाळा. अधिक महत्त्वाचे म्हणजे, पालकांनी उत्तम उदाहरण मांडण्याचा आणि देवावरील त्यांचा विश्‍वास दृढ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

करारी बंडखोराला हाताळणे

२४. ख्रिस्ती कुटुंबात काही वेळा कोणती वाईट परिस्थिती उद्‌भवते आणि पालकाने तिला कसा प्रतिसाद दिला पाहिजे?

२४ काही प्रकरणात, एखाद्या तरुणाने बंड करण्याचा आणि ख्रिस्ती मूल्यांना पूर्णपणे नाकारण्याचा ठाम निश्‍चय केलेला आहे हे स्पष्ट होते. मग कुटुंबातील इतर मुलांचे कौटुंबिक जीवन टिकवून ठेवणे किंवा त्याची पुनः उभारणी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. इतर मुलांकडे दुर्लक्ष होईल अशाप्रकारे तुमची सर्व शक्‍ती बंडखोराकडे न लावण्याची खबरदारी घ्या. कुटुंबातील बाकीच्यांपासून समस्या लपवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्याबरोबर उचित प्रमाणात आणि हमी देणाऱ्‍या रीतीने त्या विषयाची चर्चा करा.—पडताळा नीतिसूत्रे २०:१८.

२५. (अ) एखादे मूल करारी बंडखोर बनल्यास, ख्रिस्ती मंडळीच्या नमुन्याचे अनुकरण करून पालकांना याची हाताळणी कशी करावी लागेल? (ब) एखादे मूल बंड करते तेव्हा पालकांनी काय लक्षात ठेवले पाहिजे?

२५ प्रेषित योहानाने मंडळीत कोडगा बंडखोर बनलेल्या व्यक्‍तीविषयी म्हटले: “त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका.” (२ योहान १०) पालकांना, त्यांचे मूल सज्ञान आणि पूर्णपणे बंडखोर असल्यास त्याच्याबाबतीत अशीच भूमिका घेणे आवश्‍यक वाटेल. अशी भूमिका कठीण आणि मानसिक दुःख देणारी असली, तरी काही वेळा बाकीच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी हे आवश्‍यक आहे. तुमच्या घराण्याला तुमच्या सुरक्षिततेची आणि सतत देखरेखीची गरज आहे. या कारणास्तव, स्पष्टपणे सांगितलेल्या पण बेताच्या वर्तनाच्या मर्यादा राखा. इतर मुलांसोबत दळणवळण चालू ठेवा. शाळेत आणि मंडळीत त्यांचे कसे चालले आहे यात रस घ्या. तसेच, बंडाळी करणाऱ्‍या मुलाच्या कार्याला तुमची संमती नसली तरी त्याचा तुम्ही द्वेष करत नाही हे त्यांना कळू द्या. मुलाचा नव्हे तर त्याच्या वाईट कार्याचा धिक्कार करा. याकोबाच्या मुलांच्या क्रूर कृत्यामुळे त्याच्या कुटुंबाला समाजाने वाळीत टाकले तेव्हा याकोबाने त्याच्या मुलांना नव्हे तर त्यांच्या हिंसक क्रोधाला शाप दिला.—उत्पत्ति ३४:१-३१; ४९:५-७.

२६. एखादे मूल बंड करते तेव्हा विचारशील पालक कोणत्या गोष्टीपासून सांत्वन मिळवू शकतात?

२६ तुमच्या कुटुंबात जे घडले त्याबद्दल तुम्ही जबाबदार असल्याचे तुम्हाला वाटेल. तुम्ही प्रार्थनापूर्वक तुमच्या परीने सर्व काही केल्यास व होता होईल तितका यहोवाचा सल्ला अनुसरल्यास स्वतःला अवाजवीपणे दोष देण्याची गरज नाही. कोणीही परिपूर्ण पालक होऊ शकत नाही, पण एक चांगले पालक होण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केला, या वस्तुस्थितीपासून समाधान प्राप्त करा. (पडताळा प्रेषितांची कृत्ये २०:२६.) कुटुंबात निखालस बंडखोर असणे म्हणजे हृदयभंग करून टाकणारे असते, परंतु असे तुमच्याबाबतीत घडले तर देव ही गोष्ट समजतो आणि तो त्याच्या समर्पित सेवकांचा कधीही त्याग करणार नाही याची खातरी बाळगा. (स्तोत्र २७:१०) म्हणूनच बाकीच्या मुलांकरता तुमचे घर एक सुरक्षित, आध्यात्मिक निवाऱ्‍याची जागा ठेवा.

२७. उधळ्या पुत्राचा दाखला लक्षात ठेवून, बंडाळी करणाऱ्‍या मुलाचे पालक कशाबद्दल नेहमीच आशा बाळगू शकतात?

२७ याशिवाय, तुम्ही कधीही नाउमेद होऊ नये. कदाचित भरकटलेल्या मुलाच्या अंतःकरणावर योग्य प्रशिक्षण देण्याच्या सुरवातीच्या प्रयत्नांचा परिणाम सरतेशेवटी होईल आणि तो ताळ्यावर येईल. (उपदेशक ११:६) अनेक ख्रिस्ती कुटुंबांना तुमच्यासारखाच अनुभव आलेला आहे आणि त्यांच्यातील काहींनी येशूच्या दाखल्यातील उधळ्या पुत्राच्या पित्याप्रमाणेच त्यांच्या हेकेखोर मुलांना परतलेले पाहिले आहे. (लूक १५:११-३२) तेच तुमच्याही बाबतीत घडेल.