व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १३

विवाह मोडण्याच्या बेतात असल्यास

विवाह मोडण्याच्या बेतात असल्यास

१, २. एखादा विवाह तणावाखाली असतो तेव्हा कोणता प्रश्‍न विचारला पाहिजे?

 इटलीतील लुसीया नामक एक स्री १९८८ मध्ये अतिशय उदास होती. * दहा वर्षांनंतर तिचा विवाह मोडत होता. तिने पतीसोबत समेट करण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता पण त्याचा काही उपयोग झाला नाही. यास्तव, विसंगततेमुळे वेगळी होऊन आता ती दोन मुलींचे संगोपन करण्याला तोंड देत आहे. त्यावेळेकडे पाहिल्यावर लुसीया म्हणते: “आमचा विवाह कशामुळेही टिकणार नव्हता याबद्दल मी निश्‍चित होते.”

तुम्हाला वैवाहिक समस्या असल्यास, लुसीयाच्या भावनांचा विचार तुम्हाला करता येऊ शकेल. तुमच्या विवाहात समस्या असतील आणि तरीही विवाह बचावला जाऊ शकतो का, याबद्दल कदाचित तुम्ही विचार करत असाल. असे असल्यास, विवाहाला यशस्वी बनविण्याच्या मदतीसाठी देवाने बायबलमध्ये दिलेल्या सर्व चांगल्या सल्ल्याचे अनुकरण मी केले आहे का? या प्रश्‍नाचा विचार करणे तुम्हाला सहायक असल्याचे दिसून येईल.—स्तोत्र ११९:१०५.

३. घटस्फोट घेणे लोकप्रिय झाले असले तरी अनेक घटस्फोटित व्यक्‍ती आणि त्यांच्या कुटुंबांतील कोणत्या प्रतिक्रियांचा अहवाल दिला आहे?

पती-पत्नीमधील तणाव अधिक तीव्र असतात, तेव्हा विवाह संपुष्टात आणणे हा सर्वात सोपा मार्ग असल्याचे वाटू लागेल. परंतु, अनेक देशांनी, ताटातूट झालेल्या कुटुंबांमधील धक्कादायक वाढ पाहिली असली, तरी अधिकांश घटस्फोटित पुरुष आणि स्रियांना विभक्‍त झाल्याचा खेद वाटतो असे अलीकडील अभ्यास दाखवतात. जे विवाह टिकवून ठेवतात त्यांच्यापेक्षा, विभक्‍त होणाऱ्‍यांपैकी अनेकांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांचा अधिक त्रास होतो. घटस्फोट घेणाऱ्‍यांची मुले अनेकदा बऱ्‍याच काळापर्यंत गोंधळात आणि दुःखात असतात. मोडलेल्या कुटुंबातील पालक आणि मित्रांना देखील त्रास होतो. तसेच, विवाहाचा मूळ निर्माता, देव या परिस्थितीकडे ज्या रीतीने पाहतो त्याबद्दल काय?

४. विवाहातील समस्या कशा हाताळल्या पाहिजेत?

आधीच्या अध्यायांमध्ये दिल्याप्रमाणे, विवाह हे जीवनभरचे बंधन असावे असे देवाने उद्देशिले होते. (उत्पत्ति २:२४) तर मग पुष्कळसे विवाह का मोडत आहेत? हे एका रात्रीत घडत नाही. सामान्यपणे काही इशारेवजा संकेत असतात. विवाहातील लहानसहान समस्या दुर्निवार्य झाल्याचे वाटेपर्यंत मोठमोठ्या होत जातात. परंतु, बायबलच्या मदतीने या समस्या तातडीने हाताळल्यास, अनेक वैवाहिक ताटातूट टाळल्या जाऊ शकतात.

वास्तववादी असा

५. कोणत्याही विवाहात कोणत्या वास्तववादी परिस्थितीला तोंड दिले पाहिजे?

काही वेळा समस्या आणणारा एक घटक म्हणजे, कदाचित एका किंवा दोन्ही वैवाहिक सोबत्यांना एकमेकांबद्दल असणाऱ्‍या अवास्तविक अपेक्षा हा आहे. रोमान्स कादंबऱ्‍या, लोकप्रिय नियतकालिके, टीव्हीवरील कार्यक्रम आणि चित्रपट खऱ्‍या जीवनापासून बऱ्‍याच वेगळ्या असणाऱ्‍या आशा आणि स्वप्ने निर्माण करू शकतात. ही स्वप्ने पूर्ण होत नाहीत तेव्हा एखाद्या व्यक्‍तीला फसल्याचे, असंतुष्ट झाल्याचे आणि इतकेच नव्हे, तर कटू भावना वाटू लागते. तर मग, दोन अपरिपूर्ण व्यक्‍ती विवाहात सौख्यानंद कसा मिळवू शकतात? यशस्वी नातेसंबंध बनविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

६. (अ) बायबल, विवाहाबद्दल कोणता संतुलित दृष्टिकोन देते? (ब) विवाहातील मतभेदांची काही कारणे कोणती आहेत?

बायबल व्यावहारिक आहे. ते विवाहातील आनंदाला स्वीकारत असले, तरी जे विवाह करतात त्यांना “हालअपेष्टा भोगाव्या लागतील” असा इशारा देखील ते देते. (१ करिंथकर ७:२८) आधी चर्चिल्याप्रमाणे, दोन्ही सोबती अपरिपूर्ण आहेत आणि त्यांचा कल पापाकडे असतो. प्रत्येक सोबत्याची मानसिक व भावनात्मक घडण तसेच संगोपन वेगवेगळ्या प्रकारे झालेले असते. काही वेळा दांपत्यात पैसा, मुले व सासरकडील लोकांमुळे मतभेद होतात. एकत्र मिळून कार्य करण्यासाठी अपुरा वेळ आणि लैंगिक समस्या या गोष्टी देखील भांडणाचा स्रोत ठरू शकतात. * अशा बाबींना हाताळण्यासाठी वेळ लागतो, पण धैर्य धरा! अधिकांश वैवाहिक जोडपी अशा समस्यांना तोंड देऊ शकतात आणि परस्परांना मान्य असलेले उपाय शोधू शकतात.

मतभेदांची चर्चा करा

७, ८. वैवाहिक सोबत्यात दुःखित भावना किंवा गैरसमजुती असल्यास त्या हाताळण्याचा शास्रवचनीय मार्ग कोणता आहे?

भावनिक दुःख, गैरसमजुती किंवा वैयक्‍तिक कमतरता यांची चर्चा करताना शांत राहणे अनेकांना कठीण वाटते. “तुझा गैरसमज झाल्याचे मला वाटते,” असे प्रामाणिकपणे बोलण्याऐवजी पती किंवा पत्नी कदाचित भावनाविवश होऊन तिखटमीठ लावून समस्या सांगत असतील. अनेक म्हणतील: “तुम्ही केवळ स्वतःचेच पाहता,” किंवा “तुमचे माझ्यावर प्रेम नाही.” वादविवादात सामील होण्याची इच्छा नसल्यामुळे इतर वैवाहिक सोबती प्रतिसाद देण्याचे नाकारतील.

एक उत्तम मार्ग म्हणजे बायबलच्या सल्ल्याचा अवलंब करणे होय: “तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये.” (इफिसकर ४:२६) एका आनंदी विवाहित दांपत्याला ६० व्या लग्नाच्या वाढदिवसात पदार्पण करीत असताना त्यांच्या यशस्वी विवाहाचे रहस्य विचारण्यात आले. पतीने म्हटले: “मतभेद कितीही क्षुल्लक असले, तरी ते मिटवण्याआधी झोपू नये हे आम्ही शिकलो.”

९. (अ) शास्रवचनात दळणवळणाचा एक प्रमुख भाग म्हणून काय असल्याचे दाखवले आहे? (ब) वैवाहिक सोबत्यांना धैर्य आणि नम्रता दाखवावी लागली, तरी देखील अनेकदा काय करण्याची गरज असते?

जेव्हा पती-पत्नी असहमत होतात तेव्हा प्रत्येकाने “ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमे, रागास मंद” असावे. (याकोब १:१९) काळजीपूर्वक ऐकल्यावर दोन्ही सोबत्यांनी क्षमा मागण्याची गरज दिसून येईल. (याकोब ५:१६) “तुला त्रास दिल्याबद्दल मला क्षमा कर,” असे प्रामाणिकपणे बोलण्यास नम्रता आणि साहस लागते. परंतु, मतभेदांना अशा प्रकारे हाताळल्याने वैवाहिक दांपत्यांना हे केवळ त्यांच्या समस्या सोडविण्यात मदत करणार नाही, तर एकमेकांचा सहवास अधिक सुखावह करणारा उबदारपणा आणि सलगी विकसित करण्यात प्रभावकारी असल्याचे दिसून येईल.

वैवाहिक हक्क देणे

१०. पौलाने करिंथकर ख्रिश्‍चनांना शिफारस केलेले कोणते संरक्षण आज ख्रिश्‍चनाला देखील लागू होऊ शकते?

१० प्रेषित पौलाने करिंथकरांना लिहिले तेव्हा त्याने “जारकर्में होत आहेत म्हणून” विवाहाची शिफारस केली. (१ करिंथकर ७:२) आज जग, प्राचीन करिंथसारखे अथवा त्यापेक्षाही अतिशय वाईट आहे. जगातील लोक अनैतिक विषयांची उघडपणे चर्चा करतात, असभ्य पेहराव करतात तसेच नियतकालिके आणि पुस्तके, टीव्ही आणि चित्रपट सादर करीत असलेल्या विषयासक्‍त कथा अवैध लैंगिक वासनांना चेतवतात. अशाच प्रकारच्या परिस्थितीत राहत असलेल्या करिंथकरांना प्रेषित पौलाने म्हटले: “वासनेने जळण्यापेक्षा लग्न करणे बरे.”—१ करिंथकर ७:९.

११, १२. (अ) पती पत्नीने एकमेकांना काय द्यावयाचे आहे आणि कोणत्या मनोवृत्तीने ते दिले पाहिजे? (ब) वैवाहिक हक्क तात्पुरत्या काळापर्यंत थांबवावा लागल्यास, ही परिस्थिती कशी हाताळली जाण्यास हवी?

११ या कारणास्तव बायबल, विवाहित ख्रिश्‍चनांना आज्ञा देते: “पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेहि पतीला द्यावा.” (१ करिंथकर ७:३) येथे देण्यावर जोर दिला आहे—मागणी करण्यावर नाही हे लक्षात घ्या. प्रत्येक सोबत्याने दुसऱ्‍याच्या हिताची काळजी घेतली, तर विवाहातील शारीरिक सलगी खरोखर समाधानकारक असते. उदाहरणार्थ, बायबल पतींना त्यांच्या पत्नींबरोबर “सुज्ञतेने” वागण्याची आज्ञा देते. (१ पेत्र ३:७) हे विशेषपणे वैवाहिक हक्क देणे आणि घेणे याबाबतीत खरे आहे. पत्नीला कोमलपणे न वागवल्यास, विवाहातील या पैलूचा आनंद घेणे तिला कठीण वाटेल.

१२ काही असे प्रसंग असतील ज्यावेळी वैवाहिक सोबत्यांना या वैवाहिक हक्कापासून एकमेकांस वंचित ठेवावे लागेल. पत्नीला महिन्यातील विशिष्ट काळात किंवा अधिक थकल्याचे वाटत असते, तेव्हा हे खरे असू शकते. (पडताळा लेवीय १८:१९.) पती, कामातील गंभीर समस्येला तोंड देत असेल किंवा त्याला भावनात्मकरित्या रिते वाटत असते तेव्हा त्याच्याही बाबतीत हे खरे ठरू शकेल. वैवाहिक हक्क देण्याच्या अशा तात्पुरत्या खंडाबद्दल दोन्ही सोबत्यांनी त्या परिस्थितीची मोकळेपणाने चर्चा करून व “परस्पर संमतीने” मान्य करून त्यास हाताळल्यास उत्तम असेल. (१ करिंथकर ७:५) यामुळे दोन्ही सोबती चुकीचे निष्कर्ष काढणार नाहीत. तथापि, पत्नी आपल्या पतीला वैवाहिक हक्क देण्याचे जाणूनबुजून टाळत असल्यास किंवा एखादा पती प्रेमळपणे वैवाहिक हक्क देण्याकडे बुद्धिपुरस्सर दुर्लक्ष करत असल्यास, सोबती कदाचित मोहाच्या विकारी जाऊ शकतात. अशा वेळी विवाहात समस्या उद्‌भवू शकतात.

१३. ख्रिश्‍चन त्यांची विचारसरणी शुद्ध ठेवण्यासाठी कसे कार्य करू शकतात?

१३ सर्व ख्रिश्‍चनांप्रमाणेच, देवाच्या विवाहित सेवकांनी अशुद्ध आणि अस्वाभाविक वासना निर्माण करणारे बीभत्स साहित्य टाळले पाहिजे. (कलस्सैकर ३:५) त्यांनी सर्व विरुद्ध लिंगी सदस्यांबरोबर वागताना आपले विचार आणि कार्य यांविषयी देखील दक्ष राहिले पाहिजे. येशूने इशारा दिला: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” (मत्तय ५:२८) लैंगिकतेबद्दल बायबलच्या सल्ल्याचा अवलंब करून, जोडप्यांना मोहात पडण्याचे आणि व्यभिचार करण्याचे टाळता आले पाहिजे. ते विवाहातील आल्हाददायक सलगीचा आनंद घेऊ शकतात, ज्यामध्ये लैंगिक संबंधाला विवाहाचा मूळ निर्माता, यहोवा याच्याकडील एक हितकर देणगी म्हणून मोलाचे समजले जाते.—नीतिसूत्रे ५:१५-१९.

घटस्फोटासाठी बायबलचा आधार

१४. काही वेळा कोणती वाईट परिस्थिती येते? का?

१४ अधिकांश ख्रिस्ती विवाहांमध्ये उद्‌भवलेल्या कोणत्याही समस्यांना हाताळले जाऊ शकते. तथापि, काही वेळा असे होत नाही. मानव अपरिपूर्ण असल्यामुळे आणि सैतानाच्या नियंत्रणाधीन असलेल्या पापी जगात राहत असल्यामुळे काही विवाह मोडण्याच्या बेतात असतात. (१ योहान ५:१९) अशा आणीबाणीच्या परिस्थितीत ख्रिश्‍चनांनी कसे वागले पाहिजे?

१५. (अ) पुनर्विवाह करण्याच्या संभाव्यतेसह घटस्फोट घेण्यासाठी केवळ कोणता शास्रवचनीय आधार आहे? (ब) काहींनी अविश्‍वासू वैवाहिक सोबत्याला घटस्फोट न देण्याचा निर्णय का घेतला आहे?

१५ या पुस्तकातील दुसऱ्‍या अध्यायात सांगितल्याप्रमाणे, पुनर्विवाहाच्या संभाव्यतेसह घटस्फोटासाठी केवळ जारकर्म हाच एकमेव आधार आहे. * (मत्तय १९:९) तुमचा वैवाहिक सोबती अविश्‍वासू असल्याचा निश्‍चित पुरावा तुमच्याजवळ असल्यास, तुम्हाला एका कठीण निर्णयाला तोंड द्यावे लागते. तुम्ही विवाह टिकवून ठेवणार की घटस्फोट घेणार? याबद्दल काही नियम नाहीत. काही ख्रिश्‍चनांनी प्रामाणिकपणे पश्‍चात्ताप करणाऱ्‍या सोबत्याला पूर्णपणे क्षमा केली आहे आणि त्यांचा टिकलेला विवाह यशस्वी ठरला आहे. इतरांनी मुलांच्याखातर घटस्फोट न घेण्याचे ठरवले आहे.

१६. (अ) काही जण, पाप केलेल्या वैवाहिक सोबत्याला घटस्फोट देण्यासाठी कोणत्या कारणांमुळे प्रवृत्त झाले आहेत? (ब) एखादा निर्दोष सोबती घटस्फोट देण्याचा अथवा न देण्याचा निर्णय घेतो तेव्हा कोणीही त्याच्या निर्णयाची टीका का करू नये?

१६ दुसऱ्‍या बाजुला पाहता, पापी कृत्यामुळे कदाचित गर्भधारणा किंवा लैंगिक संक्रमित आजार झालेले असतील. अथवा कदाचित, लैंगिक अत्याचार करणाऱ्‍या पालकापासून मुलांचे संरक्षण करण्याची गरज असेल. स्पष्टपणे, एखादा निर्णय घेण्याआधी अनेक गोष्टींचा विचार करावयाचा असतो. तथापि, तुम्हाला वैवाहिक सोबत्याच्या अविश्‍वासूपणाबद्दल समजल्यास व नंतर सोबत्याबरोबर लैंगिक संबंध ठेवल्यास याद्वारे तुम्ही सोबत्याला क्षमा केली आहे व विवाह टिकवून ठेवण्याची तुमची इच्छा आहे हे सुचवत असता. पुनर्विवाह करण्याच्या शास्रवचनीय संभाव्यतेसह, घटस्फोटासाठी काही आधार राहिलेला नसतो. कोणीही लुडबुड्या असू नये व तुमच्या निर्णयावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करू नये तसेच तुम्ही घेतलेल्या निर्णयावर कोणीही टीका झोडू नये. तुम्ही जो काही निर्णय घेता त्याच्या परिणामासह तुम्हाला राहावे लागेल. “प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.”—गलतीकर ६:५.

विभक्‍त होण्यासाठी आधार

१७. जारकर्म न घडल्यास, शास्रवचने विभक्‍त होण्यावर अथवा घटस्फोटावर कोणत्या मर्यादा घालतात?

१७ एखाद्याने जारकर्म केले नसले; तरी वैवाहिक सोबत्यापासून विभक्‍त होणे अथवा त्यास कदाचित घटस्फोट देणे उचित असल्याचे दाखवणाऱ्‍या काही परिस्थिती आहेत का? होय, परंतु अशा प्रकरणात, एखादी ख्रिश्‍चन व्यक्‍ती पुनर्विवाह करण्याच्या दृष्टीने तिऱ्‍हाईत व्यक्‍तीबरोबर राहण्यास मुक्‍त नसते. (मत्तय ५:३२) बायबल अशा विभक्‍त होण्याला विचारात घेत असताना, विभक्‍त होणाऱ्‍याने ‘लग्न केल्यावाचून राहावे किंवा समेट करावा,’ अशी अट घालते. (१ करिंथकर ७:११) विभक्‍त होण्यास योग्य वाटणाऱ्‍या काही टोकाच्या परिस्थिती कोणत्या आहेत?

१८, १९. एखाद्या वैवाहिक सोबत्याला, पुनर्विवाहाची शक्यता नसली तरी कायदेशीररित्या विभक्‍त होण्याच्या अथवा घटस्फोट घेण्याच्या योग्यतेला तोलून पाहण्यास लावणाऱ्‍या काही टोकाच्या परिस्थिती कोणत्या आहेत?

१८ पतीचा आळशीपणा आणि वाईट सवयींमुळे कुटुंब कंगाल झालेले असेल. * तो कुटुंबाचे उत्पन्‍न जुगारीत उडवत असेल अथवा त्याचा वापर अंमली पदार्थ किंवा मद्याच्या व्यसनासाठी करत असेल. बायबल म्हणते: “जर कोणी . . . आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्‍वास नाकारला आहे; तो माणूस विश्‍वास न ठेवणाऱ्‍या माणसापेक्षा वाईट आहे.” (१ तीमथ्य ५:८) असा एखादा पुरुष आपल्या मार्गात बदल करण्याचे नाकारत असल्यास किंवा आपल्या दुर्गुणांना पूर्ण करण्यासाठी पत्नी कमावत असलेले पैसे देखील घेत असल्यास, पत्नी कायदेशीररित्या विभक्‍त होऊन स्वतःचे व आपल्या मुलांच्या हिताचे संरक्षण करण्याची निवड करू शकते.

१९ एखादा वैवाहिक सोबती अतिशय हिंसक असल्यास, कदाचित त्याच्या सोबत्याचे स्वास्थ्य, इतकेच नव्हे तर जीवन धोक्यात जाईपर्यंत वारंवार मारहाण करीत असल्यासही अशा वैध कारवाईचा विचार केला जाऊ शकेल. या व्यतिरिक्‍त, एखादा सोबती आपल्या वैवाहिक सोबत्याने काही बाबतीत देवाच्या आज्ञा तोडाव्यात म्हणून जबरदस्ती करण्याचा सतत प्रयत्न करत असल्यास विशेषपणे आध्यात्मिक जीवन धोक्यात असण्यापर्यंत बाबी पोहंचल्या, तर धमकी मिळालेला सोबती देखील विभक्‍त होण्याचा विचार करू शकेल. जीवन धोक्यामध्ये असलेला सोबती कदाचित असा निष्कर्ष काढेल की ‘मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानण्यासाठी’ कायदेशीररित्या विभक्‍त होणे हाच एकमेव मार्ग आहे.—प्रेषितांची कृत्ये ५:२९.

२०. (अ) कुटुंब मोडकळीस आल्यास प्रौढ मित्र आणि वडील काय देऊ शकतात आणि त्यांनी काय देऊ नये? (ब) विवाहित व्यक्‍तींनी विभक्‍त होणे आणि घटस्फोट घेणे यांविषयीच्या बायबलच्या संदर्भांचा काय करण्यासाठी सबब म्हणून उपयोग करू नये?

२० वैवाहिक सोबत्यातील टोकाच्या सर्व प्रकरणांत कोणीही निर्दोष सोबत्यावर विभक्‍त होण्याचा किंवा त्याच्यासोबतच राहण्याचा दबाव आणू नये. प्रौढ मित्र आणि वडील बायबलवर आधारित सल्ला देत असले, तरी पती-पत्नीमध्ये नेमके काय चालले आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती त्यांना मिळू शकत नाही. केवळ यहोवा ते पाहू शकतो. अर्थातच, एखादी ख्रिस्ती पत्नी विवाहातून बाहेर पडण्यासाठी क्षुल्लक सबबी सांगत असल्यास, ती देवाच्या विवाह-व्यवस्थेचा सन्मान करत नाही. परंतु, अतिशय धोकादायक परिस्थिती तशीच चालू राहिल्यास, ती विभक्‍त होण्याची निवड करते तेव्हा कोणीही तिची टीका करू नये. हेच, विभक्‍त होणाऱ्‍या एखाद्या ख्रिस्ती पतीच्या बाबतीत देखील म्हटले जाऊ शकते. ‘आपणांतील सर्वांना देवाच्या न्यायासनासमोर उभे राहायचे आहे.’—रोमकर १४:१०.

मोडलेल्या विवाहाचा बचाव कसा करण्यात आला

२१. बायबलचा विवाहाबद्दल असलेला सल्ला उपयोगी ठरतो हे कोणत्या अनुभवावरून दिसते?

२१ आधी उल्लेख केलेल्या लुसीयाला आपल्या पतीपासून विभक्‍त होऊन महिने झाल्यावर तिची यहोवाच्या साक्षीदारांशी भेट झाली आणि तिने बायबल अभ्यास सुरू केला. ती म्हणते, “बायबलने माझ्या समस्येवर व्यावहारिक उपाय सादर केला याचे मला आश्‍चर्य वाटले. अभ्यासाच्या केवळ एक आठवड्यानंतर लगेच, मला पतीबरोबर समेट करावयाचा होता. आज मी म्हणू शकते की बिकट परिस्थिती असताना विवाहांचा बचाव कसा करावा ते यहोवा जाणतो कारण त्याच्या शिकवणी, सोबत्यांनी एकमेकांना मान कसा द्यावा हे शिकण्याची त्यांना मदत करतात. यहोवाचे साक्षीदार कुटुंबाचे विभाजन करतात असे प्रतिपादन काही लोक करतात, ते खरे नाही. माझ्याबाबतीत हे अगदी उलट होते.” लुसीया तिच्या जीवनात बायबल तत्त्वांचा अवलंब करण्यास शिकली.

२२. सर्व विवाहित जोडप्यांचा भरवसा कशावर असला पाहिजे?

२२ लुसीया अपवाद नाही. विवाह हा एक बोजा नव्हे तर एक आशीर्वाद असावयास हवा. याकरता यहोवाने विवाह सल्ल्याचा एक उत्तम लिखित स्रोत—म्हणजे त्याचे बहुमोल वचन दिले आहे. बायबल ‘भोळ्यांस समंजस’ करू शकते. (स्तोत्र १९:७-११) त्याने मोडण्याच्या बेताला असलेले अनेक विवाह वाचवले आहेत आणि गंभीर समस्या असलेल्या पुष्कळांत सुधारणा घडवून आणल्या आहेत. यहोवा देव देत असलेल्या विवाह सल्ल्यावर सर्व विवाहित जोडप्यांचा पूर्ण भरवसा राहो. तो सल्ला खरोखर उपयोगी ठरतो!

^ परि. 1 नाव बदलले आहे.

^ परि. 6 यातील काही गोष्टींची चर्चा आधीच्या अध्यायांमध्ये करण्यात आली होती.

^ परि. 15 “जारकर्म” असे अनुवादित केलेल्या बायबल संज्ञेत व्यभिचाराची कृत्ये, समलैंगिकता, पशुगमन आणि लैंगिक अवयवांचा प्रयोग करणाऱ्‍या इतर जाणूनबुजून केलेल्या अवैध कृत्यांचा समावेश होतो.

^ परि. 18 परंतु, एखादा पती सद्‌हेतू बाळगत असला, तरी आजारपण किंवा नोकऱ्‍या उपलब्ध नसणे यासारख्या त्याच्या हाताबाहेर असलेल्या कारणांमुळे तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करू शकत नसल्यास, यामध्ये अशा परिस्थितींचा समावेश होत नाही.