व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आधुनिक जीवनासाठी उपयुक्‍त पुस्तक

आधुनिक जीवनासाठी उपयुक्‍त पुस्तक

आधुनिक जीवनासाठी उपयुक्‍त पुस्तक

सल्ला देणारी पुस्तके आजच्या जगात फारच लोकप्रिय आहेत. पण काही काळातच ती कालबाह्‍य होतात आणि त्यांत सुधारणा करण्याची गरज पडते किंवा नवीन पुस्तके त्यांची जागा घेतात. बायबलविषयी काय? ते सुमारे २,००० वर्षांपूर्वी लिहून पूर्ण झाले. तरीसुद्धा, त्यातील मूळ संदेशात कधीही सुधारणा करण्यात आली नाही किंवा आधुनिक प्रमाणांनुसार त्यात फेरबदल करण्यात आले नाहीत. अशा पुस्तकात आपल्या काळाकरता उपयुक्‍त मार्गदर्शन असणे शक्य आहे का?

काहींच्या मते हे शक्य नाही. “एखाद्या आधुनिक रसायनशास्त्राच्या वर्गात पाठ्यपुस्तकाची १९२४ सालची आवृत्ती वापरण्याचा सल्ला थोडाच कुणी देणार आहे,” असे म्हणून, डॉ. ईलाय एस. चेसन यांनी आपल्या मते बायबल कालबाह्‍य का आहे हे व्यक्‍त केले. वरवर पाहिल्यास या युक्‍तिवादात तथ्य असल्याचे भासते. काही झाले तरी, बायबलचे लिखाण झाले तेव्हापासून आजवर मानसिक आरोग्य आणि मानवी वर्तन यांविषयी मनुष्याच्या ज्ञानात कितीतरी पटीने भर पडली आहे. असे असताना, बायबलसारख्या जुन्या पुस्तकात आधुनिक जीवनाकरता समर्पक माहिती असणे कसे शक्य आहे?

कालनिरपेक्ष तत्त्वे

काळ बदलला आहे हे खरे असले तरीसुद्धा, मनुष्याच्या मूलभूत गरजांमध्ये मात्र फरक पडलेला नाही. सबंध इतिहासात लोकांना प्रेमाची, जिव्हाळ्याची गरज भासली आहे. त्यांच्या मनात नेहमीच आनंदी राहण्याची आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याची इच्छा राहिली आहे. आर्थिक दबावांना कसे तोंड द्यावे, वैवाहिक जीवन कसे यशस्वी बनवावे, आणि आपल्या मुलांमध्ये उत्तमोत्तम नैतिक आणि सात्त्विक मूल्ये कशी बिंबवावीत या सर्व बाबतींत मनुष्याला मार्गदर्शनाची गरज भासली आहे. बायबलमध्ये नेमक्या याच मूलभूत गरजांसंबंधी मार्गदर्शन दिले आहे.—उपदेशक ३:१२, १३; रोमकर १२:१०; कलस्सैकर ३:१८-२१; १ तीमथ्य ६:६-१०.

बायबलच्या सल्ल्यातून मनुष्यस्वभावाविषयी सूक्ष्म जाणिवेचे दर्शन घडते. आधुनिक जीवनात उपयुक्‍त असलेल्या त्यातील विशिष्ट, कालनिरपेक्ष तत्त्वांची काही उदाहरणे विचारात घ्या.

वैवाहिक जीवनाकरता उपयुक्‍त मार्गदर्शन

युएन क्रॉनिकलच्या शब्दांत, कुटुंब हे “मानवी संघटनातील सर्वात पुरातन आणि सर्वात मूलभूत घटक आहे; दोन पिढ्यांमधला सर्वात निर्णायक दुवा.” तथापि, हा “निर्णायक दुवा” चिंताजनक गतीने निखळत चालला आहे. क्रॉनिकल यानुसार, “आजच्या जगात कितीतरी कुटुंबांना असे भयंकर प्रश्‍न भेडसावत आहेत की ज्यांमुळे त्यांची कार्य करण्याची क्षमता, किंबहुना, त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.” या कौटुंबिक घटकाचे अस्तित्व कायम राखण्यास मदत करण्याच्या दिशेने बायबल कोणते मार्गदर्शन देते?

सर्वप्रथम, पतिपत्नींनी परस्परांना कशी वागणूक द्यावी याविषयी बायबल पुष्कळ काही सांगते. उदाहरणार्थ, पतींच्या संबंधाने ते म्हणते: “पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीति करितो तो स्वतःवरच प्रीति करितो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करितो.” (तिरपे वळण आमचे.) (इफिसकर ५:२८, २९) पत्नीला “आपल्या पतीची भीड राखावी,” असा सल्ला देण्यात आला आहे. (तिरपे वळण आमचे.)—इफिसकर ५:३३.

अशाप्रकारच्या बायबल मार्गदर्शनाचे पालन करण्याचे परिणाम विचारात घ्या. “आपलेच शरीर आहे असे समजून” आपल्या पत्नीवर प्रेम करणारा पती तिला तिरस्काराने किंवा निर्दयपणे वागवणार नाही. तो तिच्यावर हात उगारणार नाही किंवा तिला आपल्या शब्दांतून अथवा भावनिकरित्या देखील दुखावणार नाही. उलट स्वतःविषयी असणारा आदर आणि विचारशीलपणा तो तिच्याशी वागतानाही दाखवतो. (१ पेत्र ३:७) यामुळे त्याच्या पत्नीला त्याच्या प्रेमाची खात्री असते आणि तिला आपल्या विवाहात सुरक्षित वाटते. अशारितीने, स्त्रियांशी कसे वागावे यासंबंधाने तो आपल्या मुलांसमोर एक उत्तम आदर्श घालून देतो. दुसरीकडे पाहता, आपल्या पतीची “भीड” राखणारी पत्नी सतत त्याच्यावर टिकास्त्रांचा मारा करून किंवा सारखे तुच्छतेने बोलून त्याला पाण्यात पाहात नाही. तिने त्याची भीड राखल्यामुळे आपल्यावर तिचा भरवसा आहे, आपण तिला आवडतो आणि आपली तिला किंमत आहे याची पतीला खात्री वाटते.

असे मार्गदर्शन आजच्या या आधुनिक जगात उपयुक्‍त आहे का? कुटुंबांचा अभ्यास करणारे पेशेवाईक लोकही काहीशा अशाच प्रकारच्या निष्कर्षांवर पोहोचले आहेत हे लक्षवेधक आहे. एका कौटुंबिक सल्लादान कार्यक्रमाच्या संयोजिकेने सांगितले: “माझ्या माहितीतली सर्वात यशस्वी कुटुंबे ती आहेत की ज्यांत आई व वडील या दोघांचं आपसांत एक घनिष्ट प्रेमळ नातं असतं. . . . हे घनिष्ट नातं सर्वात महत्त्वाचं आहे, त्यामुळेच हळूहळू मुलांच्या मनात सुरक्षिततेची जाणीव उत्पन्‍न होते.”

गत वर्षांत, वैवाहिक जीवनावरील बायबलचे मार्गदर्शन असंख्य प्रांजळ कौटुंबिक सल्लागारांच्या सल्ल्यापेक्षा अधिक खात्रीलायक ठरले आहे. हेच पाहा ना, काही काळापूर्वी कित्येक तज्ज्ञ असुखकारक विवाहावर सहजसोपा उपाय म्हणून घटस्फोट घेण्याचा सल्ला देत होते. आज त्यांच्याचपैकी बरेचजण, शक्यतो विवाह टिकवून ठेवावा असे लोकांना कळकळीने सांगताहेत. पण हा बदल होईपर्यंत कितीतरी कुटुंबे केव्हाच उद्‌ध्वस्त झाली असावीत.

उलटपक्षी बायबल विवाहाविषयी भरवसालायक, वाजवी मार्गदर्शन देते. ते मान्य करते की विशिष्ट अपवादात्मक परिस्थितींत घटस्फोट घेणे हे परवानगी देण्याजोगे आहे. (मत्तय १९:९) त्याच वेळेस, ते क्षुल्लक कारणांवरून घेतलेल्या घटस्फोटास निंद्य मानते. (मलाखी २:१४-१६) तसेच ते वैवाहिक अविश्‍वासूपणाचाही निषेध करते. (इब्री १३:४) बायबलच्या म्हणण्यानुसार विवाह म्हणजे एक बाध्यता आहे: “यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.” a (तिरपे वळण आमचे.)—उत्पत्ति २:२४; मत्तय १९:५, ६.

वैवाहिक जीवनावर बायबलचे मार्गदर्शन बायबल लिहिण्यात आले त्या काळात होते तितकेच आजही समर्पक आहे. पती व पत्नी एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागतात आणि एक खास नाते या दृष्टीने विवाहाकडे पाहतात तेव्हा साहजिकच विवाह—आणि त्याअर्थी कुटुंब टिकून राहते.

आईवडिलांसाठी उपयुक्‍त मार्गदर्शन

मुलांच्या संगोपनाविषयी “नाविन्यपूर्ण कल्पनांच्या” आहारी जाऊन—“मनाई करण्यावर मनाई आहे”—असा अनेक पालकांचा ग्रह झाला. मुलांवर बंधने घातल्यामुळे त्यांच्यावर आघात तर होणार नाही, ती हताश तर होणार नाहीत अशी त्यांना भीती होती. बाल संगोपनाच्या प्रांजळ सल्लागारांचे ठाम मत होते की पालकांनी केवळ सौम्यपणे मुलांच्या चुकांची दुरुस्ती करावी, पण एवढेच, यापुढे त्यांनी जाऊ नये. तथापि असे म्हणणारे अनेक तज्ज्ञ आता शिस्त लावण्याच्या महत्त्वावर पुनर्विचार करताहेत, आणि आपल्या मुलांविषयी काळजी करणारे आईवडील या विषयावर सुस्पष्ट मार्गदर्शनाच्या शोधात आहेत.

बायबलने मात्र बाल संगोपनाविषयी सुरवातीपासूनच सुस्पष्ट, वाजवी मार्गदर्शन दिले आहे. सुमारे २,००० वर्षांपूर्वीच त्यात म्हटले होते: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” (इफिसकर ६:४) या वचनात ‘शिस्त’ याअर्थी भाषांतरित करण्यात आलेल्या ग्रीक नामाचा अर्थ, “संगोपन, प्रशिक्षण, मार्गदर्शन” असा होतो. बायबलनुसार ही शिस्त किंवा वळण लावण्याद्वारे पालकांचे प्रेम व्यक्‍त होते. (नीतिसूत्रे १३:२४) निःसंदिग्ध नैतिक सूचना मिळाल्यामुळे आणि बऱ्‍यावाईटाविषयीची समज प्रगल्भ झाल्यामुळे मुलांचा चांगला विकास होतो. शिस्तीतून त्यांना ही जाणीव होते, की आपल्या आईवडिलांना आपल्याविषयी आणि आपल्या व्यक्‍तित्वाची कोणत्या दिशेने वाढ होते आहे याविषयी काळजी आहे.

तथापि, आईवडिलांच्या या अधिकाराचा—‘शासनवेत्राचा’—कधीही निष्ठूरपणे वापर होता कामा नये. b (नीतिसूत्रे २२:१५; २९:१५) बायबल आईवडिलांना बजावते: “वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांवर इतके रागावू नका की त्यामुळे ती निरुत्साही होतील व प्रयत्न करणार नाहीत.” (कलस्सैकर ३:२१ सुबोध भाषांतर) शारीरिक शिक्षा देणे ही मुलांना शिकवण्याची सर्वात चांगली पद्धत आहे असे नाही, हेही बायबल मान्य करते. नीतिसूत्रे १७:१० म्हणते: “वाग्दंड समंजसाच्या मनावर ठसतो, तसे शंभर फटके मूर्खाच्या मनावर ठसत नाहीत.” शिवाय, मुलांना शिक्षा देण्याची गरज पडणार नाही अशाप्रकारे शिस्त लावण्याचा सल्ला बायबल देते. अनुवाद ११:१९ मध्ये पालकांना सल्ला देण्यात आला आहे की त्यांनी निवांत क्षणांचा फायदा घेऊन मुलांच्या मनात नैतिक मूल्ये बिंबवण्याचा प्रयत्न करावा.—अनुवाद ६:६, ७ देखील पाहा.

पालकांना दिलेला बायबलचा कालनिरपेक्ष सल्ला सुस्पष्ट आहे. मुलांना सुसंगत आणि प्रेमपूर्वक शिस्तीची गरज असते. प्रत्यक्ष अनुभवावरून दिसून येते की बायबलचे हे मार्गदर्शन अत्यंत गुणकारक आहे. c

माणसामाणसांत विभाजन करणाऱ्‍या भेदभावांवर मात करणे

आज जातीय, राष्ट्रीय आणि वंशीय भेदभावांमुळे लोक विभाजित झाले आहेत. अशाप्रकारचा मानवनिर्मित दुजाभाव सबंध जगात असंख्य युद्धांमध्ये निरपराध जिवांच्या हत्येला कारणीभूत ठरला आहे. इतिहासाकडे पाहता, भविष्यात कधी वेगवेगळ्या जातीचे आणि राष्ट्रांचे लोक एकमेकांशी समभावाने वागतील याची फारशी शक्यता दिसत नाही. एका आफ्रिकन मुत्सद्द्‌याच्या मते, “यावरचा उपाय आपल्या मनांत दडलेला आहे.”११ पण मनुष्याच्या मनांचे परिवर्तन घडवून आणणे हे म्हणावे तितके सोपे नाही. तथापि, बायबलचा संदेश कशाप्रकारे लोकांच्या मनाचा ठाव घेऊन समतेच्या भावनांना खतपाणी देतो ते पाहा.

देवाने ‘एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण केली’ या बायबलच्या शिकवणुकीमुळे जातीय वर्चस्वाचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. (प्रेषितांची कृत्ये १७:२६) उलट त्यातून दिसून येते की खरे पाहता जगात एकच जात आहे—मानवजात. शिवाय बायबल आपल्याला ‘देवाचे अनुकरण करणारे व्हा’ असा आग्रह करते, आणि देवाविषयी ते म्हणते: ‘तो पक्षपाती नाही, तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.’ (इफिसकर ५:१; प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) बायबलला गांभिर्याने घेऊन त्यातील शिकवणुकींनुसार जगण्याचा प्रांजळपणे प्रयत्न करणारे लोक या ज्ञानामुळे एक होतात. या ज्ञानाची पोहंच अत्यंत खोलवर, अर्थात मनुष्याच्या मनाच्या गाभाऱ्‍यापर्यंत असल्यामुळे ते लोकांना विभाजित करणारे मानवनिर्मित भेदभाव नाहीसे करते. याचे एक उदाहरण विचारात घ्या.

हिट्‌लरने सबंध युरोपात युद्ध चेतवले होते, तेव्हा ख्रिश्‍चनांचा एकच समूह—यहोवाचे साक्षीदार—निरपराध मनुष्यांच्या कत्तलीत सामील होण्यास शेवटपर्यंत तयार झालेच नाहीत. त्यांनी आपल्या सहमानवांवर ‘तरवार उचलण्यास’ नकार दिला. देवाला प्रसन्‍न करण्याची त्यांची इच्छा, हे त्यांच्या भूमिकेमागील कारण होते. (यशया २:३, ४; मीखा ४:३,) कोणतेही राष्ट्र किंवा कोणतीही जात इतरांपेक्षा वरचढ नाही—या बायबलच्या शिकवणुकीवर त्यांनी खऱ्‍या अर्थाने विश्‍वास ठेवला होता. (गलतीकर ३:२८) या शांतिप्रिय भूमिकेमुळे, त्यांनाच सर्वात आधी छळ छावण्यांमध्ये डांबण्यात आले.—रोमकर १२:१८.

तथापि, आम्ही बायबलचे पालन करतो असे म्हणणाऱ्‍या सर्वांनीच अशी भूमिका पत्करली नाही. दुसऱ्‍या महायुद्धाच्या काही काळानंतर मार्टिन नाईमॉलर या जर्मन प्रोटेस्टंट पाळकाने असे लिहिले की, “जो कुणी [युद्धांसाठी] देवाला जबाबदार ठरवतो, त्याला देवाच्या वचनाची समज प्राप्त झालेली नाही, आणि तो ही समज प्राप्त करू इच्छितही नाही. . . . ख्रिस्ती चर्चेसनी, शतकानुशतके वारंवार युद्धांना, सैन्यांना आणि शस्त्रास्त्रांना आशीर्वाद देऊन . . . युद्धात आपल्या शत्रूंचा सर्वनाश व्हावा म्हणून अक्षरशः प्रार्थना केल्या आहेत, त्यांचे हे कृत्य कोणत्याही ख्रिश्‍चनाला न शोभणारे असे होते. हा सर्व आपला दोष आहे, आपल्या वाडवडिलांचा दोष आहे, पण देवाचा यात निश्‍चितच काही दोष नाही. आणि आपल्याला, आजच्या ख्रिश्‍चनांना, प्रांजळ बायबल विद्यार्थी [यहोवाचे साक्षीदार] यांसारख्या लहानशा गटापुढे शरमेने आपली मान खाली घालावी लागते, ज्यांनी लष्करी सेवा स्वीकारण्यापेक्षा आणि माणसांवर गोळीबार करण्यापेक्षा हजारो-लाखोंच्या संख्येने छळ छावण्यांत जाणे अधिक पसंत केले, एवढेच काय त्यांनी मृत्यूही पत्करला.”१२

अरबी आणि यहूदी लोकांना, क्रोएशियन आणि सर्बियन लोकांना, हुतू आणि तुत्सी लोकांना जवळ आणणाऱ्‍या भ्रातृभावासाठी यहोवाचे साक्षीदार आज देखील सुप्रसिद्ध आहेत. तथापि, साक्षीदार नेहमीच कबूल करतात की त्यांच्यात असणारा एकोपा ते इतरांपेक्षा चांगले असल्यामुळे नव्हे तर त्यांना बायबल संदेशाच्या शक्‍तीची प्रेरणा लाभली असल्यामुळे शक्य झाला आहे.—१ थेस्सलनीकाकर २:१३.

उत्तम मानसिक आरोग्याला पोषक असे उपयुक्‍त मार्गदर्शन

माणसाच्या शारीरिक आरोग्यावर सहसा त्याच्या मानसिक आणि भावनात्मक आरोग्याचा प्रभाव पडतो. उदाहरणार्थ, वैज्ञानिक संशोधनांतून क्रोधिष्टपणाचे अपायकारक परिणाम उजेडात आले आहेत. ड्यूक युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधील वर्तन संशोधनाचे संचालक डॉ. रेडफर्ड विल्यम्स आणि त्यांच्या पत्नी व्हर्जिन्या विल्यम्स घातक क्रोध (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात म्हणतात, “बऱ्‍याचशा उपलब्ध पुराव्यावरून दिसून येते की सहसा अमैत्रिपूर्ण लोकांना हृदयरोगांचा (तसेच इतर रोगांचाही) जास्त धोका असतो, यासाठी निरनिराळी कारणे असू शकतात, जसे की त्यांना फारसा सामाजिक पाठिंबा नसतो, क्रोधिष्टावस्थेत त्यांची शारीरिक प्रतिक्रिया सामान्यांपेक्षा तीव्र असते आणि त्यांच्यात आरोग्याला हानीकारक असणाऱ्‍या धोकेदायक सवयींचे प्रमाण जास्त असल्याचे आढळते.”१३

अशाप्रकारचे वैज्ञानिक संशोधन होण्याच्या हजारो वर्षांपूर्वी, बायबलने साध्याच पण सुस्पष्ट शब्दांत माणसाच्या भावनात्मक अवस्थेचा त्याच्या शारीरिक आरोग्याशी कसा संबंध आहे ते दाखवले: “शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात.” (नीतिसूत्रे १४:३०; १७:२२) बायबलमधील समजदारीचा सल्ला: “राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर” आणि “मन उतावळे होऊ देऊन रागावू नको.”—स्तोत्र ३७:८; उपदेशक ७:९.

क्रोधावर नियंत्रण करण्यासाठी देखील बायबलमध्ये सुज्ञपणाचा सल्ला सापडतो. उदाहरण द्यायचे झाल्यास नीतिसूत्रे १९:११ म्हणते: “विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे.” येथे वापरलेला ‘विवेक’ या अर्थाचा इब्री शब्द एका क्रियापदातून आलेला आहे जे एखाद्या गोष्टीच्या ‘कारणाची जाणीव असण्याकडे’ लक्ष वेधते.१४ सुज्ञपणाचा सल्ला म्हणजे: “विचार करा आणि मगच कृती करा.” इतर लोक विशिष्ट प्रकारे का बोलतात किंवा वागतात यामागची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास एखाद्या व्यक्‍तीला आणखी सहनशील—आणि मंदक्रोध बनण्यास मदत होईल.—नीतिसूत्रे १४:२९.

आणखी एक उपयुक्‍त सल्ला कलस्सैकर ३:१३ मध्ये आढळतो, येथे असे म्हटले आहे: “एकमेकांचे सहन करा, . . . आणि आपसांत क्षमा करा.” जीवनात लहानमोठी वितुष्टे तर येतच असतात. “एकमेकांचे सहन करा” असे म्हणताना आपल्याला इतरांमध्ये ज्या आवडत नाहीत, अशा गोष्टी सहन करण्याचे सुचविण्यात आले आहे. “क्षमा करा” याचा अर्थ राग झटकून देणे. काहीवेळा कटू भावनांना कुरवाळत बसण्यापेक्षा त्यांना झटकून टाकणेच शहाणपणाचे असते; रागाला मनात घर करू दिल्यास उलट आपणच आणखी भाराक्रांत होऊ.—“मानवी नाती जोपासण्यासाठी उपयुक्‍त मार्गदर्शन” या शीर्षकाची पेटी पाहा.

आज सल्ला आणि मार्गदर्शन देणारी कितीतरी माध्यमे आहेत. पण बायबल हे अनन्यसाधारण आहे. त्यातील सल्ला हा निव्वळ शास्त्रोक्‍त नाही, शिवाय, त्यातील सल्ल्याचे पालन केल्याने आपले नुकसान कधीही होत नाही. उलट त्यातील समजबुद्धीचे मार्गदर्शन “अभंग” [“अतिशय खात्रीलायक,” NW] सिद्ध झाले आहे. (स्तोत्र ९३:५) त्यातल्या त्यात, बायबलचा सल्ला कालनिरपेक्ष आहे. ते जवळजवळ २,००० वर्षांपूर्वीच लिहून पूर्ण झाले तरीसुद्धा, त्यातील शब्द आजदेखील व्यवहार्य आहेत. आणि आपण कोणत्याही वर्णाचे असो वा कोणत्याही राष्ट्राचे असो, ते शब्द प्रत्येकासाठी तितकेच व्यवहार्य आहेत. बायबलच्या शब्दांत सामर्थ्य देखील आहे—लोकांत चांगले परिवर्तन करण्याचे सामर्थ्य. (इब्री लोकांस ४:१२) त्याअर्थी, हे पुस्तक वाचून त्यातील तत्त्वांचे पालन केल्यामुळे तुमचे जीवन अधिक श्रेयस्कर बनू शकेल.

[तळटीपा]

a येथे “जडून” असे भाषांतरित केलेल्या दवाख या इब्री शब्दातून, “प्रेमाने व निष्ठेने कोणाला चिकटून राहणे असा अर्थ ध्वनित होतो.” ग्रीक भाषेत मत्तय १९:५ येथे “जडून राहील” याअर्थी भाषांतरित केलेला शब्द “चिकटवणे,” “जोडणे,” “मजबूत बांधणे” या अर्थांच्या शब्दाशी संबंधित आहे.

b बायबल काळांत, “शासनवेत्र” (इब्री, शेवेत) या शब्दाचा अर्थ, मेंढपाळाच्या हातात असते तशी “आकडी” किंवा “काठी” असा होता.१० या संदर्भात, शासनवेत्र या शब्दात कठोर निर्दयीपणाचा नव्हे, तर प्रेमपूर्वक मार्गदर्शनाचा संकेत आढळतो.—पडताळा स्तोत्र २३:४.

c वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित, कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकातील, “तुमच्या मुलाला बालपणापासून शिक्षण द्या,” “तुमच्या किशोरवयीनाला जोमाने वाढण्यास मदत करा,” “घरात एखादा बंडखोर आहे का?”, व “तुमच्या कुटुंबाचे विध्वंसक परिणामांपासून संरक्षण करा” हे अध्याय पाहा.

[२४ पानांवरील संक्षिप्त आशय]

बायबल कौटुंबिक जीवनाविषयी सुस्पष्ट, वाजवी सल्ला

[२३ पानांवरील चौकट]

यशस्वी कुटुंबांची ओळखचिन्हे

कित्येक वर्षांपूर्वी शिक्षण तज्ज्ञ आणि कौटुंबिक विशेषज्ञ असलेल्या एका महिलेने व्यापक प्रमाणावर एक सर्वेक्षण केले; या सर्वेक्षणात तिने ५०० पेशेवाईक कौटुंबिक सल्लागारांना, “यशस्वी” कुटुंबांत त्यांना कोणती वैशिष्ट्ये आढळली याविषयी विवेचन मांडण्याची विनंती केली. गंमत म्हणजे, त्यांनी सूचिबद्ध केलेल्या सर्वात सामान्य वैशिष्ट्यांची बायबलने कितीतरी काळापूर्वी शिफारस केलेली होती.

चांगल्या दळणवळणाच्या सवयींचा व मतभेद मिटवण्याच्या परिणामकारक मार्गांचा, सदर यादीत सर्वप्रथम उल्लेख करण्यात आलेला होता. या सर्वेक्षणाच्या लेखिकेने सांगितले की यशस्वी कुटुंबांतील एक सर्वसामान्य धोरण म्हणजे, “कुणीही कुणावर रागावलेले असताना झोपी जात नाही.” तथापि, बायबलने तर १,९०० वर्षांपूर्वीच सल्ला दिला होता: “तुम्ही रागावा, परंतु पाप करु नका, तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये.” (इफिसकर ४:२६) बायबलच्या काळात, एका सूर्यास्तापासून पुढच्या सूर्यास्तापर्यंत दिवस मोजला जात असे. यामुळे, आधुनिक तज्ज्ञांनी कुटुंबांचा अभ्यास करण्याच्या कितीतरी काळाआधीच, बायबलने हा समंजस सल्ला दिला: दुरावा निर्माण करणारे मतभेद लवकरात लवकर—एक दिवस मावळून दुसरा उजाडण्याआधीच मिटवून टाका.

यशस्वी कुटुंबातील सदस्य, “ऐन घरातून बाहेर पडतेवेळी किंवा झोपी जाण्याआधी स्फोटक विषयांचा उल्लेख करण्याचे टाळतात,” असे या लेखिकेला दिसून आले. ती म्हणते, “‘योग्य वेळ’ हा शब्दप्रयोग मला पुन्हा पुन्हा ऐकायला मिळाला.” या कुटुंबांना कल्पना नसली तरीसुद्धा, ती २,७०० वर्षांपेक्षाही अधिक काळापूर्वीच्या बायबल नीतिसूत्राची आठवण करून देतात: “रुपेरी करंड्यांत सोन्याची फळे, [“सफरचंदे,” NW] तसे समयोचित भाषण होय.” (तिरपे वळण आमचे.) (नीतिसूत्रे १५:२३; २५:११) या रूपकात बायबल काळांत अतिशय मोलवान आणि सुंदर समजल्या जाणाऱ्‍या कोरीव चांदीच्या करंड्यात ठेवलेल्या सफरचंदांच्या आकारात असणाऱ्‍या सोनेरी शोभेच्या वस्तूंचा संकेत असावा. त्याअर्थी, समयोचित शब्द किती सुंदर आणि मोलवान असतात हे या रूपकाद्वारे स्पष्ट होते. तणावपूर्ण परिस्थितींत, योग्य वेळी बोललेले योग्य शब्द अनमोल असतात.—नीतिसूत्रे १०:१९.

[२६ पानांवरील चौकट]

मानवी नाती जोपासण्यासाठी उपयुक्‍त मार्गदर्शन

“त्याची भीति बाळगा, पाप करू नका; अंथरुणात पडल्यापडल्या आपल्या मनाशी विचार करा; स्तब्ध राहा.” (स्तोत्र ४:४) लहानमोठ्या कारणांमुळे भावना दुखावल्या जातात अशा प्रसंगांत सहसा शब्द आवरून, परिणामतः, भावनिक चकमक टाळणे शहाणपणाचे ठरू शकते.

“कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करितो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.” (नीतिसूत्रे १२:१८) विचार करून मगच बोला. अविचारीपणे बोललेल्या शब्दांमुळे इतरजण भावनिकदृष्ट्या घायाळ होऊ शकतात, शिवाय असे शब्द मैत्रीसंबंधांनाही घातक ठरू शकतात.

“मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.” (नीतिसूत्रे १५:१) मृदु उत्तर देणे म्हणजे खरे तर आत्मसंयमाची परीक्षाच, पण हा मार्ग पत्करल्याने समस्यांचे निवारण होऊन शांतिपूर्ण संबंध जोपासले जाऊ शकतात.

“कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे त्याचप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो, म्हणून भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी.” (नीतिसूत्रे १७:१४) तुमचा राग अनावर होण्याआधीच स्फोटक परिस्थितीतून काढता पाय घेणे शहाणपणाचे असते.

“मन उतावळे होऊ देऊन रागावू नको; कारण राग मूर्खांच्या हृदयांत वसतो.” (उपदेशक ७:९) भावनांच्या पाठोपाठ कृती घडते. लगेच रागावणारा मूर्ख असतो, कारण राग मानल्यामुळे तो अविचारीपणे काहीतरी बोलून बसण्याची किंवा त्याच्या हातून एखादे अविचारी कृत्य घडण्याची शक्यता असते.

[२५ पानांवरील चित्र]

छळ छावण्यांत सर्वात आधी यहोवाच्या साक्षीदारांनाच डांबण्यात आले